Karanj tree : सदाहरित वृक्ष – करंज!
1 min read🌳 झाडाची रचना
करंज साधारण 15 ते 20 मीटर उंचीपर्यंत वाढते. पण काही ठिकाणी 30 मीटर उंचीपर्यंत वाढले आहे. खोड काहीसे पसरट असते. खोडाची साल मऊ, गुळगुळीत किंवा गाठीयुक्त असून, रंगांनी हिरवी-राखाडी असते. झाडाचा पर्ण संभार पसरणारा असतो. पाने एकांतरित, संयुक्त व विषमपर्णी असतात. 6 इंच ते 12 इंच लांब असणाऱ्या पानामध्ये पाच, सात किंवा नऊ लंबगोलाकार, टोकदार पर्णिका असतात. ती अत्यंत तुकतुकीत, मऊ, मुलायम, चमकदार, पोपटी-हिरव्या आणि तजेलदार वर्णाची असतात. म्हणूनच या झाडाच्या चमकत्या पालवीवरून त्याच्या ‘स्निग्धपत्र’ नावाची सार्थता पटते. साधारण एप्रिल ते जूनमध्ये झाड फुलांनी बहरून जाते. पान आणि खोडाच्या खोबणीमधून मंजिऱ्या बाहेर पडतात. त्यावर अतिशय लहान देठाच्या, तपकिरी कळ्या बाहेर पडतात. कळ्या उमलून त्याचे फिक्या गुलाबी, जांभळट फुलांत रुपांतर होते.
🌳 पर्यावरणीय महत्त्व
करंज या झाडाला निसर्गात खूप महत्त्व आहे. हे झाड खडकाळ, डोंगराळ मुरमाड जमीन तसेच चिकन व काळी माती, अशा सर्व प्रकारचा जमिनींत चांगले वाढते. या झाडाला खूप कमी पाणी लागते. दुष्काळी भागात हे झाड एक वरदान आहे. या झाडाची पाणी मुरविण्याची व साठविण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यांच्या मुळ्या जमिनींत खोलवर जातात. ज्यामुळे पावसाचे पाणी या मुळ्या जमिनींत खोलपर्यंत मुरवितात. हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडतात व धूळ शोषून घेण्याचे कामही करते. उन्हाळ्यात या झाडाला फुलोरा येतो, यावेळी पक्षांना अन्न यातून मिळते. वातावरणात गारवा निर्माण करण्याचे कार्य हे झाड करते. त्यामुळे पाऊस पडण्यास देखील या झाडाचा उपयोग होतो.
🌳 अर्थशास्त्रीय महत्त्व
करंज हे झाड अतिशय कमी पाण्यात येणारे झाड आहे. या झाडाला कोणतेही जनावर खात नाही. त्यामुळे या झाडांची शेती दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. याचे लाकूड मजबूत आणि टणक असते. याचा वापर शेतीतील अवजारे, फर्निचर व घरे बांधण्यासाठी होतो. या लाकडाला चांगली किंमत मिळते. या झाडाला ज्या बिया येतात, त्या बियांपासून तेल बनविता येते. हे तेल सांधेदुखीवर अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे या तेलाला प्रचंड मागणी आहे. या तेलापासून भरपूर नफा घेता येतो. शेतीमध्ये लागणारे नैसर्गिक औषधांमध्ये करंज हे प्रमुख झाड आहे. यामुळे या झाडापासून शेतकऱ्यांना भरपूर फायदा घेता येतो.
🌳 आयुर्वेदिक महत्त्व
आयुर्वेदातील करंज हा एक प्रमुख वृक्ष आहे. ‘करं जनयति इति करंज’ असा उल्लेख आयुर्वेदात या झाडाचा आला आहे. करंजाच्या बिया त्यातील तेलासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगधंद्यात व औषधात त्याचा उपयोग होतो. करंजाच्या बियांमध्ये अपचनकारक तत्त्वे असून, त्यांचा विषारी परिणाम अन्नातून बियांचे चूर्ण किंवा पेंड दिल्यास प्राण्यांवर दिसून येतो. करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी, वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात. या तेलाचा औषधी उपयोग आयुर्वेदात विशद केला आहे. करंज तेल पिवळट रंगाचे असून, दीर्घकाल साठवणीनंतर ते अधिक गडद रंगाचे होते. तेलाचा उग्र गंध असून, ते कडू असते. हे तेल विविध त्वचा रोग व सांधेदुखीवर गुणकारी आहे. या तेलाने कुष्ठरोग बरा होऊन झडलेल्या बोटे बरे होऊन त्यावर नवीन त्वचा येते. शेतीमधील तसेच जनावरांची अनेक औषधे या झाडापासून बनवितात.
🌳 करंज संगोपन
करंज हे झाड अतिशय उपयोगी तसेच गुणकारी आहे. तरीही याचे महत्त्व समाजाला अद्याप पटलेले नाही. आज हे झाड अतिशय दुर्मिळ झाले आहे. कारण याची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परंतु, याची लागवड अजिबात झाली नाही. या झाडाला अतिशय कमी पाऊस तसेच कुंपणाची गरज नाही. यामुळे याची फक्त लागवड करणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर खूप कमी मेहनतीत ते मोठे होते. मागील चार वर्षांमध्ये नागर फाऊंडेशनच्या माध्यमातुन आम्ही शेकडो करंज झाडे गावात, स्मशानभूमी, मंदिरे तसेच डोंगरात लावली आहेत. आज ती वेगाने वाढत आहेत. सर्वांना आवाहन आहे की, प्रत्येकाने स्वतःला जेथे शक्य होईल, तेथे हे झाड लावावे व त्याचे संगोपन करावे.
🌳 झाडे लावा…., झाडे जगवा…..!