Orange Export Facilitation Centre : विदर्भात नागपुरी संत्रा निर्यात सुविधा केंद्रांची वाणवा
1 min read🌎 संत्रा निर्यातीची पार्श्वभूमी
महाराष्ट्रातील तत्कालीन पणनमंत्री गणपतराव देशमुख नागपुरी संत्र्याच्या निर्याती सन 2003-04 मध्ये 100 टक्के सबसिडी दिली हाेती. त्यावर्षी भारतातून 15 कंटेनर नागपुरी संत्रा निर्यात करण्यात आला हाेता. यातील सात कंटेनर युराेपीय राष्ट्रांमध्ये तर आठ कंटेनर दुबईत पाठविण्यात आले हाेते. युराेपीय राष्ट्रांमध्ये केली जाणारी संत्रा निर्यात तांत्रिक कारणांमुळे थांबली. याच काळात संत्रा निर्यातीचे मार्ग शाेधणे सुरू झाले.
🌎 रेसिड्यू फ्री सर्टिफिकेट
युराेपीयन राष्ट्रांमध्ये भारतीय शेतमालाला माेठी मागणी आहे. त्यात नागपुरी संत्राचाही समावेश आहे. मात्र, त्यांना किटकनाशमुक्त शेतमाल हवा असताे. त्यासाठी आधी त्यांना रेसिड्यू फ्री सर्टिफिकेट (Residue Free Certificate) सादर करावे लागते. प्रयाेगशाळेत संत्राची तपासणी करून रेसिड्यू फ्री सर्टिफिकेट मिळवावे लागते. त्या संत्रामध्ये किटकनाशकाचे अंश आढळून आल्याने युराेपीयन राष्ट्र संत्रा अथवा इतर शेतमाल खरेदी करण्यास स्पष्ट नकार देतात. बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, दुबई व आखाती देशांमध्ये मात्र रिसिड्यू फ्री सर्टिफिकेट फारसी मागणी केली जात नाही.
🌎 बांगलादेशने लावला आयात शुल्क
बांगलादेश नागपुरी संत्र्याचा सर्वात माेठा आयातदार आहे. सन 2005 पासून खऱ्या अर्थाने बांगलादेशात संत्र्याच्या निर्यातीला सुरुवात झाली. सन 2019-20 पर्यंत दरवर्षी सरासरी 1.50 लाख मेट्रिक टन संत्रा बांगलादेशात निर्यात केला जायचा. बांगलादेश सरकारने ऑक्टाेबर 2019 मध्ये संत्रावर प्रति किलाे 20 रुपये आयात शुल्क लावला. सन 2020 मध्ये हा शुल्क प्रति किलाे 30 रुपये करण्यात आला तर 2021 मध्ये 51 रुपये, 2022 मध्ये 63 रुपये आणि 2023 मध्ये प्रति किलाे 88 रुपये करण्यात आला. परिणामी, नागपुरी संत्र्याची बांगलादेशातील सरासरी निर्यात 1.50 लाख मेट्रिक टनांवरून 65 हजार मेट्रिक टनावर आली आहे.
🌎 वाहतूक खर्च वाढताे
बांगलादेश, नेपाळ व भूतान वगळता श्रीलंका तसेच युराेपीयन व आखाती राष्ट्रांमध्ये संत्रा निर्यात करावयाचा झाल्यास वाहतुकीसाठी एअर कार्गाे किंवा जहाजाची आवश्यकता असते. दुर्दैवाने भारतात संत्राच्या वाहतुकीसाठी अजूनही एअर कार्गाेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे या देशांमध्ये जहाजाद्वारे संत्रा पाठवावा लागताे. युराेपीयन राष्ट्रांमध्ये जहाजाने संत्रा पाेहाेचण्यास बरेच दिवस जागतात. संत्राचे सेल्फ लाईफ कमी असल्याने नाशिवंत आहे. त्यामुळे संत्राच्या वाहतुकीसाठी प्री कुल्ड कंटेनरची नितांत आवश्यकता आहे. सेल्फ लाईफ वाढविण्यासाठी संत्रा आधी ग्रेडिंग, वाॅशिंग, ड्राईंग व काेटिंग करून विशिष्ट तापमानात एअर कुल्ड बाॅक्समध्ये पॅक करून ते बाॅक्स प्री कुल्ड कंटेनरमध्ये ठेवावे लागतात. पॅक केलेला कंटेनर त्या देशातील बाजारपेठेत पाेहाेचपर्यंत कुठल्याही परिस्थिती कंटेनर बदलता येत नाही. कंटेनर किरायाने घ्यावे लागतात. शिवाय, ते हाताळण्यासाठी वेगळी व स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. त्यामुळे संत्राच्या वाहतुकीचा खर्च वाढताे. बांगलादेश, नेपाळ व भूतान या देशामुळे संत्रा निर्यात करण्यासाठी प्री कुल्ड कंटेनरची आवश्यकता नसते. संत्रा प्लास्टिक क्रेटमध्ये ठेवून ट्रकद्वारे पाठविला जाताे. यात वाहतूक खर्च कमी येताे.
