Wild Vegetable Festival : रानभाज्या महोत्सव नव्हे, हा आरोग्य जागर…!
1 min readभारताची ओळख कृषी प्रधान देश अशी आहे. आपल्या देशाची लोकसंस्कृती कृषिच्या आवतीभोवतीच राहिलेली आहे. इथल्या प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणात, इथल्या सांस्कृतिक वैभवातही कृषी संस्कृती डोकावते. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यात अनेक औषधी गुणधर्मही (Medicinal properties) असतात, त्या आवर्जून खाल्या जातात. त्यातल्या निवडक भाज्याची ओळख करून घेऊ या.
✳️ गुळवेल
🔅 औषधी गुणधर्म :- नेत्र विकार, वमन विकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रेमह, मूत्रविकार, यकृत विकार, उचर, कॅन्सर, त्रिदोष विकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्करा आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे. वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहे. गुळवेलीमध्ये टिनोस्पेरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पेरिन गिलोइन, गिलोनिम ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेली पराठेही चवदार लागतात. कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी गुळवेलचा वापर केला होता.
✳️ चुका
🔅 औषधी गुणधर्म :- या भाजीत अ, ब, -ब, क ही जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजे विपुल प्रमाणात असतात. डाएटरी फायबरसमुळे अन्नपचन चांगले होते. भूक लागते व पचनक्रिया सुधारते. उष्णतेचे विकार कमी होतात. पानांचा लेप लावल्यास सूज उतरते. बद्धकोष्ठता, सूज येणे आणि कॅम्पिंग तसेच इतर जठररोग विषयक समस्या कमी करण्यास मदत करते. सेंरिलमध्ये पोटॅशियमी पातळी अत्यंत लक्षणीय असते, जी मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. बीटा कॅरोटीनच्या रूपात सरीलमध्ये आढणारे आणखी एक आवश्यक जीवनसत्व व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात आणि मोतीबिंदू कमी करण्यात मोठी भूमिका बजावले. या भाजीच्या सेवनामुळे हृदयरोग आणि मधुमेह समस्या कमी होण्यास मदत होते.
✳️ तांदुळजा
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची भाजी करतात. शरीरात सी जीवनसत्वासाठी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, काजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मुळव्याध, यकृत व पाथारी वाढणे या विकारात पथ्वकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे. डोळ्याच्या विकारात आग होणे, खाज सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीकरिता फार उपयुक्त आहे.
🔅 औषधी गुणधर्म :- फ्ल्यू, टायफड, मलेरिया अशा आजारांमध्ये तोंडाची चव गेलेल्या ही भाजी आवर्जून देतात. भाजी खाल्याने भूक अतिशय चांगली लागते. ताप आल्यावर भाजी खाल्यास ताप कमी होतो. ताप व चक्कर ही भाजी गुणकारक आहे. तांदुळजाचा रस काढून पिल्याने पोटाचे विकार कमी होतात. एकेकाळी शेताच्या बांधवर ही भाजी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर यायची पण आता विरळ झाली आहे.
✳️ अंबाडी
ही भाजी भारतात सर्वत्र उगवणारी, आढळणारी रानभाजी आहे. अंबाडी बियांपासून तेल काढतात. त्यास हॅश ऑइल म्हणतात. या तेलात Tetrahydrocanonibol (THC), Omega-3, Omega-6 ही नेदाम्ले प्रचंड प्रमाणात आहेत. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. एकेकाळी अंबाड्याच्या काड्या भिजवून त्यापासून आंबाडा (ताग) तयार केला जायचा. त्यापासून शेतीसाठी उपयुक्त, कासरे, ऐटन, सोला असे सर्व प्रकारचे दोरखंड, जनावरांसाठी विशेषतः पोळ्यासाठी वेगवेगळे साज तयार केले जायचे.
🔅 औषधी गुणधर्म :- पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदर विकारांसाठी उपयुक्त आहे. पित्त, रक्तदाब इत्यादी विकारांस्तव अंबाडी सेवन तज्ज्ञ वैद्यांना विचारूनच करावे. अन्यथा त्रास होतो. अंबाडीची पाने पीठ मिसळून भाकरीसुद्धा करतात.
✳️ कर्टोली/करटाेली
🔅 औषधी गुणधर्म व उपयोग :- डोकेदुखीत पानाचा रस, मिरी, रक्तचंदन व नारळाचा रस एकत्र करून चोळतात. मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात. करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मुळव्याध यात गुणकारी आहेत.
भाजी रूचकर असून पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहामध्ये या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते. मुळव्याध मधील वरचेवर रक्तस्त्राव वेदना ठणका यामध्ये भाजी अत्यंत हितकारक आहे.
✳️ सूरण
🔅 औषधी गुणधर्म व उपयोग :- सुरणात अ, ब, क ही जीवनसत्वे आहेत. ‘कंद’ लोणच्याच्या स्वरुपात वायूनाशी समजला जातो. आतड्यांच्या रोगात सूरणाची भाजी गुणकारी आहे. दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांवर भाजी उपयोगी आहे.
या बरोबरच दिंडा, टाकळा, पिंपळ, मायाळू, आंबुशी, पाथरी, अळू, केना, भुईआवळी, शेवगा, कपाळफोडी, भारंगी, कुरडू, आघाडा, उंबर, कुडा, काटेमाट, चिवळ या रानभाज्या अत्यंत औषधी आहेत. ही रानभाज्याची परंपरा शेकडो वर्षाची आहे. या वनभाज्या महोत्सवात या भाज्या घेण्याबरोबर या भाज्यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका इथं दिली गेली. हे पुस्तक प्रत्येक घरात असावे, म्हणजे आपण जंगली गवत म्हणून फेकून देतो, त्या भाज्या आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव होते.
सगळीकडे रासायनिक अन्नधान्य असलेल्या काळात पूर्णपणे निसर्गाच्या पाण्यावर आणि इथल्या जैवविविधतेला पूरक असलेल्या या रानभाज्या आजीच्या बटव्या एवढ्या दुर्मिळ वाटाव्यात एवढ्या तुरळक कुठे तरी दिसून येतात. दरवर्षी कृषी विभागाकडून हा रानभाज्या महोत्सव होतो. त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महिला बचत गट, अनेक शेतकरी गट यात स्टॉल टाकतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. हे अधिकाधिक लोकांपर्यंत गेले तर शेतीला पूरक रोजगार या रानभाज्या देऊ शकतात आणि आपल्याला उत्तम आरोग्यदायी आहार मिळू शकतो, म्हणून शासनाच्या रानभाज्या महोत्सव हा खूपच महत्त्वाचा ठरत आहे.
I like this page very much