krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Java Plum tree : ऐतिहासिक वृक्ष : जांभूळ!

1 min read
Java Plum tree : जांभूळ (Java Plum) हा शब्द नाव कानावर पडला तरी आपल्या जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचे मन बालपणातील आठवणींमध्ये रममान होते. उन्हाळ्याच्या सुटींच्या उत्तरार्धात जांभळाचा सीझन सुरू होतो. त्यामुळे मुले तर नुसती जांभळाच्या शोधातच असतात. माझ्या लहानपणी आमच्या शेतात एक महाकाय असे जांभळीचे झाड (Java Plum tree) होते. त्या झाडाच्या खोडाचा व्यास जवळपास 20 फुटांचा होता. संपूर्ण गावातील मुले, माणसे या झाडाचे जांभूळ खाण्यासाठी येतं असत. आमच्या सर्व पाहुण्यांना या झाडाने भुरळ घातली होती. अनेक पाहुणे आमच्याकडे ही जांभळे खाण्यासाठी येत असत.

माझे आजोबा सांगत असत की, हे झाड 200 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. सुरुवातीला ज्यावेळी ते गावातून शेतात राहायला आले, त्यावेळी ते अनेक दिवस या झाडाखाली राहत असत, असे हे महाकाय जांभूळ झाड होते. या झाडाची फळे टपोरी, गोड, रसरशीत होती. 5-10 जांभळं खाल्ली की पोट भरत असत. एका दिवशी आमच्या चुलत्यांनी झाडाच्या बाजूने वाळलेले गवत पेटविले. त्याचा जाळ खूप मोठा झाला. हा जाळ त्या झाडाला लागल्यामुळे एका बाजूने ते जळाले, त्यानंतर त्याला रोग लागत गेले व ते झाड जाग्यावरच वठून (जळून) गेले. मागील काही वर्षात सगळीकडेच जांभूळ वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे आजच्या काळात जांभूळ हे झाड दुर्मिळ झाले आहे. आज आपण या झाडाची पूर्ण माहिती घेऊ.

🎯 सांस्कृतिक महत्त्व
प्राचीन काळापासून जांभूळ हे झाड भारतामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध हाेते, याचे अनेक पुरावे मिळतात.

जम्बू द्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्षे
एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की

असे वर्णन रामायणात आलेले आहे. याचा अर्थ भारत या देशाला जांभळांचा देश म्हणतात. यावरून आपल्याला समजते की, भारतात किती मोठ्या प्रमाणावर झाडे होती. मारुती चितमपल्ली यांनी वर्णन केले आहे की, भारतात अनेक ठिकाणी जांभूळ वने आहेत. मराठी साहित्यामध्येही जांभूळ अनेक ठिकाणी दिसते. शांता शेळके यांनी आपल्या काव्यात…

चिंब चिंब जांभूळ राणी, मेघ मंद्र घुमती गाणी
मुके भाव हृदयामधले, शब्द रूप होती
असे वर्णन केले आहे.

जैत रे जैत या मराठी चित्रपटात यावर….

जांभूळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाज जी
हे गाणे आलेले आहे.
यावरून जांभूळ हे झाड आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे आहे, असे दिसून येते.

🎯 पर्यावरणीय महत्त्व
पर्यावरणात या झाडाला खूप महत्त्व आहे. हे झाड महाकाय पद्धतीने वाढते. याच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर घेऊन जातात. या झाडाची पाने व साल जाड असते. त्यामुळे यामधून बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे खूप कमी पाण्यात हे झाड येते तसेच कडक उन्हाळ्यामध्ये ही झाडे हिरवीगार असतात. या झाडाला प्रचंड फुलोरा येतो. या भोवताली मधमाशा मोठ्या संख्येने येतात व परागीभवन करतात. ज्यावेळी पक्षांना खायला काही नसते, अशावेळी पक्षी जांभूळ खाऊन जगतात. हे झाड मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देते. हे झाड चिवट व लवचिक असते. त्यामुळे जंगलांच्या कडेने, किंवा फळबागेच्या कडेने लावल्यास मोठ्या वादळात झाडांचे रक्षण करतात. हे झाड ठिसूळ असल्यामुळे या झाडावर आपण चढलो तर फांद्या लवकर मोडतात. त्यामुळे ही झाडे घराच्या जवळ लावत नाहीत.

🎯 अर्थशास्त्रीय महत्त्व
आजच्या काळात जांभूळ ही झाडे दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे या फळांची मागणी वाढत आहे. ही फळे आरोग्याला हितकारी असल्याने याचा समावेश आहारात होतो. खाण्यासाठी या फळाची मागणी आज प्रचंड आहे. त्या मानाने हे फळ उपलब्ध नाही. आधुनिक शेतीमध्ये जांभूळ या झाडाची लागवड फळबाग स्वरुपात होऊ लागली आहे. अनेक नवीन जाती या झाडाच्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कमीतकमी वेळात या झाडांचा फळे लागतात. आज व्यापारी तत्त्वावर जांभूळ शेतीला चांगले दिवस आलेले आहेत. जांभूळ या फळावर प्रक्रिया करून अनेक उत्पादने बनविता येतात. यातूनही आपण मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करू शकतो.

🎯 आयुर्वेदिक महत्त्व
प्राचीन काळापासून जांभळाच्या विविध घटकांपासून अनेक रोगांवर औषधे बनविली जात आहेत. जांभूळ हा चरका चार्यानुसार मूत्रसंग्रहणीय गणात आलेला आहे. त्यामुळे ज्या आजारात मूत्राचे प्रमाण वाढते, विशेषत: प्रमेहामध्ये जांभूळ मूत्राचे शोषण करून मूत्रप्रवृत्ती कमी करतो. जांभूळ हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी जांभूळ फळाचा उपयोग केला जातो. त्यामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप उपयुक्त आहेत. लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर असते.

🎯 जांभूळ संगोपन
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जांभूळ संगोपन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक झाड आपल्या शेतात लावले पाहिजे. ज्यांच्याकडे शेती नाही, अशा लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जांभळाची झाडे लावण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. मागील चार वर्षांपासून नागर फाऊंडेशन जांभूळ संगोपन करत आहे. चिंतामणी मंदिर परिसरात एक जांभूळ वन प्रकल्प आपण केला आहे तसेच नागर उद्यान प्रकल्पात 1,000 जांभळाची झाडे यशस्वी झालेली आहेत. स्मशानभूमीमध्ये अनेक झाडे यशस्वी झालेली आहेत. आपण 1,000 जांभळाची झाडे विविध कार्यक्रमामध्ये भेट स्वरुपात दिली आहेत. या प्रकारे जवळपास 3,000 पेक्षा जास्त झाडे आपण लावली आहेत. आजही यावर कार्य सूरू आहे. नागर फाऊंडेशन वतीने सर्वांना आवाहन करत आहे की, प्रत्येकाने जांभूळ झाड लावावे किंवा लावण्यासाठी सहकार्य करावे.

🔆 झाडे लावा…. झाडे जगवा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!