Geographical Indications : तीन कृषी उत्पादनांच्या ‘जीआय’मुळे लातूर जिल्ह्याला मिळाली राष्ट्रीय ओळख!
1 min read
29 नोव्हेंबर 2023 रोजी भौगोलिक उपदर्शन पत्रिका Geographical Indications Journal मध्ये लातूर जिल्ह्यातील पानचिंचोलीच्या ‘पटडी चिंच’, बोरसुरी येथील ‘बोरसुरी तूर डाळी’ आणि आशिव येथील ‘कास्ती कोथिंबीर’ला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्याचे प्रसिद्ध झाले. पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे.
एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडीत मानांकन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी (उदा. शहर, प्रदेश, देश) असतो. त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात. भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक भाग असल्याने 15 सप्टेंबर 2003 पासून मालाचे भौगोलिक मानांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा 1999 लागू करण्यात आला. भौगोलिक मानांकनामुळे, भौगोलिक मानांकनप्राप्त वस्तूचे नाव अधिकृत वापरकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही वापरू शकत नाही. 2004 – 2005 साली दार्जिलिंगच्या चहाला भारतातले पहिले भौगोलिक मानांकन मिळाले होते. लोकांना जी. आय. मानांकन काय आहे, हे कळावे म्हणून यावर लिहलेला हा सविस्तर लेख.
🔆 भौगोलिक चिन्हांकन (जी.आय.) म्हणजे काय?
भौगोलिक चिन्हांकन (जी.आय.) हे त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषिविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो. जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू अथवा पदार्थ अथवा उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवाव्दितीय असल्याची पावती आहे.


🔆 जी. आय. नोंदणीचे फायदे कोणते?
जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होणाऱ्या जी. आय. मानांकनाच्या अनाधिकृत वापरावर पायबंद घालता येतो. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते. उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते. जागतिक व्यापार संघटनेच्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यास यामुळे मदत होते.
🔆 जी. आय. नोंदणीसाठी कोण अर्ज करू शकतो?
कायद्याने किंवा कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली कोणतीही संस्था, संघटना, अधिकारी यंत्रणा किंवा कोणताही उत्पादक यांच्यापैकी कोणीही जी. आय. नोंदणीसाठी अर्ज करू शकते. जी. आय. नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने उत्पादकांच्या हिताचेच प्रतिनिधित्व करणे आवश्यक असते. विहित नमुन्यातच अर्जदाराने अर्ज करणे गरजेचे असते. हा अर्ज नोंदणी अधिकारी, भौगोलिक निर्देशन कार्यालय, चेन्नई यांच्याकडे विहित शुल्कासह पाठवला जाणे आवश्यक असते.
🔆 जी. आय. मानांकनाचा नोंदणीकृत मालक कोण असतो?
काही लोकांनी, उत्पादकांनी अधिकृतरित्या स्थापन केलेली संघटना किंवा कोणतीही अधिकृत यंत्रणा जी. आय. उत्पादनाची नोंदणीकृत मालक असते. ‘जी. आय. मानांकनाचे नोंदणीकृत मालक’ म्हणून त्यांचे नाव जी. आय. मानांकन नोंदवहीत दाखल केलेले असले पाहिजे.
🔆 जी. आय. मानांकनाचा अधिकृत वापरकर्ता कोण असतो?
नोंदणीकृत जी. आय. मानांकनप्राप्त वस्तूंचा अधिकृत वापरकर्ता म्हणून त्या वस्तूचे उत्पादन केलेला उत्पादक असतो.
🔆 जी. आय. मानांकनासंदर्भात उत्पादक कोण असतो?
उत्पादक हे तीन प्रकारचा माल हाताळणाऱ्या व्यक्ती असतात. शेतमालाचे उत्पादन करणारे, त्यावर प्रक्रिया करणारे, त्याचा व्यापार किंवा व्यवहार करणारे.
🔆 जी. आय. नोंदणी करणे सक्तीचे आहे का?
जी. आय. नोंदणी करणे सक्तीचे नाही. मात्र, नोंदणी केल्यामुळे कायदेशीर उल्लंघनाच्या वेळी कारवाई करण्यासाठी अधिक चांगले कायदेशीर संरक्षण प्राप्त होते.
🔆 नोंदणीकृत जी. आय.चा वापर कोण करू शकते?
नोंदणीकृत जी. आय. वापराचे सर्व अधिकार अधिकृत वापरकर्त्यालाच असतात.
