krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sorghum rates : वाढत्या मागणीमुळे ज्वारीचे दर चढेच राहणार!

1 min read
Sorghum rates : महाराष्ट्र हे ज्वारी पिकवणारे महत्त्वाचे राज्य. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीची (Sorghum) लागवड (Sowing) मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये चारा (fodder) पीक (Crop) म्हणून ज्वारीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात सन 2022-23 च्या खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीचे लागवड क्षेत्र 60 लाख हेक्टर होते. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि सिचंनाची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी ऊस, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला पिकांकडे वळली आहेत. राज्यात अहमदनगर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हे ज्वारी लागवडीत आघाडीवर आहेत. त्याचबरोबर काही प्रमाणात मराठवाडा, विदर्भात ज्वारीची लागवड वाढली आहे.

✳️ ज्वारीचे सरासरी लागवड क्षेत्र
गेल्या काही वर्षापासून रब्बी हंगामातील ज्वारीच्या क्षेत्रात सात्यत्याने घट होत आहे. राज्यात रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी 50 लाख हेक्टर आहे. सन 2022-23 च्या रब्बी हंगामात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात 80 हजार हेक्टरने वाढ होऊन सुमारे 51 लाख 67 हजार 623 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. तरीही रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घटीचा कल कायम दिसून आला. राज्यात रब्बी ज्वारीची सरासरी 17 लाख 36 हजार 238 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सन 2011 मध्ये राज्यात सुमारे 30 लाख हेक्टरवर रब्बी व 10 लाख हेक्टरवर खरीप हंगामात ज्वारीचे पीक घेतले जात होते.

✳️ ज्वारीच्या क्षेत्रात घट का?
गेल्या काही वर्षापासून सातत्याने होणारे हवामानातील बदल (climate change) जून महिन्यात अपेक्षित पाऊस न होणे, त्यामुळे जुलैअखेर पर्यंत खरीपाच्या पेरण्या होतात. त्यामुळे खरीपातील पिकांची काढणी नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू असते. त्यानंतर शेतकऱ्यांना मशागतीस उशीर होतो आणि ज्वारी पेरण्यास विलंब होतो. त्यामुळे बहुतेक शेतकरी ज्वारीची पेरणी टाळतात. जे शेतकरी पेरणी (Sowing) करतात त्यांना काढणीस उशीर होतो म्हणजेच मे उजाडतो. ज्वारीला थंडी जास्त पोषक असते. तापमानात वाढ झाली की अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळत नाही. मागील काही वर्षापासून बदलत्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळाच्या झळा जाणवत आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. शिवाय, काढणीला आलेली ज्वारी अनेकदा मार्च-एप्रिल मधील वादळी पावसात सापडते. त्यामुळे शेतकरी ज्वारीची पेरणी टाळतात. शिवाय बहुतांश ज्वारीही कोरडवाहू / अवर्षणप्रवण क्षेत्रात घेतली जाते. अवर्षण क्षेत्रात सिंचन सुविधा वाढल्याने शेतकऱ्यांचा कल नगदी पिके, ऊस, द्राक्षे, डाळिंब, पालेभाज्याकडे आहे. ज्वारीची पेरणीपासून काढणी पर्यंतची कामे अद्यापही पारंपारिक पद्धतीने मजुरांकडून केली जातात. मजुरीचा वाढलेला खर्च, अपेक्षित उत्पादन न निघणे आणि पोषक हवामानाचा अभाव यामुळे शेतकरी ज्वारीची पेरणी करण्यास धजावत नाहीत.

✳️ आरोग्यदृष्ट्या ज्वारी पिकाला संधी!
🔆 गेल्या दोन दशकापासून देशातील नागरिकांचे राहणीमान तसेच खाद्य पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल झाले आहे. महाराष्ट्रीय लोकांच्या जेवणामध्ये मध्यतंरी गहू, तांदळाचा वापर वाढला होता. चौरस आहार कमी झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, त्वचेच्या आजाराचे प्रमाण वाढले. त्यावर उत्तर म्हणजे ज्वारी होय.
🔆 ज्वारीमध्ये स्टार्चचे हळू प्रमाणात विघटीत होतात, त्यामुळे माणसामध्ये दिसणारे आजार कमी होण्यासाठी ज्वारीचे पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण चांगले आहे.
🔆 स्फुरद, लोह, कॅल्शियमसारखे घटक तसेच थायमिन, रीबोपेल्विन, नायसीन ही जीवनसत्वे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी असलीच पाहिजे.
🔆 ज्वारीच्या बरोबरने बाजरी, नाचणी, सावं, रागी यांचाही वापर खाद्यपदार्थांमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राज्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

✳️ परतीच्या पावसाची साथ
राज्यातील शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम जवळपास गेलाच आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळसदृश (Drought) परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाच्या आशेवर आहेत. राज्यात सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात गोकुळअष्टमी नंतर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात होते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्यांना तब्बल महिन्याभर उशिराने झाल्या. परिणामी, बहुतांश भागात अद्याप शेतात खरीपाची पिके आहेत. मूग, उडीद आता काढणीला आलेले आहेत. महिनाभरात बाजरी काढणीला येईल. त्यानंतर परतीच्या पावसाने साथ दिली तर रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होईल.

✳️ राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या वाणांची ज्वारी उत्पादनात क्रांती
राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी महाराष्ट्रात ज्वारी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन 2023 पर्यंत ज्वारीचे विविध 25 वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित केले आहे. राज्यात एकूण 40 टक्के क्षेत्रावर राहुरीच्या कृषी विद्यापीठाने विकसित वाणांची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सन 2020-21 च्या रब्बी हंगामात 16.6 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये 23 टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, 48 टक्के मध्यम तर 29 टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला 17.4 लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले. राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी 40 टक्के क्षेत्र राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विकसित वाणाखालील आहे. यामध्ये फुले रेवती खालील क्षेत्र 15 टक्के, फुले वसुधा खालील 10 टक्के, फुले सुचित्रा 10 टक्के, फुले अनुराधा 5 टक्के, मालदांडी व इतर स्थानिक वाणाखाली 60 टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. सन 2011-12 पासून म्हणजेच मागील 10 वर्षाचा विचार करता राज्याची ज्वारी उत्पादकता 91 टक्क्यांनी वाढली आहे. ज्वारी उत्पादन 31 टक्क्यांनी वाढले असून, रब्बी ज्वारी खालील क्षेत्र 43 टक्क्यांनी कमी झाले आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होऊन देखील उत्पादन वाढले आहे. ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी वाणांचा व व पंचसूत्री तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे.

✳️ जमिनीचे प्रकार व ज्वारीचे वाण
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचे संशोधन केलेले आहे. त्यामध्ये हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माउली, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा तर भारी जमिनीसाठी फुले वसुधा, बागायतीसाठी फुले रेवती तर ज्वारीच्या इतर उपयोगासाठी म्हणजेच हुरड्यासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी व पापड बनविण्यासाठी फुले रोहिणी या वाणांचे संशोधन केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे वाण आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीत विक्रमी उत्पादन घेता येईल. फुले रेवती हा वाण बागायती क्षेत्रामध्ये खतांना चांगला प्रतिसाद देतो. ज्वारीवर येणाऱ्या खोडमाशी व खडखड्या यासारख्या कीड व रोगांना प्रतिकारक्षम वाण आहे. फुले रेवती वनाच्या भाकरी व कडब्याची चव मालदांडी सारख्या वाणाप्रमाणे असल्यामुळे हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!