krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Luxury apartment : सुखवस्तू अपार्टमेंट, जयस्तंभ चौक…!

1 min read
Luxury apartment : हे काही एखाद्या विशिष्ट‌ गावातलं ठिकाण‌ नाही. आजकाल तालुक्याच्या गावी सुद्धा गावाच्या मध्यवर्ती भागात तीन चार मजली इमारती दिसतात. त्याचं हे उदाहरण. सुखवस्तू अपार्टमेंट (Luxury apartment) म्हणजे सुखवस्तू लोकं राहतात, अशी अपार्टमेंट. तीन चार मजली इमारत. सुबक, सुंदर, सुरक्षित! त्यातल्या‌ लोकांचही ऍक्वेरियम मधल्या माशांसारखं जगणं. हवा पाण्यासकट अन्नसुद्धा‌ आवडीचं मिळणार. कौतुकही होणार. अशा‌ वसाहतीतल्या घरात राहणारे‌ लोक सहसा नोकरदार असतात. कष्टाने किंवा पैशाने शिक्षण घेऊन कष्टाने किंवा पैशानेच नोकरी मिळाली किंवा मिळवलेली असते. नोकरी सरकारी असो वा खासगी, पगार‌ आणि पॅकेजेस दणदणीत असतात. बहुतेक‌ घरात स्त्रियासुद्धा नोकरी करतात. त्यामुळे घरात पैसा भरपूर येतो.

पैशाच्या‌ जाण्याच्या वाटा मात्र वेगवेगळ्या असतात. परदेशातून आयात केलेल्या, निदान परदेशी तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या नवनवीन चैनीच्या‌ वस्तू घेण्याची अगदी स्पर्धा असते. आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल हे लोक जागृत असतात. चांगल्यातल्या चांगल्या‌ शाळेत ते प्रवेश घेतात. गणवेश, बूटमोजे, दप्तर, लागणारी इतर साधनं सगळं काही चांगल्या दर्जाचं असतं. शिक्षणाचा घसरलेला‌ दर्जा शिकवणी वर्गात जाऊन सुधारला‌ जातो. चांगलं शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना चांगली‌ नोकरी मिळते. गेली 40 – ‌50 वर्षं हे चक्र सुरू आहे. पण आता हे थांबण्याची‌ लक्षणे दिसू लागली आहेत. जयस्तंभ चौकासारख्या प्रतिष्ठित परिसरातही गर्दी जाणवू लागली‌ आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला की, वेगवेगळ्या कॉलेजांमधे प्रवेश घेणाऱ्यांची गर्दी बसस्टॅंडवर जाणवू लागते. त्याच सुमारास शेतीसाठी खते, बियाणे, औषधे खरीदणाऱ्या‌ शेतकऱ्यांची गर्दी आणि आयुष्यासाठी नोकरी, नोकरीसाठी शिक्षण खरेदीला आलेल्या तरुण तरुणींची गर्दी! ही गर्दी सुद्धा आसपासच्या चिंचोली, पळसखेड, बोरगाव, वडगाव, बेलापूर, उंबरगाव अशा गावाकडची असते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला की, ही तरुणाई गावात राहण्यासाठी निवारा शोधू लागते. वसतिगृहात रहायला पैसाही हवा आणि ओळखही. त्यापेक्षा‌ कुणाच्या‌ तरी घरात एखादी छोटी खोली मिळाली तर बरं… असा विचार करून मोटरसायकलवरून (बहुधा तिघेजण) मित्र खोली संशोधनासाठी निघतात… मुलींबरोबर‌ सहसा‌ पालक असतात. जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांच्या गावांमध्ये अनेक लोकांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना‌ खोल्या भाड्याने देण्याच्या‌ दृष्टीने घरे बांधली आहेत. मुलं गरजू असतात. त्यांची अगदी जिन्या खालची खोली, चौकीदाराची खोली, मोठ्या घराचे आऊटहाऊस, पार्कींग‌मधली स्टोअररूम, जुन्या वाड्याच्या ओवऱ्या, असं कुठेही‌ राहण्याची तयारी असते. आपण सभ्य आणि सुस्थितीतील मुले आहोत, हे त्यांना घरमालकाला पटवून द्यावं लागतं. आंघोळ, कपडे धुणं, वाळत घालणं या रोजच्या कामांसाठीही बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. एखाद्या इमारतीत वरच्या मजल्यावर खोली‌ मिळाली की, त्यांना खूप आनंद होतो. तिथून सगळं शहर बघत बसण्यातही एक गंमत असते.

सरकार ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देते. तो पैसा आणि मायबापाच्या शेतातल्या कष्टातून कमाल काटकसरीतून वाचवलेला पैसा, दोन्ही मिळून कशीबशी सोय होऊन जाते. काहींना खोलीमध्ये चहा, स्वयंपाक करण्याची मुभा असते. पण काही घरमालकांनी निक्षून नाही सांगितलं असतं. मग सकाळी चहा प्यायला चहाची टपरी उघडायची वाट बघावी लागते. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो. कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी मिळतात. शिक्षण मिळतच असं नाही. काही प्राध्यापक तास घेतात काही नाही. बहुतेक शिक्षक – प्राध्यापक शेतकऱ्यांचीच मुलं असतात. पण नोकरीमुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात, दिसण्या राहण्यात खूप भारी फरक पडला असतो. त्यांच्याकडे पाहून तर आपणही अशीच नोकरी‌ मिळवायची हा विचार पक्का होतो. फक्त कॉलेज मधल्या शिक्षणानी मार्क मिळत नाहीत‌ म्हणून ट्यूशन क्लास सुरू होतात. ट्यूशन फी जबरदस्त असते. कशीतरी त्याचीही जुळवणी होते. गंमत म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या मुलामुलींना शाळा कॉलेजात नोकरी मिळत नाही. त्यांचे प्रायव्हेट ट्यूशन क्लास दणकून चालतात. काही ठिकाणी तर पास होण्याची गॅरंटी घेतली जाते.

