krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Mahatma Jyotirao Phule : आधुनिक शेतीचे जनक : महात्मा ज्योतीराव फुले

1 min read
Mahatma Jyotirao Phule : सर्व महापुरुषांमध्ये अग्रपूजेचा मान मात्र ज्योतीराव फुले (Jyotirao Phule) यांनाच मिळतो, असे म्हटले तर चुक होणार नाही. कारण सामाजिक सुधारणेच्या बाबतीत अनेक लोक बोलतात, परंतु जे कृतीत आणतात ते अपवादच म्हणावे लागेल, असे असणारे ज्योतीरावच! महात्मा फुले यांच्या समाजकार्यात शेतकऱ्यांना (Farmer) फार महत्त्वाचे स्थान होते. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ज्योतीरावांचा ग्रंथ अनेक दृष्टीने अद्वितीय आहे. या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या अवनत स्थितीचे विदारक चित्र रेखाटले आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक कशी होते? याचे विवेचन त्यांनी या ग्रंथात अत्यंत पोटतिडकीने केले आहे.

फक्त वर्णन करून ज्योतीराव फुले थांबले नाहीत तर शेतकऱ्यांचे प्रश्न ब्रिटीश शासन दरबारी मांडले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सभेसमोर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागणी केली. शेतकऱ्यांची चळवळ सुरू करणारे महात्मा फुले हे पहिले नेते होते. शेतकऱ्यांच्या दैन्याचे वर्णन करताना लिहितात,
“उघडी नागडी रानोमाळ
पोरे फिरती सदासर्वकाळ!”

महात्मा फुले यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चिंतन केलेले आढळून येते, ते केवळ प्रश्नांचे विवेचन करून व शासन दरबारी प्रश्न मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी या प्रश्नासंबंधी अनेक उपाययोजना सुद्धा सरकारला सुचविल्या होत्या. यावरून शेतीसंबंधी त्यांच्या द्रष्टेपणा स्पष्ट होतो. शेतीसंबंधीची आधुनिक व क्रांतीकारी तत्वप्रणाली त्यांच्या विचारातुन स्पष्ट होते. ज्योतीराव त्यांच्या या प्रश्नांची उकल करताना लिहितात. “आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व शेतकऱ्यास युरोपियन शेतकऱ्यांसारखे विद्यादान देवून त्यास त्यासारखी यंत्राद्वारे शेती कामे करण्यापुरती समज येईतो पशुहत्या बंद करावी, म्हणजे येथील शुद्र शेतकऱ्यांना बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेतांची मशागत भरपूर करता येईल.”

“पोलीस खात्यातीत काळ्या गोऱ्या शिपायांकडून जागोजागी तलाव वजा बंधारे अशारीतीने बांधावे की, वळवाचे पाणी शेतातून मुरून नंतर नदीनाल्यात मिळावे. असे केल्याने शेते फार सुपिक होतील. सर्व डोंगर टेकड्यांमधील दऱ्याखोऱ्यात तलाव तळी जितकी होतील, तितकी सोयीसोयीने बांधून काढावीत. सर्व शेते धुवुन त्यामध्ये खोंगळ्या पडु नयेत म्हणून सरकारने शेतकऱ्यांकडून पाणलोटाच्या बाजूने शेताच्या बांधणीवरचे ताली दुरुस्त ठेवाव्यात.” यावरून असे दिसून येते की, पाणी व मातीचे महत्त्व त्या काळात जाणून पाणी आडवा व पाणी जिरवा, पाणलोट क्षेत्र विकास मृद व जलसंधारण इत्यादी कामासंबंधीचे महत्त्व त्या काळात त्यांनी जाणले होते. इतर देशातील नाना प्रकारच्या उत्तम गायी, शेळ्या मेंढरांची वेणी खरेदी करून या आपल्या देशात आणुन त्यांची येथे उत्पत्ती केल्यास दुधाबरोबरच सर्व शेतास त्यांच्या मलमुत्रापासुन चांगल्याप्रकारे शेणखत मिळल्याने जमिनी सुपिक होतील. तसेच त्यांच्या लोकरीपासून शेतकऱ्यांना फायदा होईल.

ज्योतीरावांनी त्यांच्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठी इंग्रज सरकारकडे दरवर्षी श्रावण महिन्यात कृषी प्रदर्शन भरविण्याचे तसेच अश्विन महिन्यात शेतपिकांचे व औत हाकणाऱ्यांची परीक्षा घेवून उत्तम शेतकऱ्यास बक्षिसे देण्याची वहिवाट घालून शेतकऱ्यास पदव्या द्याव्यात व शेतकऱ्यांच्या मुलांनी आपली शेते उत्तम प्रकारची वजवुन त्यांनी थोड्या थोड्या परीक्षा दिल्यास त्यांना सरकारी खर्चाने अभ्यासाद्वारे परदेशात शेतकऱ्यांच्या सहली आयोजित करण्याविषयी सुचविले. त्याद्वारे इकडील शेतकरी आपल्या शेतीची सुधारणा करून सुखी होईल. या सुचनांमधील सखोल व गर्भीत अर्थ ध्यानात घेतला तर महात्मा फुले यांच्या पारदर्शक दृष्टीचा पुरेपूर प्रत्यय येतो. ज्योतीरावांनी पुरस्कार केलेल्या व अंगिकारलेल्या विविध शेती सुधारणा आज देशभरातील शेती संशोधनात कृषी शास्त्रज्ञांनी 100 वर्षानंतर स्वीकारल्याचे आढळून येते.

शेतीला प्राधान्य मिळाले पाहिजे. शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आणि शेतकऱ्यांची उन्नती होवून देश भरभराटीस गेला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. परंतु, येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. खोत आणि सावकार यांच्यामुळे त्यांची पिळवणूक होत आहे. शेतीवर गैरवाजवी कर आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. असे महात्मा फुले यांना सतत वाटत होते. परिणामी त्यांनी उत्तम शेती करण्यासाठी नवीन अवजारे, सुधारीत बियाणे, विहिरी खोदण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देणे, पाणी अडवून ओलिताची सोय करणे, शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी प्रदर्शने आयोजित करणे, शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे, सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा इत्यादीचा शेतात वापर करणे, चांगल्या दुभत्या गायी, वैरणाची व्यवस्था करणे तसेच उत्पादनक्षमता कमी होऊ नये म्हणून सतत पिके घेऊ नये त्यसाठी जमिनीस विश्रांतीची गरज असते, असे त्या काळात त्यांनी सुचविले होते. याशिवाय शेतकऱ्यांचे जीवन सुदृढ व्हावे, त्यांना कृषी, शेती संदर्भातील छापील पुस्तके दिले पाहिजे, जेणेकरून तो शास्त्रोक्त पद्धतीने शेती करेल.

‘सत्यमेव जयते’ हे त्यांचे ब्रीद होते. तेच आपल्या राष्ट्रीय बोधचिन्हामध्ये आहे. यावरून ज्योतीरावांची समाज आणि देश प्रगतीबद्दलची तळमळ किती तीव्र होती, हे दिसून येते. ज्योतीरावांनी दीनबंधू हे पत्रक चालविले. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तके लिहली. सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झाला. सामाजिक क्रांतीचे उदगाते आधुनिक शेतीचे जनक म्हणून त्यांचे नाव चिरस्मरणीय झाले.

आज आपण 21 व्या शतकात महात्मा फुले यांचा अभिप्रेत असलेला आदर्श शेती व शोषणमुक्त शेतकरी यासाठी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून कृतीची साथ दिली तरच ज्योतीरावांनी पाहिलेले स्वप्न 133 वर्षानंतर साकार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!