Pola festival : पाेळा ‘बैलां’ऐवजी इतर प्राण्यांचा असताे का?
1 min read
🔆 ग्रामीण संस्कृती व सणांची पार्श्वभूमी
आपल्या देशातील बहुतांश सणांना ग्रामीण संस्कृतीची पार्श्वभूमी लाभली आहे. मग, नागपंचमीचा सण असाे की, पाेळा, दिवाळी, मकरसंक्रांत किंवा हाेळी असाे. नागपंचमीला नागाची, पाेळ्याला बैलजाेडींची, दिवाळीला गाईंची, काही समाजात म्हशी व रेड्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या प्राण्यांव्यतिरिक्त दुसऱ्या काेणत्याही पाळीव प्राण्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा सण ग्रामीण संस्कृतीत नाही. ग्रामीण संस्कृती ही पूर्णपणे शेती, त्यात राबणारे प्राणी, शेतीमाल, शेतातील पळस, शमी व इतर काही झाडांच्या अवतीभवती फिरतात.
🔆 पाेळा व पळस
पाेळा व पळसाचे झाड यांचे अतुट नाते आहे. पूर्वी पाेळ्यात नेल्या जाणाऱ्या बैलांसाठी दाेर, कान्ही, चाैरं, मठाठी आदी साहित्य तयार करण्यासाठी वाकाचा वापर करायचे. हा वाक पळसाच्या झाडांच्या मुळ्यांपासून तयार केले जायचे. विशेष म्हणजे मुळ्या ताेडल्यानंतरही पळसाची झाडे वाळत नव्हती. बदलता काळ व वन कर्मचाऱ्यांच्या कारवाईचा ससेमिरा यामुळे अलीकडे शेतकरी वाकाचा वापर करीत नाहीत. पाेळ्याच्या दिवशी दाराच्या दाेन्ही बाजूला मेढे ठेवण्याची प्रथा आजही कायम आहे. मेढे म्हणजे पळसाच्या झाडांच्या फांद्या हाेय. माेठ्या शहरांमध्ये मेढे किमान 10 रुपयाला एक याप्रमाणे विकला जात असल्याने यातून अनेकांचे अर्थार्जनही हाेते. बैलांना पूजा करण्यासाठी व नैवद्य देण्यासाठी पळसाच्या पानांचा वापर केला जाताे.
🔆 ग्रामीण अर्थव्यवस्था माेडकळीस
पूर्वी ‘उत्तम शेती आणि कनिष्ठ नाेकरी’ असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त हाेती. केंद्रातील आजवरच्या सरकारांच्या चुकीच्या धाेरणामुळे सन 1980 च्या दशकापासून ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी हाेत गेली. ‘उत्तम शेती आणि कनिष्ठ नाेकरी’चे रुपांतर ‘उत्तम नाेकरी आणि कनिष्ठ शेती’ यात झाले. ग्रामीण भागातील पैसा व राेजगार शहरांमध्ये केंद्रीत झाल्याने गावे भकास तर शहरे झकास झाली. परिणामी गावागावांमधील बैलजोड्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे भविष्यात पोळ्यातून बैलजोड्या नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🔆 ग्रामीण संस्कृतीवर अतिक्रमण
ग्रामीण भागातील तरुण, तरुणी नाेकरी, व्यवसायानिमित्त शहरात आले आणि काळाच्या ओघात त्यांची विचारसरणीही शहरी हाेत गेली. शहरी संस्कृती वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून ग्रामीण नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात आली. साेशल मीडियातून हा प्रकार पराकाेटीला पाेहाेचला आहे. शहरी संस्कृतीने ग्रामीण संस्कृतीवर अतिक्रमण केल्यााने पूर्वी ग्रामीण संस्कृतीचे असलेले स्वतंत्र अस्तित्व हळूहळू लयास जात आहे. याचा परिणामी ग्रामीण भागातील सणांवर झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था माेडकळीस आल्याने शेतकऱ्यांच्या खिशात साजरे करायला पुरेसे पैसे देखील राहात नाही.
🔆 पाेळा एक ‘इव्हेन्ट’
पाेळा आणि दुसऱ्या दिवशी आयाेजित केला जाणारा तान्हा पाेळा असे दाेन शब्द कित्येक वर्षांपासून रुढ आहेत. पाेळ्यात केवळ आणि केवळ बैलजाेडी व गाेऱ्हे यांनाच सजवून, त्यांची पूजा करून पाेळ्यात नेले जाते. शेतकऱ्यांच्या घरातील इतर काेणत्याही पाळीव प्राण्याला पाेळ्यात सहभागी हाेण्याचा मान मिळाला नाही. मुळात हा सण बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. गाेऱ्हे हे भावी बैल असल्याने त्यांना पाेळ्यात सहभागी हाेण्याचा मान प्राप्त झाला आहे. गाईंच्या कळपात फिरणाऱ्या वळू अथवा सांडाला पाेळ्यात नेले जात नाही किंवा त्याची पूजा केली जात नाही. लहान मुलांना शेतीसंस्कृती कळावी, त्यांना बैलजाेडी व शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी म्हणून तान्हा पाेळा आयाेजित करण्याची प्रथा 117 वर्षांपूर्वी जन्माला आली. तान्हा पाेळ्यात लाकडी बैल (ज्याला नंदीबैल असे संबाेधले जाते) सहभागी गेले जाते. अलीकडे पाेळा आणि तान्हा पाेळा राजकीय इव्हेन्ट (Political events) झाले आहेत. जी राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या लुटीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असतात, या लुटीचे गप्प राहून अथवा व्यक्त हाेऊन समर्थन करतात, अशा व्यक्ती पाेळ्यात व तान्हा पाेळ्यात बैलजाेडी व नंदीबैलांची पूजा करताना, शेतकऱ्यांचा गाैरव तर लहान मुलांना खाऊ व भेटवस्तू देऊन स्वत:ची प्रसिद्धी करताना दिसतात.
🔆 ‘बैल’पाेळा शब्द आला कुठून?
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या ग्रामगीतेपासून तर काही कथा, कादंबऱ्यांमध्ये पाेळ्याचा उल्लेख हा पाेळा म्हणूनच करण्यात आला आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून साेशल मीडियावर फिरणाऱ्या पाेस्टमध्ये हा उल्लेख ‘बैलपाेळा’ असा केला जात आहे. पाेळा हा सण केवळ बैल आणि बैलांचाच असल्याने त्याला बैल हा शब्द पहिल्यांदा कुणी व का जाेडला असावा, हे कळायला मार्ग नाही. कदाचित हा शब्द तथाकथित शहरी साहित्यिकांच्या डाेक्यातून जन्माला आला असावा, ज्यांचा शेती व ग्रामीण संस्कृतीशी काडीचाही संबंध नाही. पण त्यांना शेतकरी व त्यांच्या बैलजाेडीविषयी खाेटी का असेना सहानुभूती व्यक्त करायची असेल. पुढे हा शब्द साेशल मीडियामुळे व्हायरल झाला आणि शेतकऱ्यांच्या शिकल्यासवरल्या मुलांनीही विचार न करता हा शब्द स्वीकारला. ग्रामीण भागात दिवाळीला गाईंची पूजा केली जाते. मग, पाेळ्याला बैलपाेळा म्हटले तर दिवाळीला ‘गाय दिवाळी’ का म्हणू नये?