krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Kardai Varieties : करडईचे विविध वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये

1 min read
Kardai Varieties : कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पिक (Oilseed crop) म्हणजे करडई (Kardai) होय. करडई हे कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण (Drought crop) सहन करणारे पीक होय. करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करून घेते. या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकूल परिस्थितीत ते तग धरते. या पिकासाठी कमी मजूर लागत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे हे पीक कोरडवाहूसाठी वरदान ठरले आहे. करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकापासून अधिक फायदा मिळवता येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे करडईचे विविध वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत. प्रसारित वाण व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

🎯 भीमा :-
🔆 प्रसारण वर्ष 1982
🔆 महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस.
🔆 अवर्षाणास प्रतिकारक.
🔆 मावा, किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 मर रोगास मध्यम प्रतिकारक.
🔆 तेलाचे प्रमाण 29 ते 30 टक्के.
🔆 फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यावर फिक्कट पांढरा व मध्यभागी लालसर ठिपका.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले कुसुमा :-
🔆 प्रसारण वर्ष 2003
🔆 कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल.
🔆 तेलाचे प्रमाण 30 टक्के.
🔆 पिकाचा कालावधी 135 ते 140 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 एस.एस.एफ. 708
🔆 प्रसारण वर्ष 2010
🔆 पश्चिम महाराष्ट्र लागवडीसाठी योग्य, कोरडवाहू तसेच बागायती.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 फुलाचा रंग उमलताना पिवळा, वाळल्यानंतर लाल.
🔆 तेलाचे प्रमाण 31 टक्के.
🔆 पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले करडई (एस.एस.एफ. 733)
🔆 प्रसारण वर्ष 2011
🔆 कोरडवाहू लागवडीसाठी.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 तेलाचे प्रमाण 29 टक्के.
🔆 फुलाचा रंग उमलताना पांढरा, वाळल्यानंतर फिक्कट पंधरा, झाडांची उंची मध्यम.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 एस.एस.एफ. 748 (फुले चंद्रभागा)
🔆 प्रसारण वर्ष 2012
🔆 कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
🔆 तेलाचे प्रमाण 29 टक्के.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 फुले उमलताना पिवळी पडल्यावर लाल.
🔆 पिकाचा कालवधी 130 ते 140 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले भिवरा (एस.एस.एफ. 13-71)
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
🔆 पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक्षम.
🔆 तेलाचे प्रमाण 29.2 टक्के.
🔆 मर व मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 125 ते 126 दिवस
🔆 उत्पादकता 20 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले निरा (एस.एस.एफ. 12-40 )
🔆 प्रसारण 2020
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
🔆 मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालवधी 120 ते 125 दिवस.
🔆 तेलाचे प्रमाण 32.9 टक्के.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले गोल्ड (एस.एस.एफ. 15-65)
🔆 प्रसारण वर्ष 2021
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
🔆 सर्वाधिक तेलाचे प्रमाण 34.6 टक्के.
🔆 मर रोगास मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस
🔆 उत्पादकता कोरडवाहू 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 फुले किरण (एस.एस.एफ. 16-02)
🔆 प्रसारण वर्ष 2021
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
🔆 तेलाचे प्रमाण 30.5 टक्के.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 125 ते 130 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 24 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 पी.बी.एन.एस.-12
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य.
🔆 मराठवाडा विभागास योग्य.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 पी.बी.एन एस.-86 (पूर्णा )
🔆 मराठवाडा विभागात कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी प्रसारित.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 आय.एस.एफ.-764
🔆 मराठवाड्यासाठी शिफारस.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 अकोला पिंक
🔆 विदर्भात लागवडीसाठी प्रसारित.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 डी.एस.एच.-185 (संकरित वाण)
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 मर रोगास प्रतिकारक.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता कोरडवाहू 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 आर.व्ही.एस.ए.एफ.-18-1 (राज विजय)
🔆 अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य.
🔆 मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
🔆 तेलाचे प्रमाण अधिक 39 टक्के.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवस.
🔆 उत्पादकता 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 एस.एस.एफ.-658
🔆 प्रसारण वर्ष 2008
🔆 बिन काटेरी वाण.
🔆 अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस.
🔆 मावा कीड व मर रोगास मध्यम प्रतिकारक.
🔆 तेलाचे प्रमाण 28 टक्के.
🔆 फुलाचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यावर विटकरी लाल.
🔆 पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 13 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 नारी-6
🔆 प्रसारण वर्ष 2000
🔆 बिन काट्याची पाकळ्या गोळा करण्यास योग्य.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 नारी एन.एच.-1 (संकरित वाण )
🔆 प्रसारण वर्ष 2001
🔆 बिन काट्याचा वाण.
🔆 पाकळ्या गोळा करण्यास योग्य.
🔆 पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर.

