Pola festival Gratitude : पोळा, कृतज्ञतेचा सोहळा…!
1 min readआतापर्यंत अनेक संक्रमण झाली…. उत्क्रांतीची बीज पडली की, ती रुजली आणि त्या परंपरा झाल्या. पण कृषी प्रधानतेतील बैलाचे स्थान कायम होते. ग्रामीण महाराष्ट्रात पोळा अथवा बेंदूर हा अतिशय उल्हासाने साजरा होणारा सण होता. तो माहोल माझ्या लहानपणीचा आठवला. आम्ही तर पोळा म्हणजे बैलांना पोवनी घालण.. रोज सकाळी हिरव्यागार गवताच्या कुरणात बैल घुसवन… हिरवगार गवत खावून बैलांचे पोट खराब होवू नये म्हणून डिकमळ पाजविण…. अंडी पाजण… आठवडाभर बैलावर साज कोणते चडवायचे याचा खटाटोप करण्यात गुंग असायचो….. आणि पोळ्याच्या दिवशी कोणाचे बैल सशक्त याची जणू स्पर्धाच लागलेली असायची.
पण जागतिकीकरणाच्या वारूत पाच हजार वर्षाची कृषी संस्कृतीतले बैलाचे स्थान दुय्यम ठरले आणि यांत्रिकीकरणाचा वारू चौफेर झाला (भौतिक प्रगतीतला हा तीस वर्षाचा टप्पा उत्क्रांतीचा त्सुनामी ठरला) या त्सुनामीत बैल, नांगर, पाळी, दुंडे, बलुतेदार आणि अलुतेदारही वाहून गेले. आज पोळा आहे. प्रत्येक गावात आता केवळ चार पाच लोकांकडे बैलजोड्या पहायला मिळतील. त्याच चार पाच जोड्या मारुती मंदिराला फे-या घालतील. अख्खा गाव चिखलाचे बैल पुजतील.
गेल्या वर्षी बेंदुरात साता-या जवळच्या गावात दोन बैल जोड्या आणि मागे दहा ते बारा ट्रॅक्टरची रांगा आणि सर्वात पुढे डॉल्बीवर उडत्या चालीवरची गाणी आणि उसळत्या तरुणाईचा बेफाम नाच हे चित्र पाहिलं होतं. काळ संक्रमणाचा आहे. आमच्या पिढीने तो सणातला डौल बघितला आहे. त्यामुळे परंपरा प्रतिकात्मक होताना पाहून घालमेल होते. तेवढच हाती आहे बाकी गोविंदाग्रज यांच्या कवितेतले आपण चिंतातूर जंतू…!