High-risk Drought : भारतासह 22 देशांमध्ये उच्च जाेखीम दुष्काळ
1 min read
High-risk Drought : एल निनोचा (El Nino) प्रभाव अधिक गडद होत चालला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) अन्न व कृषी संघटनेने (FAO – Food and Agriculture Organization) त्यांच्या ‘फूड आऊटलूक’ (Food Outlook) या द्विवार्षिक अहवालात जगातील 44 देशांमध्ये अन्नधान्य संकट निर्माण हाेण्याची तसेच 22 देशांमध्ये उच्च जाेखीम (High-risk) कोरडा दुष्काळ (Drought) निर्माण हाेण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात भारतासह आशिया खंडातील 8 देशांचा समावेश आहे. या सर्व देशांमध्ये अन्नधान्य तुटवडा, पाणी व चारा टंचाई, वाढती महागाई, उपासमार, कुपोषण, स्थलांतर यासारखी गंभीर संकटे निर्माण होणार असल्याचे तसेच या देशांना अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे अन्न व कृषी संघटनेने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
♻️ ॲग्रिकल्चर स्ट्रेस इंडेक्स सिस्टम
जगातील दुष्काळी परिस्थितीच्या अभ्यासासाठी अन्न व कृषी संघटनेने मागील 41 वर्षातील उपग्रहांच्या निरीक्षणांचा आधार घेतला आहे. ॲग्रिकल्चर स्ट्रेस इंडेक्स सिस्टम (ASIS – Agricultural Stress Index System) या दुष्काळ मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश शेती क्षेत्रातील पाण्याचा ताण (Water Stress) आणि कृषी दुष्काळाची (Agricultural Drought) परिस्थिती वेळीच ओळखणे आणि त्याचे अचूक संनियंत्रण (Monitoring) करणे हा आहे. ASIS ही यंत्रणा केवळ पाऊस किंवा हवामानाच्या अंदाजावर अवलंबून राहता नाही तर ती उपग्रहांकडून मिळणारा डेटा (Earth Observation Satellite Data), वनस्पती विज्ञान (Agronomy) व पिकांचे जीवनचक्र (Crop Phenology) यांची सांगड घालते. उपग्रहाद्वारे पिकांचे हिरवेपण (Vegetation Health Index) व जमिनीचे तापमान (Land Surface Temperature) सातत्याने मोजले जाते. विशिष्ट भागात पीक कधी पेरले गेले आणि ते सध्या कोणत्या टप्प्यात आहे (उगवण, फुलोरा, परिपक्वता) याचा डेटा यात समाविष्ट असतो. एल निनोची तीव्रता आणि त्याच्यामुळे जगातील कोणत्या भागात पाऊस, पिके, गुरांचा चारा, जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता यासह अन्य महत्त्वाच्या घटकांची तपासणी केली जाते. उपग्रहाने पाठवलेल्या सध्याच्या डेटाची तुलना मागील ऐतिहासिक डेटाशी (1984 पासूनचा) करून पिकांवर पाण्याचा ताण कितपत आहे, याचा निष्कर्ष काढला जातो.
♻️ 50 टक्क्यांपेक्षा जास्त कृषी दुष्काळ
पावसाचे एकूण प्रमाण कमी आणि वितरण असमान जगातील काही भागात दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे आणि हे संकट गंभीर हाेत चालले आहे. ॲग्रिकल्चर स्ट्रेस इंडेक्स सिस्टमच्या आधारे जगातील काेणत्या देशातील काेणत्या भागात एल निनाेचा पिके, काेरड्या पडत असलेल्या नद्या व अन्य जलस्राेत आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी करून काही निरीक्षणे नाेंदविण्यात आली. यात अमेरिकेतील शुष्क पट्टा व कॅरेबियन देश तसेच साहेलपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत, साेमालियापासून सुदानपर्यंत आणि भारतापासून इंडाेनेशियापर्यंत हे अत्यंत संवेदनशील पट्टे या निरीक्षणांमध्ये समाेर आले आहेत. या सर्व भागांमध्ये पाण्याचा ताण वाढण्याची व अन्नधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. या डेटाच्या आधारे अन्न व कृषी संघटनेने जगातील आफ्रिकेपासून दक्षिण व आग्नेय आशिया आणि मध्य अमेरिकेपर्यंतच्या काही भागात 50 टक्क्यांपेक्षा जास्त कृषी दुष्काळाची (Agricultural Drought) शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीत दुष्काळजन्य मानवी संकटांचा धाेका देखील वाढताे. जगातील साहेल भागातील सेनेगल, मॉरिटानिया, माली, बर्किना फासो, नायजर, नायजेरिया, चाड आदी देश, दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे, नामिबिया, झांबिया, बोत्सवाना, अँगोला, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मॅडागास्कर आदी देश, आग्नेय आशियातील इंडोनेशिया, मध्य आशियातील भारत, मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, बेलीज, होन्डुरस, एल साल्वाडोर, निकारागुआ, कोस्टा रिका, पनामा तसेच क्युबा, जमैका, हैती, डोमिनिकन प्रजासत्ताक, बहामास, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बारबाडोस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडीन्स, ग्रेनेडा, अँटिगा आणि बारबुडा, सेंट किट्स आणि नेव्हिस व डोमिनिका या सर्व कॅरेबियन देशांमध्ये कोरड्या म्हणजेच कृषी दृष्काळाची जाेखीम 50 टक्क्यांपेक्षा जास्त असून, त्यात दिवसागणिक वाढ होत आहे.