🎯 जे.एस.-97
🔆 बिन काट्याचे वाण.
🔆 पाकळ्यासाठी उपयुक्त.
🔆 पिकाचा कालावधी 120 ते 135 दिवस.
🔆 उत्पादकता 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर.

✳️ करडई फुल/पाकळ्यांमधील औषधी गुण
वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणून करडई पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडई फुलाचा इस्ट परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्तवाहिन्यांमधील गाठी होण्याचे प्रमाण कमी हाेते व गाठी विरघळतात. हृदयरोग्यांच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधांच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. या औषधाची मात्र सलग चार आठवडे घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो. चीनमध्ये 62 प्रकारच्या विविध सांधेदुखी व स्नायुदुखीवर करडई पाकळ्यांचा मद्यार्कापासून निर्माण केलेली औषधे प्रभावीपणे कार्य करतात. मणक्याचे आजार (स्पॉडलेसीस), मानदुखी, पाठदुखी इत्यादीवरील आयुर्वेदिक उपचारात करडई पाकळ्या इतर वनऔषधी सोबत वापरल्यास आराम मिळतो.

🎯 करडई लागवड तंत्रज्ञान
🔆 जमीन :- मध्यम ते भारी (खोल)
🔆 वाण :- भीमा, फुले कुसुमा, एसएसएफ-708, फुले करडई, फुले चंद्रभागा.
🔆 बिगर काटेरी वाण :- एसएसएफ-658, नारी-6, नारी एनएच-1
🔆 बियाणे :- 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी
🔆 पेरणीची योग्य वेळ :- 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
🔆 पेरणीचे अंतर :- 45 x20 से.मी.
🔆 खते :- शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे.
50:25:00 नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया व तीन गोण्या एसएसपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे. बागायती करडई पिकास 60 किलो नत्र + 30 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
🔆 बीजप्रक्रिया :- प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्राम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन चोळावे. त्यानंतर 25 ग्राम प्रत्येकी ॲझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

🎯 कीड व रोग नियंत्रण
🔆 करडई पिकास मुख्यतः मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली असता, या किडीचा प्रादुर्भाव बराच कमी होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मावा दिसून आल्यानंतर डायमेथोएट (रोगार) 30 टक्के प्रवाही 725 मिलि. 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
🔆 नवीन शिफारशीनुसार 25 टक्के थायोमेथोक्झाम 100 ग्राम किंवा 20 टक्के प्राईड 100 मिलि + 500 लिटर पाणी प्रति हेक्टरी फवारावे.
🔆 बोंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास 1,000 मिलि 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
🔆 सरकोस्पोरा व अल्टरनेरीया या बुरशीमुळे होणाऱ्या पानावरील ठिपक्यांसाठी डायथेन एम-45, 1250 ग्राम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 1500 ग्राम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.

🎯 बियाण्याची उपलब्धता
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथून करडईचे विविध वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एस. एस. एफ. 708 कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारशीत केलेले, तेलाचे प्रमाण 31 टक्के असलेले, मावा किडीस मध्यम प्रतिकारक, सर्वसाधारणपणे कोरडवाहू क्षेत्रात 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी व बागायती क्षेत्रात 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देणारे हे वाण विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. चार किलोच्या पिशवीची किंमत 480 रुपये असून, अ.भा.सं. करडई संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, रविवार पेठ, दयानंद महाविद्यालया जवळ, सोलापूर येथे (कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 0217-2373047, 2372408, 2373209, मो. 9423335651 या क्रमांकावर संपर्क साधावा.

©️ डॉ. अनिल राजगुरू,
करडई पैदासकार
अ.भा.सं. करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर.
संपर्क :- 9423335631
©️ डॉ. आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ
एकात्मिक शेती पद्धती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,
संपर्क :- 9404032389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!