Rain forecast : विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम
1 min read🔆 मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूर पर्यंतच्या 10 व मराठवाड्यातील सर्व आठ अशा एकूण 18 जिल्ह्यात रविवार (दि. 24 सप्टेंबर) व साेमवार (दि. 25 सप्टेंबर)ला पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मंगळवार (दि.26 सप्टेंबर) ते 5 ऑक्टोबर या 10 दिवसात पुन्हा याच विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
🔆 सध्याचा पाऊस मान्सूनचा असून, कदाचित रविवार (दि. 5 ऑक्टोबर)पासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात होवू शकते.
🔆 रब्बी हंगामासाठी सर्वात महत्त्वाच्या पहिल्या आवर्तनातून महाराष्ट्राला हमखास पाऊस देणारी पूर्व-पश्चिम जाणारी कमी दाब क्षेत्र प्रणाली पूर्व मध्य प्रदेशातून काहीशी उत्तरेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रातील खानदेश वगळता 16 ते 19 सप्टेंबर या चार दिवसादरम्यानचा महाराष्ट्रासाठीचा खात्रीचा हंगाम तारून नेणारा की ज्यावर हंगामातील शेवटच्या टप्प्यातील अपेक्षित पावसाची भिस्त होती, तो पाऊस त्यामुळे हिरावला गेला व त्याने महाराष्ट्रातील सिंचनाचे सर्व गणित चुकवले.
🔆 महाराष्ट्राऐवजी या पावसामुळे मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश येथील नद्या ओसांडून वाहात असून, धरणे भरली आहेत. मात्र, महाराष्ट्र कोरडाच राहिला.
🔆 सध्या ‘मान्सून आस’ सरासरी जागेपासून दक्षिणेलाच असून पश्चिम बंगालच्या उपसागरातील साडेसात किमी. उंचीचे कमी दाब क्षेत्र सध्या झारखंड व सभोवताल परिसरात स्थित आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची तर मुंबईसह कोकणात मात्र जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली हाेती. 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण व नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यताही जाणवते.
🎯 कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाईल काय?
हे कमी दाब क्षेत्र झारखंडवर स्थित आहे. म्हणजे हे देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच जाईल काय? त्याचा संभाव्य मार्ग कसा राहील? असा प्रश्न एका शेतकऱ्याने उपस्थित केला. त्या शेतकऱ्याला दिलेले उत्तर प्रबोधनासाठी पुन्हा येथे देत आहे.
‘झारखंड महाराष्ट्रापासून जरी दूर असला तरी तेथील जबरदस्त कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्राहून वाहणारे बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांना तसेच आंध्र प्रदेशवरून घुसणारी बंगाल मोसमी शाखेलाही ऊर्जा मिळते. ते कोकणात आणि मध्य भारतात पाऊस पडण्यास प्रणाली अनुकूल ठरते. त्याचबरोबर गुजरातमध्ये पाऊस पाडून शेष कमी दाबक्षेत्र राजस्थान दिशेकडे सरकल्यामुळे अरबी समुद्र ते शेष क्षेत्रपर्यंत कमी दाबाची घळ तयार झाल्यामुळे ही बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अजून अधिक ताकद मिळत आहे. म्हणून या सहा दिवसात पावसाची शक्यता वाढली आहे.
🔆 आता राहिला तुमचा प्रश्न की, कमी दाब क्षेत्राची दिशा काय असू शकते? आणि ती महाराष्ट्राला समांतर उत्तरेकडून जाईल काय? म्हणजे महाराष्ट्रात अधिक पाऊस पडेल काय?
ही प्रणाली सरळ उत्तर प्रदेशातही जाऊ शकते किंवा मध्य प्रदेशच्या अधिक उत्तेकडूनही जाऊ शकते. तसे झाले तर पुन्हा मध्य प्रदेशातच पाऊस होवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे की मान्सूनचा आस त्यातून जातो. आसाला बळकटी मिळते. महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात पाऊस पडण्यास मदत होते.
मागच्या प्रणालीवरून ह्या प्रणालीचा एकास एक असा अर्थ लावता येणार नाही. कारण प्रणाल्याच्या जागेबरोबर त्यांच्या उंच्या, आसपास असलेल्या इतर प्रणाल्यांचे अस्तित्व याचा एकत्रित परिणाम पाऊस पडण्यावर होत असतो. मला वाटतं संकल्पना समजावयाचा प्रयत्न केला.