krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cloudy weather instead of rain : महाराष्ट्रात पावसाऐवजी ढगाळ वातावरणाची शक्यता

1 min read
Cloudy weather instead of rain : सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली (Atmospheric system) महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी (heavy rain) पूरक असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे पुढील संपूर्ण पंधरवडा म्हणजे गुरुवार (दि. 25 ऑगस्ट)पासून गुरुवार (दि. 7 सप्टेंबर)पर्यंत मुंबईसह कोकण व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त (Instead of rain) ढगाळ वातावरणाची शक्यताच (Cloudy weather) अधिक जाणवत आहे. मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Moderate rainfall) शक्यता मात्र कायम आहे. 7 सप्टेंबर नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलानुसार कळवली जाईल.

🔆 1) तटस्थ भारत महासागरीय द्वि-ध्रुवीता (Oceanic Bipolarity), 2) कमकुवत का असेना पण सध्या अस्तित्वात असलेला पण शेष उर्वरित पावसाळी हंगामात विकसनाची शक्यता ठेवून असणारा ‘एल-निनो’ (El Nino), 3) सध्या भारत विषववृत्तीय महासागरीय (Equatorial Oceanic) क्षेत्राच्या बाहेर भ्रमणित असलेला ‘एमजेओ’ (MJO – Madden-Julian Oscillation), 4) खाली वर सरकणारा पण सध्या सरासरी जागा सोडून अधिक उत्तरेकडे सरकलेला पूर्व-पश्चिम मान्सूनचा आस, 5) कमकुवत झालेली मान्सूनची (Monsoon) अरबी समुद्रीय शाखा आणि 6) ऐतिहासिकरित्या उद्भवून गेलेला ऑगस्ट महिन्यातील यावर्षीचा पावसाचा खण्ड इत्यादी सर्व सहा वातावरणीय प्रणाल्या चालू ऑगस्ट महिन्यातील पावसाला प्रतिकूल ठरलेल्या आहेत.

🔆 या उलट मात्र देशाच्या अतिउत्तरेकडे एकापाठोपाठ नियमितपणे येणारे पश्चिमी झंजावात व त्याचबरोबर उत्तरेकडे स्थलांतरित होणारा आणि अधिक काळ हिमालय पायथा समांतरित क्षेत्रात जाऊन बसलेला मान्सुनी आस यामुळे संपूर्ण उत्तर भारतात वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालून महापुराने जनजीवन विस्कळीत केले. हिमालय पर्वतीय भू-क्षेत्रही त्याने चांगलेच खिळखिळे केले आहे. दाेन महिने तेथील पर्यटनही धोक्यात आणले आहे.

🔆 जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थावस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही. मग आता वर स्पष्टीत केलेल्या सहा प्रणाल्यांचा सध्या अंमल असताना आणि त्यातही विशेषतः क्रमांक (3)ची एल-निनो विकसनाकडे जाणारी शक्यता पाहता पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी ?

🔆 मग या प्रतिकूलतेत 1 सप्टेंबरनंतर केव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त व चित्रा या चार नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? म्हणूनच साशंकता वाटते. मग या नकारात्मक तर्काला केवळ फक्त ‘आयओडी’ (भारत महासागरीय द्वि-ध्रुवीता – Indian Ocean Dipole) या प्रणालीचा टेकू हा आशावाद असला तरी, ज्याने गेली तीन महिने साथ दिली नाही. त्याच्याकडून सप्टेंबरसह उर्वरित दीड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? कारण अजूनही तो तटस्थावस्थेतच आहे.

🔆 केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायत उभी पिके सध्या पाणी ताणावर असून, बिकट अवस्थेतून जात आहेत. काही भागातील खरीप पिके जळण्याच्या मार्गांवर आहेत. शेतकरी तेथे रोटव्हेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.

🔆 निसर्ग आहे आणि काही तरी पाऊस होईलच, या आशेवर खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा श्री गणेशा करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा आता रब्बी हंगामातही अशा क्षेत्रात जपूनच पावले टाकावी, असे वाटते. शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी तसेच सिंचन विभाग यांनाही या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते.

🔆 कारण, कितीही सौम्य शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती झाकता येत नाही. मान्सूनचे (Monsoon) सध्याचे सर्व वास्तव व विश्लेषण आपल्यासमोर ठेवलेलेच आहे. या सर्व शक्यतेची कल्पना शेतकऱ्यांनी करून पुढील शेतपीक नियोजनाचा व संबंधित व्यवसायाचा निर्णय आपण स्वतःच घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!