krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

History of Tanha Pola : तान्हा पाेळ्याचा इतिहास

1 min read
History of Tanha Pola : तान्हा पाेळा (Tanha Pola) विदर्भाव्यतिरिक्त देशात कुठेही साजरा केला जात नाही. पाेळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयाेजित केल्या जाणाऱ्या तान्हा पाेळ्यात लहान मुले लाकडी बैल (नंदीबैल) (wooden bull) सजवून सहभागी हाेतात. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. मुळात या तान्हा पाेळ्याची सुरुवात नागपूर (Nagpur) शहरात 217 वर्षांपूर्वी करण्यात आली आहे.

सन 1806 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून नागपुरात हा उत्सव सुरू केला. त्यावेळी राजे रघुजी महाराज भोसले यांनी लाकडी बैल तयार करून सर्व लहान मुलांना वाटले हाेते. त्या बैलांना जिवंत बैलांप्रमाणे सजविण्यात आले हाेते. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे अशा विविध वस्तू तेथे बांधण्यात आल्या हाेत्या. त्या बैलांजवळ मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात आली.

पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेतले. हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे वाटले हाेते. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली. पुढे तान्हा पाेळ्याची ही परंपरा संपूर्ण विदर्भभर पसरली. या परंपरेला यावर्षी (सन 2023) 217 वर्षे पूर्ण झाली आहेत. राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आजही बघता येतो. या लाकडी बैलांची उंची आठ फूट, लांबी सहा फूट आहे. या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. आज विदर्भातील घराघरांमध्ये किमान एक तरी लाकडी बैल म्हणजेच नंदीबैल बघायला मिळताे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!