♻️ दुष्काळाचे दूरगामी परिणाम
या सर्व देशांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गहू, तांदूळ, मका यासह इतर अन्नधान्य व शेतमालाचे उत्पादन घटणार असल्याने बहुतांश शेतमालाची जागतिक बाजारातील आवक प्रभावित होईल. त्यामुळे शेतमालाचे दर वाढणार असून, महागाई वाढणार असल्याचे त्याचा ग्राहक व गरीब देशांवर विपरित परिणाम हाेणार आहे. जागतिक पातळीवर माेठी दरवाढ हाेण्याची चिन्हे आहेत. शेतमाल निर्यातदार असलेल्या ऑस्ट्रेलिया, युराेपीयन संघ, अमेरिका या देशांमध्ये गहू, तांदूळ, मका या प्रमुख अन्नधान्याचे घटणार असल्याने तसेच काही देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार असून, त्यांना दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार आहे. पाणी व चारा टंचाईमुळे गुरांची समस्या तसेच नागरिकांचे स्थलांतर, उपासमार, भूकबळी व कुपोषण ही माेठी संकटे निर्माण हाेऊ शकतात. दुष्काळजन्य मानवी संकट उद्भवण्याचा धाेका देखील अन्न व कृषी संघटनेने व्यक्त केला आहे. यात दक्षिण आशियातील देशांचा समावेश आहे. दक्षिण सुदानमध्ये शेती व पिकांचे नुकसान, पाणी, अन्न व चाऱ्याची कमतरता, उपासमारीचा धाेका व हिंसा आदी समस्या उद्भवण्यासाेबतच सुदानमध्ये अन्न संकट, युद्ध व दुष्काळ, साेमालियामध्ये पाणी, पशुधन, चारा व अन्नसुरक्षा धाेक्यात येणे, साहेल पट्ट्यात देखील हीच संकटे निर्माण हाेण्याची शक्यता अन्न व कृषी संघटनेने त्यांच्या अहवालात व्यक्त केली आहे.
♻️ हवामान संघटनेचा अंदाज
एल निनाचा प्रभाव ऑक्टाेबर 2026 पासून अधिक तीव्र हाेणार असून, याची 100 टक्के तीव्रता फेब्रुवारी 2027 पर्यंत टिकण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने त्यांच्या सप्टेंबर 2026 अपडेटस् मध्ये व्यक्त केली आहे.
♻️ मदतीसाठी तरतूद
या दुष्काळाशी सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न व कृषी संघटनेने जगातील 88 लाख लोकांना मदत देण्याच्या दृष्टीने 2,020 लाख डॉलर इतक्या निधीची तरतूद केली आहे. एवढेच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन प्लान देखील जाहीर केला आहे.
♻️ उपाययाेजनाविना भारत
भारतातील अर्धे जिल्हे, महाराष्ट्रातील 304 तालुके तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरडा आणि पूर्व व ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर, बिहार व इतर राज्यांमध्ये कोरडा व ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. एल निनाेमुळे उद्भवणाऱ्या या संकटांची सूचना केंद्र व राज्य सरकारांना हवामान विभागाद्वारे वर्षभराआधीच देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही सरकारने या संकटांशी सामना करण्याचे आजवर नियोजन व उपाययाेजना केल्या नाही किंवा भरीव निधीची तरतूदही केली नाही.
♻️ दुष्काळजन्य मानवी संकट
या परिस्थितीत दुष्काळजन्य मानवी संकट उद्भवण्याचा धाेका बळावला आहे. पिण्यासाेबतच सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार असल्याने विहिरी व बाेअरवेल्सचे खाेदकाम, त्यातून पाण्याचा अतिरेकी उपसा केला जाण्याची तसेच पर्यावरणाचा ऱ्हास हाेण्याची शक्यता बळावली आहे. खरं तर, काेरडा दुष्काळाची जाणीव शासन, प्रशासनासह नागरिकांना आहे. मात्र, कुणीही विविध जलस्राेत व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी फारसे गंभीर नाही. त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती व संकट आणखी विदारक व भयावह हाेणार आहे.
©️ मातीतलं विज्ञान