Women’s disempowerment policy : हे तर महिला अक्षमीकरणाचे धोरण
1 min read
हे खाते उत्पादन, विक्री, वाहतूक, पिण्यायोग्य आणि औद्योगिक हेतूसाठी मादक पदार्थांचे नियमन करते. बेकायदेशीर दारू गाळणे, बनावट किंवा भेसळीचे मद्य या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींवर प्रतिबंध करणे, दुष्परिणामांविरुद्ध जनजागृती करणे ही कामे करतो. किती धूर्तपणे शब्दच्छल केला आहे?
दारूबंदी होऊच शकत नाही. हे अगदी सत्य आहे. आज देशात जिथे जिथे दारूबंदी आहे, तिथे तिथे दारू सहज मिळते, असे जाणकार सांगतात. दारूचे दुष्परिणाम सगळ्यानाच माहीत असतात. तरीही सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल असलेला हा उद्योग आहे. याचं कारण असं की, सरकार या प्रकल्पाविषयी हिरीरीने प्रचार आणि प्रसार करते. दारू सगळ्यांना सहज आणि भरपूर मिळेल, याची काळजी घेते. कोरोना काळात सगळ्यात पहिल्यांदा खुली झाली ती दारू दुकाने.
दुसरं उदाहरण, आपलं आणि आपल्या पत्नीचं आयुष्य व्यसनमुक्तीसाठी खर्ची घालणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांच्या मृत्यूनंतर त्यांना घाईघाईने श्रद्धांजली वाहून लागलीच मॉलमधून ‘वाईन’ विकण्याचा फतवा निघाला. त्यावर खूप चर्चाही झाली. वाईन म्हणजे मद्य नव्हे, असेही भल्याभल्यांनी प्रतिपादिले. वाईनची ही नवी बाजारपेठ इतक्या लगबगीने सुरू करण्यात आली. कारण उच्चभ्रू बायकांच्या किटी पार्टीतून मध्यमवर्गीय शाळकरी किंवा कॉलेजच्या मुलामुलींच्या वाढदिवसाच्या पार्टीत वाईन घेणारी नवी पिढी तयार व्हावी, हाच विचार आहे. समाजात दारूचं प्रचलन, प्रथा, प्रतिष्ठा आणि प्रस्थ म्हणजे स्त्रियांचे (Women’s) अक्षमीकरण (Disempowerment) आणि हेच सरकारी धोरण (Government policy) आहे.
पूर्वी दारू गाळणारा समाज ‘कलाल’ या नावाने ओळखला जाई. या लोकांजवळ पैसा भरपूर, पण फारशी प्रतिष्ठा नसे. आताच्या कलालांजवळ भरपूर पैसा असतो आणि प्रतिष्ठा सुद्धा! अनेक पुढारी, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचे दारूचे कारखाने आहेत. कुठल्याही धार्मिक उत्सवानंतर, राजकीय पक्षाच्या आंदोलन, मोर्चा, अधिवेशनानंतर दारूवर किती खर्च झाला, याच्या बातम्या चघळल्या जातात. निवडणुकीच्या वेळी तर मतदारांना किती आणि कशी दारू वाटली, याचे फोटो, व्हिडिओ प्रसारित करून कौतुकाने सांगितले जाते.
अतोनात कष्ट करणारे (यात महिलाही आहेत. पूर्वी रस्ता बांधणीसाठी गिट्टी फोडण्याचं काम महिलाही करीत) कष्टांचा, वेदनांचा विसर पडावा म्हणून दारू पितात. त्याबद्दल आक्षेप नाही. अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ताण येतो. त्यांच्या प्रमाणात दारू पिण्यावर आक्षेप नाही. मृतदेहांचे विच्छेदन करणाऱ्यांची ती गरज आहे. देशाच्या सीमेवर सतत मृत्यूच्या छायेत, प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना दारूची गरज असते. त्याबद्दल तर मुळीच आक्षेप नाही. पण, पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिणारे आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहिणारे आपल्या पिण्याचं कौतुक करतात, तेव्हा ते दुर्दैव असतं. दुर्दैव त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांच ही. हेच लोकं दारू न पिणाऱ्यांना बावळट ठरवतात आणि स्वत:च्या सुधारक (की गडकऱ्यांचा सुधाकर) असण्याचं स्वत:च कौतुक करतात.
