Bamboo : चिवट वनस्पती…. बांबू!
1 min read🎯 झाडाची रचना
हे झाड गवतवर्गीय असल्यामुळे याचे बेट तयार होते. याची पाने निमुळती व सरळ असतात व पानांना धार असते. या झाडाची कांडी लावल्यानंतर त्यातून रोप तयार होते. दरवर्षी याला जमिनीतून अनेक कोंब फुटत राहतात. यामुळे काही दिवसातच याचे मोठे बेट तयार होते. हे झाड लावल्यानंतर काही दिवस ते जमिनीच्या खाली वाढते, याच्या मुळ्या जमिनीत लांबपर्यंत जातात. त्यानतंर ते वर वाढण्यास सुरुवात होते. मुळ्या एकदा घट्ट झाल्या की जमिनीच्या वर ते वेगाने वाढते. कितीही मोठे वादळ, वारा आला तरी हे झाड पडत नाही. कारण याच्या मुळ्या जमिनीत घट्ट रोवलेल्या असतात.
🎯 पर्यावरणीय महत्त्व
पर्यावरणातील बांबू ही अतिशय महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. महाराष्ट्रातील मेळघाटमध्ये बांबूची प्रचंड आकाराची जंगले पहायला मिळतात. ज्या भागांत बांबूची वने आहेत, त्या ठिकाणी पाऊस चांगला पडतो. पावसाला आकर्षित करणारे हे झाड आहे. हे झाड मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन शोषून घेते व ऑक्सिजन सोडते. यामुळे हवा शुद्ध राहण्यास उपयोग होतो. अनेक कीटक, कृमी, प्राणी, मोहोळ या झाडावर असतात. कारण या झाडाचे बेट असल्यामुळे त्यामध्ये सहजासहजी कोणाला जाता येत नाही. यामुळे पक्षी व प्राण्यांचे शत्रूंपासून रक्षण होते. सापदेखील या बांबूच्या बेटा मध्ये राहतात. अनेक पक्षी बांबूवर आपली घरटी करतात. हवेमध्ये गारवा निर्माण करण्याचे काम हे झाड करते. जमिनीमध्ये पाण्याचा साठा वाढविण्याचे कामही बांबू करतो. यामुळे कितीही दुष्काळ, अवर्षण आले, तरी त्याचा बांबूवर काहीही परिणाम होत नाही. आणखी अनेक पर्यावरणीय फायदे बांबूचे आहेत. पर्यावरणात बाबू हे अतीशय महत्त्वाचे असे झाड आहे.
🎯 अर्थशास्त्रीय महत्त्व
बांबू ही दैनंदिन जीवनात लागणारी वनस्पती असल्याने यावर खूप मोठे अर्थशास्त्र अवलंबून आहे. पूर्वीपासून बांबूचा उपयोग घरे बांधण्यासाठी होत आलेला आहे. बांबू हा टिकाऊ, चिवट, न कुजनारा , लवचिक असा असल्याने बांबूची घरे शेकडो वर्ष टिकतात. मेळघाटमध्ये आजच्या काळात बांबूची आधुनिक पद्धतीने घरे बनविली आहेत. नदी, ओढ्यावर पूल तयार करण्यासाठी बांबू वापरतात. जनावरांसाठी घोटे, छपरे बनविण्यासाठी बांबू वापरतात. कागद तयार करण्यासाठी, फर्निचर बनविण्यासाठी, बांबूच्या राख्या, घरातील शोभेच्या वस्तू, झोपाळे, टोपले, दळण करण्यासाठी सूप, कपडे, घड्याळ, शेतीमध्ये कुंपण करण्यासाठी, असे शेडको उत्पादने बांबूची बनतात. बांबू ही वनस्पती लाखों लोकांच्या जीवनाचा आधार आहे. मेळघाटमध्ये बांबूसाठी आदिवासी लोकांचे खूप वेळ मोठ मोठे संघर्ष झालेले आहेत. शेवटी आदिवासींना बांबू तोडण्याचा व उपजीविका करण्याचा अधिकार मिळाला आहे. येणाऱ्या काळात बांबू मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करू शकतो.
🎯 आयुर्वेदिक महत्त्व
बांबू ही एक औषधी वनस्पती आहे. बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी करतात. ही भाजी मानवी आरोग्याला पोषक असते. यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहे. बांबूचे अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी. यामुळे मासिक पाळी साफ होते. मधुमेह असणाऱ्या लोकांना ही भाजी खाल्यास आजार कमी होतो. बांबूचे लोणचे केले जाते. हे लोणचे आरोग्यदायी व शक्तीवर्धक असते. बांबू सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
🎯 बांबू शेती
राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत सरकार बांबू शेतीला प्रोत्साहन देत आहे. या अंतर्गत बांबूला रोपे उपलब्ध करून दिली जातात. तीन वर्षांपर्यंत अनुदान दिले जाते. दिवसेंदिवस बांबूची मागणी वाढत असल्याने बांबू शेतीला आता चांगले दिवस आले आहेत. अनेक बांबू उद्योग आज उभे राहत असल्याने शेतकऱ्यांना बांबू चांगले पैसे देऊ शकतो. पडीक जमिनीमध्ये बांबू शेती करण्यास खूप वाव आहे. तसेच प्रत्येकाने स्वतःच्या शेतात एक तरी बांबूचे झाड लावले पाहिजे. त्यामुळे दैनंदिन जीवनात लागणारा बांबू आपल्याला उपलब्ध होईल तसेच पर्यावरणाला फायदा होईल. नागर फाऊंडेशनच्या माध्यमातून रवळगावमध्ये बांबू लागवड करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. नागर उद्यान प्रकल्पाला कुंपण करण्यासाठी त्याचा सर्व बाजूंनी आम्ही 300 बांबूची झाडे लावली आहेत. यावर्षी फार्मर ऑफ फॉरेस्ट यांच्या माध्यमातून अनेक फळबागा लावल्या आहेत. या सर्व बागांच्या कडेने आपण बांबू लागवड केलेली आहे. यावरती मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. शेतकरीही आता बांबू शेती करण्याचा पर्याय निवडू लागले आहेत.
🎯 झाडे लावा… झाडे जगवा…!