Pola festival Gratitude : नाही बैल बारदान नाही औत फाटा पिठोरीच्या रातीले हंबरतो रिकामाच खुटा
1 min read
खांदमळनीच्या दिवशी बैलांना घातलेली अंघोळ आणि घरासमोर सायंकाळी मनोभावी केलेली पूजा. ताटामध्ये सोन्याचा दागिना ठेवून ओवाळून टाकलेला भाकरीचा तुकडा आणि लुकलुकत्या डोळ्यांन पाहणारी ती बैलजोडी. मालकाच्या हंगामाचा पाढा मनामध्ये रवंथ करून त्याच्या भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करत बैलजोड आनंदानं गळ्यातील घंटा वाजवत उभी रहायची. सकाळी रानातून चरून आलेले भोपळ्यासारखे फुगलेले बैल पाहून मालकाचं मन गार गार व्हायचं आणि सजवलेली बैलजोड दिमाखाने गावात फिरताना हलगीच्या तालावर आणि गळ्यातील घुंगराच्या बोलावर हा शेतकरी राजा दिमाखात बैलामागे फिरत गावभर हिंडाईचा. चार घरी पुरणपोळीचे जेवण जेवल्यावर बैल बांधला जायचा. तेव्हा त्याच्या डोळ्यात केलेल्या कष्टाच्या खुणा दिसायच्या.
मालक आणि मालकीण दोघं हाताने बैलाला जेवू घालत कोपऱ्यापर्यंत हात जोडून बैलाला नमस्कार करून बैलाचे ऋण फेडताना सगळा वाडा शहारून जायचा. आता या फक्त आठवणी आहेत आठवणी, हलगीचा आवाज, तोरण, सजवलेला बैल, मानाचा बैल आणि घागरमाळांचा तो मंगलमय नांद या सगळ्या आठवाणी आता मन भरून आले आहे. त्या रिकाम्या खुंट्यांकडे पाहून गतकाळाची आठवण सारखी सारखी मनाच्या खोल खोल दरीत घूटमळतेय आणि कवी विठ्ठल वाघांच्या काही ओळी मला सारख्या सारख्या आठवताय!
बैल चंद्राचा वंशज, बैल सूर्याचा वारस
बैल माझ्या गोठ्यातील, पिढ्यानपिढ्यांचा प्रकाश