Rain, Cyclone, MJO : सध्याचा पाऊस ‘पश्चिमी झंजावात’ तर चक्रीवादळ ‘एमजेओ’मुळेच
1 min readउत्तर महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी (दि. 25 नाेव्हेंबर) अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाची तीव्रता रविवार (दि. 26 नाेव्हेंबर) व साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) कायम राहणार आहे. त्यानंतर बुधवार (दि.29 नोव्हेंबर)पासून मात्र थंडीची हळूहळू सुरुवात जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमक्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सध्या भारतीय विषववृत्तीय सागरीय परिक्षेत्रात प्रवेशलेला ‘मॅडन ज्युलीयन ऑसिलेशन’ (Madden–Julian oscillation) एकपेक्षा अधिक ॲम्प्लिटुडच्या घेराने कार्यरत असल्यामुळे दक्षिण थायलंड व अंदमान व निकोबारच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात 3 ते 6 किमी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी कमी दाब क्षेत्र तयार होवून चक्रीवादळाची बिजे रोवण्याची व त्याची समुद्रात वायव्यकडे मार्गस्थ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या दिशा व विकासनावरच पुढील वातावरणीय परिणाम जाणवेल.
🔆 पश्चिम हिमालयीन क्षेत्रात एक सौम्य पश्चिमी झंजावात गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) पुन्हा आपला परिणाम दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🔆 मुंबईसह संपूर्ण कोकणात रविवारी (दि. 26 नाेव्हेंबर) व साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) अवकाळी पावसाची तीव्रता काहीशी कमी असून, गारपिटीची शक्यता नाही.
🔆 नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात रविवारी (दि. 26 नाेव्हेंबर) व साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) अवकाळी पावसाची तीव्रता थाेडी अधिक आहे. रविवारी (दि. 26 नाेव्हेंबर) गारपीट होण्याची शक्यता असून, साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) ही शक्यता कमी आहे.
🔆 मराठवाड्यात दि. 26 नाेव्हेंबर) व साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) अवकाळी पावसाची तीव्रता वाढून दोन्ही दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे.
🔆 विदर्भात साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) व मंगळवारी (दि. 28 नाेव्हेंबर) अवकाळी पावसाची तीव्रता वाढणार असून, साेमवारी (दि. 27 नाेव्हेंबर) काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. 28 नाेव्हेंबर) केवळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.