🌎 राज्य सरकारचे अपयश
तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी विदर्भातील काटाेल, जिल्हा नागपूर व मायवाडी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती या दाेन ठिकाणी संत्रा निर्यात सुविधा केंद्र मंजूर केले. मुख्यमंत्री शरद पवार यांनी या दाेन्ही ठिकाणी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (MAIDC – Maharashtra Agro Industries Development Corporation) या केंद्रांची निर्मिती केली. मात्र, MAIDC हे दाेन्ही केंद्र चालवू शकले नाही. काटाेल येथील केंद्राचा वाद न्यायप्रविष्ठ असून, मायवाडी, ता. माेर्शी येथील केंद्र महाऑरेंजने चालवायला घेतले आहे. सन 1989 नंतर विदर्भात पाच खासगी संत्रा निर्यात सुविधा केंद्र सुरू झाले आहेत. यातील दाेन केंद्रात एअर कुल्ड बाॅक्स व प्री कुल्ड कंटेनरची सुविधा असून, इतर तीन केंद्रांमध्ये संत्र्याचे केवळ ग्रेडिंग, वाॅशिंग, ड्राईंग व काेटिंग केले जाते.
🌎 संत्रा निर्यातीसाठी या बाबी आवश्यक
🔆 शेतमाल निर्यातीचा विशिष्ट प्राेटाेकाॅल असताे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने विविध देशांसाठी या प्राेटाेकाॅलमध्ये नागपुरी संत्र्याचा समावेश करायला हवा.
🔆 काेणत्या देशात काेणत्या प्रकारचा संत्रा खाण्यासाठी वापरला जाताे, याची माहितीही कुणी संत्रा उत्पादकांना देऊन त्यावर आयसीएआर-सीसीआरआय (Indian Council of Agricultural Research – Central Citrus Research Institute) संशाेधन करून ते शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे.
🔆 संत्राची रेसिड्यू फ्री टेस्ट करण्यासाठी प्रयाेगशाळात तयार करायला हव्या.
🔆 संत्रा निर्यात वाढवायची असल्यास सरकारने पाेषक वातावरण तयार करून संत्रा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी संत्रा निर्यातीला सबसिडी देणे आवश्यक आहे.
🔆 सरकारने विदर्भात किमान चार अद्ययावत संत्रा निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करायला हवी.
🔆 नाशिवंत शेतमालाच्या निर्यातीसाठी स्वतंत्र धाेरण आखायला हवे.
नागपूर विमानतळावर एअर कार्गाे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
🔆 संत्राची निर्यात अपेडा (APEDA – Agricultural and Processed Food Products Export Development Authority) किंवा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून करायला हवी.
🔆 संत्रा निर्यात काेणत्याही परिस्थितीत प्रभावित हाेणार नाही, निर्यातीवर काेणत्याही राजकीय भूमिकेचा परिणाम हाेणार नाही, असे प्रभावी धाेरण आवश्यक आहे.
संत्रा निर्यातीसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. केंद्र व राज्य सरकारने तसेच संत्रा पट्ट्यातील लाेकप्रतिनिधी व नेत्यांनी अपेडा व एमएआयडीसीच्या माध्यमातून संत्रा निर्यात सुविधा केंद्रांच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे लक्षच दिले नाही. त्यांनी आता तरी ही बाब गांभीर्याने मनावर घ्यावी.