मनोविज्ञानानुसार दारू व्यसन नाही. दारू पिण्याची अनिवार इच्छा, ओढ, सवय हा मनोरोग आहे. तथाकथित थकवा घालवण्यासाठी दारू पिणारे दारूमुळे शरीर खंगत गेले तरी पिणं सोडत नाहीत. दु:ख बुडवण्यासाठी दारू पिणाऱ्यांना किती दारूत किती दु:ख बुडवता येते, याचा अंदाजच नसतो. शेवटी दारूमुळेच आयुष्यभर खरेखुरे दु:ख सहन करावे लागते. स्वत:च्या दु:खाचे कौतुक करत बसणे, हे मनोरोगाचेच लक्षण आहे.
घरातल्या स्त्रियांना, मुलामुलींना याचा भयंकर त्रास होतो. पुरुषांचं दारू पिणं स्त्रियांना का आवडत नाही, याबद्दल ग्रामीण स्त्रिया रोखठोक बोलतात. ‘काय ते डोळे वटारणं, एकच गोष्ट तीनदा सांगणं, कुत्र्यासारखं गुरगुरणं, बह्याडासारखं झोकांड्या देत चालणं… मग गावात याले कोणी हुंगे न पुसे!’ सगळा राग घरात काढणार, अगदी चार चौघीत, नदीवर धुणं धुतांना, शेतात काम करताना त्या मोकळेपणाने सांगतात. त्राग्यामुळे भाषा काटेरी असते. ‘माझ्या सासू सासऱ्यांनी कोणतं पाप केल्तं… तं हा हिरा जल्मला’ असं जाहीरपणे सांगण्याची हिंमत त्यांच्यात असते. ‘कपाळाचं कुकू अन् गळसरी बाटलीत बुडवून ठेवली म्या’ असं सांगायला त्या कचरत नाहीत. शहरी सुशिक्षित स्त्रिया नवऱ्याच्या पिण्याचं आधी कौतुक करतात. कारण पिणं हे सुशिक्षित वर्तुळात प्रतिष्ठेचं मानलं जातं. अतिरेक झाला की, पश्चात्ताप होतो. पण, तेव्हा उपयोग नसतो.
दारू पिणं हे प्रतिष्ठेचं, कौतुकाचं, बहादुरीचं, पुरुषार्थाचं लक्षण का मानलं जातं, कळत नाही. उंच उंच डोंगर, खोल दऱ्या तुडवून, तळ्यात, तलावात बुडून, पराक्रम दाखवून दारू मिळवावी लागत नाही. दुकानात जायचं, पैसे फेकायचे आणि दारू घ्यायची. पूर्वी ग्रामीण भागात एखादा पिदाड्या (दारूड्या) शेगावला जायचा. गजानन महाराजांसमोर शपथ घेऊन दारू सोडायचा. अशा अनेकांनी नंतर दारूला स्पर्श केला नाही. संसार सावरला. बायको हसतमुख दिसू लागली. मुलंबाळं नीट मार्गी लागली. पण, आजकाल अशा घटना कमी घडतात. कारण दारू इतकी सहज उपलब्ध होते की, त्यामुळे पिण्याचे आणि पिणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. मुलंही प्यायला लागली की, थोडे दिवस बाप अस्वस्थ होतो. पण पुन्हा प्यायला लागतो. बाप लेकांनी एकत्र दारू पिणं जास्त सुधारलेपणाचं लक्षण मानलं जातं. जावई दारू पीत असेल तर बापाला मुलीची काळजी वाटते. आपल्या काळजी तो दारूतच बुडवतो. इथे शहरी ग्रामीण, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, असे कोणतेच भेद नाहीत.
शहरी नोकरदारांना पगाराची हमी, पेन्शन, वेगवेगळे फंड, सवलती भरपूर असतात. त्यामुळे दारूत कितीही पैसा बुडवला तरी त्यांना काही फरक पडत नाही. डायबिटिस, ब्लडप्रेशर, हृदयविकार, पॅरॅलिसिस सारखे रोग चिकटतात. पण त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कंपनी, सरकार पैसा देते. त्यामुळे तो खर्चही त्यांना परवडतो. पण घरातल्या बायका मुलांच्या, मुलींच्या मन:स्थितीचे काय? स्वत:ला अगदी पुरोगामी, सुशिक्षित, सुधारक समजणाऱ्यांना आपल्या बायकोच्या मनातला उद्वेग, निराशा, खोटं खोटं समाधानी असल्यासारखं वागणं समजू नये का? की समजत असूनही त्यांच्या ‘पुरुष’पणाच्या कल्पना मध्ययुगीन असतात.
