krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cloudy weather, cyclonic storm : पुढील चार दिवस ढगाळ वातावरण तर डिसेंबरमध्ये चक्रीवादळ

1 min read
Cloudy weather, cyclonic storm : कार्तिक एकादशी (गुरुवार, दि. 23 नाेव्हेंबर) ते कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा (रविवार, दि. 26 नोव्हेंबर) या चार दिवसांच्या काळात अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यामुळे (Cyclonic wind) महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची (Cloudy weather) तसेच मर्यादित क्षेत्रात रब्बी ज्वारी व हरभऱ्याच्या पिकांना वरदान ठरू शकणाऱ्या मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे थंडीचे (Cold) प्रमाण थाेडे कमी हाेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

साेमवार (दि. 20 नाेव्हेंबर)पासून 15 दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) या काळात बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची (cyclonic storm) शक्यता बळावली आहे. ते चक्रीवादळ बांगलादेशकडे वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्या वादळाचा फारसा धोकाही नाही. त्या चक्रीवादळापासून पाऊस काेसळण्याची व रब्बी पिकांना फायदा हाेण्याची शक्यता नाही.

सध्या एल निनो (El Nino) मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना, पण त्याचे अस्तित्व कायम आहे. शिवाय, पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी (IOD – Indian Ocean Dipole) पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एमजेओ (MJO – Madden-Julian Oscillation)) सध्या फेज-2 मध्ये असून, तो माघारी फिरून फेज-6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

दरवर्षी जशी थंडी असते, तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री सेल्सिअस दरम्यान किमान तापमान असू शकते. याचाच अर्थ थंडीचे अस्तित्व नकारात्मकतेकडे नाही. तरीही नाेव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवेल. तुलनेत खानदेशात थंडीचे प्रमाण अधिक असेल.

वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या व तामिळनाडू व केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ‘पूर्वी वारा झोता:तून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रतही थंडी जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

1 thought on “Cloudy weather, cyclonic storm : पुढील चार दिवस ढगाळ वातावरण तर डिसेंबरमध्ये चक्रीवादळ

  1. शेती विषयक व हवामान अंदाज माहिती मिळणे साठी विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!