krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Heavy rain forecast : या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

1 min read
Heavy rain forecast : चार दिवसांच्या उघडीपीनंतर मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील सर्व जिल्ह्यात गुरुवार (दि. 14 सप्टेंबर) ते बुधवार (दि.20 सप्टेंबर) या सात दिवसात अर्थात पोळा ते ऋषिपंचमी दरम्यानच्या काळात जाेरदार व मुरळधार पाऊस (Heavy rain) बरसणार असल्याचा अंदाज (forecast) हवामान खात्यातील हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याची शास्त्रीय कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.

मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 अशा 18 जिल्ह्यात शुक्रवार (दि. 15 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. 19 सप्टेंबर) म्हणजेच पोळा ते हरतालिका दरम्यानच्या चार दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाचीच शक्यता जाणवते. त्यानंतरच्या पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार (दि. 18 सप्टेंबर) ते शनिवार (दि. 23 सप्टेंबर) गणेशोत्सवादरम्यान या भागात विखुरलेल्या स्वरुपात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

मान्सूनचा ‘आस’ सरासरी मूळ जागेपेक्षा अतिदक्षिणेकडे सरकला आहे. येत्या दाेन दिवसात म्हणजे शनिवार (दि. 16सप्टेंबर) दरम्यान बंगानच्या उपसागरातून स्थलांतरित होणारे व छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यादरम्यान स्थिरावणारे असे साडेसात किमी उंचीपर्यंत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्राहून नैऋत्य मान्सूनी वारे बळकट होवून कोकणातून सह्याद्रीकडे झेपावतील. त्यामुळे कोकण आणि सह्याद्री ओलांडून पश्चिम, उत्तर, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्याच्या काही भागात आर्द्रतायुक्त वारे खेचण्याच्या शक्यतेमुळे या जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

रब्बी हंगामासाठीच्या या अपेक्षित पहिल्या आवर्तनातून दुपारनंतर होणाऱ्या वळीव व गडगडाटी स्वरुपाच्या पावसातून सध्या शतकी टक्केवारीच्या आसपास असणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील व इतरही सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ होवू शकते. कारण, विशेषतः नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर या चार जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरण समूहात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन (25 ते 30 सप्टेंबर आणि 9 ते 13 ऑक्टोबर) आवर्तनातून चांगला पाऊस अपेक्षित आहे. तेव्हा कदाचित धरणे ओसंडून नद्याही पूर पाण्याने खळाळतील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!