आक्रस्ताळेपणा, अरेरावी, बायको मुलांवर दहशत म्हणजे ‘पुरुष’?
सिनेमा आणि टी.व्ही.मुळे दारू पिण्याबद्दल ‘ग्लॅमर’ वाटतं, असं सांगितलं जातं. पण घरात जे दृश्य मुलं बघतात, त्याची त्यांना सवय होते. त्यांचेही विचार आणि वागणं तसंच होतं. दारू पिणारे स्वत:च्या कृतीचं समर्थन करण्यासाठी तत्वज्ञान मांडत असतात. ते तत्वज्ञान मुलांना पटायला आणि आवडायला लागतं. मग मुलं सुद्धा टेंशन कमी होण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी, विकेंड साजरा करण्यासाठी, वडिलांचाच कित्ता गिरवतात. पूर्वी कौतुकाने घरातलं देवघर दाखवत, आता बार दाखवतात.
अनेकानेक क्षेत्रात उच्चतम पदांवर जबाबदारीने काम करणारी अनेक कर्तृत्ववान मंडळी या व्यसनाला कटाक्षाने लांब ठेवतात आणि त्यांना याचा अजिबात न्यूनगंड नसतो. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर आपली अस्वस्थता स्पष्ट करताना सांगतात, ‘तारुण्य’ हरवलेली मुलं बघणं खूप भयंकर अनुभव आहे. 1990 पर्यंत दारू पिण्यामुळे माणूसपण हरवलेले रुग्ण तिशीच्या आसपास असायचे. शरीराने, मनाने आणि बुद्धीनेही विकलांग झालेले. त्यानंतर 20-22 वर्षांचे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि आता तर 17-18 वर्षाची मुले आणि मुली सुद्धा. 2004 मध्ये पहिली महिला रुग्ण आली. 2009 मध्ये महिला रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा लागला. तेव्हा काही अतिउत्साही लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. तेव्हा डॉ. मुक्ताताईंनी कळवळून, निक्षून सांगितलं, ‘अभिनंदन करू नका. समाज कोणत्या थराला गेला आहे, याचं भान ठेवा.’ कंपन्यांमध्ये काम करताना पैसा, पद आणि त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा कमावण्याच्या शर्यतीत आयुष्याशी वाट्टेल त्या तडजोडी करून महिला जीवाच्या आकांताने धावतात. जरा जरी अपयश आले तरी दारूचा आधार घेतात आणि आहारीही जातात. अती श्रीमंत उच्चभ्रू स्त्रिया, त्यांच कर्तृत्व असो की, नसो भरपूर पैसा कमावणाऱ्या नवऱ्याचा अहंगंड पोसण्यासाठी, स्टेटस सांभाळण्यासाठी दारू पितात. देशी आणि विलायती, वैध आणि अवैध, स्वस्त आणि महाग, गावठी आणि इंम्पोर्टेड… दारू ती दारूच.
शेतकरी संघटना महिला आघाडीने दारू दुकान बंदीचं आंदोलन केलं होतं, तेव्हाच आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. ‘दारू हा रोग आहे. नवऱ्याला दारू पिण्याचा रोग झाला आहे. त्याची घरलक्ष्मी त्याला रोगमुक्त करणारी डॉक्टर किंवा नर्स आहे. दारूविरुद्ध नवरा आणि घरलक्ष्मी अशी ही लढाई आहे. घरामध्ये मनमोकळा संवाद, एकमेकांचा सन्मान जपणं, भावनांचा आदर करणं, कुटुंबप्रमुख म्हणून केवळ आर्थिक नाही तर नैतिक आणि मानसिक जबाबदारी ठाम निश्चयाने स्वीकारणं, हाच यावरचा उपाय आहे.’ या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा हा की, महिलांचा फक्त नवऱ्याच्या दारू पिण्याबद्दल आक्षेप असतो. इतर नात्यांच्या जबाबदारीकडे त्या दुर्लक्ष करतात. वडील, भाऊ, दीर आणि मुलाच्याही दारू पिण्याबाबत त्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी. तरच घरादाराला, मुलामाणसांना पोखरणाऱ्या या रोगाच्या विषाणूला पुन्हा बाटलीत कोंडता येईल.