Rainy weather, cold : पावसाळी वातावरण निवळणार, थंडीला हाेणार सुरुवात
1 min read
अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्राच्या भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवार (दि. 11 डिसेंबर) ते बुधवार (दि. 13 डिसेंबर) या तीन दिवसांच्या काळात महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यता आता मावळली आहे. उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेश करणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस व बर्फवृष्टीमुळे तेथील सकाळची दृश्यता खालावली आहे. तिथे थंड वातावरण व धुके जाणवत आहे, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीमुळे शुक्रवार (दि. 8 डिसेंबर)पासून सुरू होणाऱ्या थंडीतील अडथळा आता दूर होवून पूरकता मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील फळबागांना होणारा धोका, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा लागवड यासारख्या शेतकामांची गैरसोयही टळू शकते.
🔆 मिचॉन्ग समुद्री चक्रीवादळाचा फटका
रविवार (दि. 3 डिसेंबर)पासून उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर पर्वतीय क्षेत्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या (पश्चिमी झंजावात) चक्री वादळातून जबरदस्त बर्फवृष्टीला सुरुवात झाली. अडीच हजार किमी अंतरावरील दक्षिणेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या मिचॉन्ग समुद्री चक्रीवादळामुळे चेन्नई-सीमांध्र पूर्व किनारपट्टी भागात जोरदार पाऊस काेसळला. त्यामुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.
महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. शुक्रवार (दि. 8 डिसेंबर)पासून या भागातील ढगाळ वातावरण हळूहळू पूर्णपणे निवळून थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला असून, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा रान मशागत व लागवड, गहू रान मशागत व पेरणी, सुरू ऊस लागवड यासारखी शेतीची कामे उत्तम वाफस्यावर उरकण्याचे तसेच ज्वारी व हरबरा पिकांची खारव-ओघळणी सारखे सिंचनाचे नियोजन करण्यास आता हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
योग्य आणि मोलाचा सल्ला यांतून शेतकरी वर्गाला मिळतो असेच लेख वेळोवेळी प्रकाशित करत चला🙏