Returning Monsoon Alert : मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थानातून सुरू
1 min readनैऋत्य मान्सून राजस्थानातून साेमवारपासून माघारी फिरला आहे. जमिनीवर दीड किमी पर्यंतची प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती, गेले पाच दिवस विभागात नसलेला पाऊस आणि उपग्रह चित्रातून विभागात दिसणारा आर्द्रतेचा (Humidity) अभाव या बाबी विचारात घेता, मान्सून महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबरला परत फिरण्यास सुरुवात करू शकते. दक्षिण छत्तीसगडमधील बस्तर, दांतेवाडापासून महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी राजापूर पर्यंतची साडेचार किमी उंचीवर असलेल्या 1,200 मीटरच्या हवेच्या कमी दाबाच्या घळीमुळे साेमवार (दि. 25 सप्टेंबर)पासून पुढील चार दिवस म्हणजे गुरुवार (दि. 28 सप्टेंबर) पर्यंत विदर्भ वगळता मुंबईसह राज्यातील इतर 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाल्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
आधी वर्तविलेल्या शक्यतेनुसार हवामान विभागाने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घाेषणा साेमवारी केली. राजस्थानच्या निर्धारित भागात पाच दिवसांपासून पावसाची उघडीप, पाण्याच्या बाष्पात सूचित करणारी काेरड्या हवामानाची चिन्हे आणि जमिनीवर दीड किमीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची (cyclic winds) स्थिती यामुळे नैऋत्य मान्सून परत फिरल्याची घाेषणा हवामान विभागाने केली.
नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरू असतो.