Low rainfall forecast : वातावरणीय प्रणाली मार्गबदल; महाराष्ट्रात पावसाचा जाेर कमी हाेणार
1 min readगेल्या 24 तासात झालेल्या याच वातावरणीय प्रणाली बदलातून (Atmospheric system changes) शनिवार ( दि. 16 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. १९ सप्टेंबर) दरम्यानच्या चार दिवसात महाराष्ट्रात अपेक्षित असलेल्या मध्यम ते जोरदार पावसाची तीव्रता यामुळेच कमी झाली आहे. रब्बीच्या या पहिल्या आवर्तनातून महाराष्ट्रात केवळ खान्देश, पालघर, उत्तर विदर्भात (अमरावती, अकोला, बुलढाणा) पावसाने काहीशी समाधानकारक सलामी दिली. सध्या तेथेच व मुंबईसह उत्तर कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.
उर्वरित महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व उर्वरित विदर्भातील जिल्ह्यात पुढील सात दिवसात शनिवार (दि. 23 सप्टेंबर) पर्यंत केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पुढील सात दिवसात शनिवार (दि. 23 सप्टेंबर) पर्यंत पावसाची शक्यता फारच कमी जाणवते, असा अंदाजही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात रविवारी (दि. 17 सप्टेंबर) 1002 ते 1004 हेप्टापास्कल तर सोमवार (दि. 18 सप्टेंबर) ते बुधवार (दि. 20 सप्टेंबर)पर्यंत 1004 ते 1006 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भाग आणि त्यालगतच्या राज्यावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, तिथे रविवारी (दि. 17 सप्टेंबर) 1000 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहून चक्राकार वाऱ्यांची तीव्रता अधिक राहील. गुरुवार (दि. 21 सप्टेंबर)पासून बंगालच्या उपसागरावरील हवेच्या दाबात वाढ होताच महाराष्ट्रातील पावसाचा जाेर कमी होईल. प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअस तर हिंदी महासागरातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहणार असल्याने एल निनो (EI Nino)चा प्रभाव यापुढेही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.