🔆 जी. आय. नोंदणी किती काळापर्यंत वैध असते? तिचे नूतनीकरण करता येते का?
जी. आय. नोंदणी ही 10 वर्षांसाठी केली जाते. त्यापुढे दर 10 वर्षांसाठी आपण सातत्याने नोंदणीचे नूतनीकरणही करू शकतो. जर नोंदणीकृत जी. आय.चे नूतनीकरण झाले नाही, तर नोंदवहीमधून त्याची नोंद काढून टाकली जाते.
🔆 नोंदणीकृत जी. आय.चे उल्लंघन झाले असे कधी म्हटले जाते?
जी. आय.प्राप्त मालाच्या मूळ भौगोलिक परिसरासंदर्भात दिशाभूल केली जाते, त्या वेळी नोंदणीकृत जी. आय.चे उल्लंघन झाले असे म्हटले जाते. एखादे उत्पादन ज्या जी. आय.शी संबंधित असते, त्याऐवजी ते उत्पादन दुसऱ्याच भौगोलिक चिन्हांकनाचे प्रतिनिधित्व करत असल्याची चुकीची माहिती जाते, त्या वेळीही नोंदणीकृत जी. आय.चे उल्लंघन झाले असे म्हटले जाते.
🔆 उल्लंघनासंदर्भातील कारवाई कोण सुरू करू शकते?
जी. आय.चे नोंदणीकृत मालक किंवा अधिकृत वापरकर्ते उल्लंघनासंदर्भातली कारवाई सुरू करू शकतात.
🔆 नोंदणी झालेल्या जी. आय.च्या मालकीचे हस्तांतरण, संक्रमण (प्रेषण) इत्यादी करता येऊ शकते?
जी. आय. ही सार्वजनिक मालमत्ता असते. ती संबंधित मालाच्या उत्पादकांच्या मालकीची असते. तिची मालकी दुसऱ्यांना देणे, तिचे संक्रमण (प्रेषण) करणे, परवानाकरण (Licensing), गहाण ठेवणे, प्रतिज्ञापत्र करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे या सार्वजनिक मालमत्तेच्या बाबतीत करार करणे शक्य नसते. मात्र जर अधिकृत वापरकर्त्याचा (जी. आय.ची नोंदणी करताना त्या अर्जावर जिचे नाव आहे, अशा व्यक्तीचा) मृत्यू झाला, तर त्याने नमूद केलेल्या त्याच्या वारसाला त्याचे हक्क प्राप्त होतात.
🔆 एखाद्या उत्पादनाला मिळालेले जी. आय. किंवा त्या जी. आय. उत्पादनाचा अधिकृत वापरकर्ता यांची नोंद नोंदवहीतून काढून टाकता येते का?
एखाद्या उत्पादनाचा जी. आय. किंवा त्या उत्पादनाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून असलेल्यांची नोंद नोंदवहीमधून काढून टाकण्याचे अधिकार अपिलीय मंडळाला किंवा भौगोलिक निर्देशन कार्यालयाच्या नोंदणी अधिकाऱ्याला (रजिस्ट्रार) असतात. हा आदेश समजल्यापासून तीन महिन्यांच्या आत यासंदर्भातली याचिका संबंधित व्यक्ती दाखल करू शकते.
🔆 जी . आय. हा ट्रेडमार्कहून (व्यापारचिन्हाहून) कशा प्रकारे भिन्न आहे?
ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) हे व्यापारासंदर्भात वापरले जाणारे चिन्ह आहे. हे चिन्हांकन एका उद्योगाचा माल किंवा त्याची सेवा यांना इतर उद्योगांपासून वेगळे बनवते. मात्र, जी. आय.चा वापर विशिष्ट भौगोलिक परिसरातील खास गुणधर्म असलेला माल ओळखण्यासाठी केला जातो.
महाराष्ट्रातील नऊ उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाले आहेत. त्यातले तीन लातूरचे असल्यामुळे लातूरकरांना विशेष आनंद झाला आहे. या मानांकनामुळे या तीन उत्पादनाला मोठी राष्ट्रीय ओळख निर्माण होईल आणि उत्पादनाला मोठी चालना मिळेल. राष्ट्रीय बाजारात मागणी वाढेल. त्यासाठी दर्जा राखण्याचे आव्हान असेल. हा दर्जा निश्चित राखला जाईल, अशी अपेक्षा लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हनबर यांनी व्यक्त केली आहे.