जेवणाचा प्रश्न डबा लावून सोडवला जातो. डबे घरपोच देणारा त्यांच्यासारखाच पळसखेड, वडगाववाला असतो. दहा वर्षांपासून तो हा‌ जॉब करत असतो. तो जिथून डबे आणतो, तो कॅटरिंगवाला उंबरगाव, बाभुळगाव कडचा असतो. तो वीस वर्षांपासून हा बिझिनेस करत असतो. गारगोट्या भात, जाड भरड पोळ्या, एकच‌एक चवीची भाजी आणि वरण नावाचं पाणी असं जेऊन कंटाळा आला की, रस्त्यावर वडापाव, भेळ, पाणीपुरीकडे वळायचं. त्या गाड्या सुद्धा‌ देवगाव, चिचघाटच्या असतात. नोकरी नाही म्हणून ते या उद्योगात पाच सात वर्षांपासून असतात. कॉलनीत भाजीची गाडी घेऊन येणाराही गावकरीच असतो. नोकरी नाही म्हणून तो बिझिनेस करतो. हे सगळे शेतीतले विस्थापित.तालुक्याच्या गावी सुद्धा आजकाल मोठमोठे दवाखाने असतात. दवाखान्यातले कर्मचारी खेड्याकडचेच. थोडफार‌ शिक्षण घेतलेले. डॉक्टरही शेतकऱ्याचाच मुलगा. प्रॅक्टीस जोरात. त्याने बरीच जमीन खरेदी करून ठेवली असते. शहरातल्या अनेकांनी उत्पन्न दाखवण्यासाठी शेत जमीन खरेदी केल्याचं त्यांना कळतं. आज‌ नाही उद्या‌ आपलीही जमीन घ्यायला शहरी गिऱ्हाईक मिळेल, असं सुद्धा त्यांना वाटून जातं.

शहरी जीवनाशी परिचय होत असतो. सुरुवातीला घरच्यांची फार आठवण येते. पडत्या पावसात वरच्या मजल्याच्या, गॅलरी गच्चीत उभं राहून पावसात भिजणारं शहर बघतांना, रंगीबेरंगी रेनकोट छत्र्यांची लगबग बघतांना डोक्यावर घोंगशी घेऊन वावरात काम करणारे मायबाप आठवतात. काही थोड्यांची अजूनही शेतात काम करायची तयारी असते. बापाला डवरणी, फवारणीसाठी मदत करायला ते शनिवार, रविवार गावाकडे जातात. पण हळूहळू गावाकडच्या चकरा कमी होत जातात. शेतीची ओढ कमी होते. बरं झालं शेतीतून सुटका झाली! असं वाटायला लागतं.

शिक्षणासाठी खेड्यातून शहरात येणाऱ्या मुलींची संख्या खूप मोठी आहे. मुलांना येणाऱ्या सगळ्या अडचणी त्यांनाही असतात. शिवाय ‘मुलीची जात’ म्हणून अडचणी वाढत जातात. पण पुन्हा शेतीत अडकायचं नाही, हे त्याही ठरवतात. शेती करणाऱ्या मुलाशी लग्न ठरवलं तर जीव द्यायला निघतात. आपली माती आपली जमीन सोडून परक्या वस्तीला आलेल्या तरुणाईकडून चुकाही घडतात. कधी सावरतात, कधी कोसळतात. आयुष्याचं पोतेरं होतं. या सगळ्यामुळे विचित्र सामाजिक समस्या उभ्या राहतात

कागदी घोड्यांच्या तबेल्याशीही या मुलामुलींची ओळख होते. वयाचा, जातीचा, उत्पन्नाचा असे अनेक दाखले मिळवतांना खुर्चीच्या हातावर दक्षिणा ठेवावी लागते. खुर्चीतली व्यक्ती शेतकऱ्याचाच मुलगा किंवा मुलगी असते. तलाठी, तहसीलदार अगदी कलेक्टर सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा असतो. पण स्वत:चा भूतकाळ ते नोकरीवर रुजू होताच विसरले असतात. आमदार, खासदारांना निवडणूक आली की, गावकऱ्यांची आठवण येते. ‘मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे’, हे ते गहिवरून, अभिमानाने वगैरे सांगतात. एरवी शहरातल्या सभा, समारंभांना, भाषणांना गेलं तरी त्यांना त्यांच्या प्रश्नावर कुणी बोलतांना दिसत नाही. शेतकऱ्यांना उपदेश मात्र सगळेच करतात. कुणी नैसर्गिक शेती, कुणी सेंद्रिय शेतीचे सल्ले देतात. कुंडीतल्या एका टमाट्याच्या झाडाला, चहाचा‌ चोथा, केळ्याची सालं, नारळाच्या शेंड्यांचं खत दिलं. त्याला अकरा टमाटे लागल्याचं ‘प्रायोगिक शेतीच्या’ थाटात सांगतात. शेतकऱ्यांनीही बचतगट स्थापन करून सहकारी शेती करावी असं सांगतात. सरकारने सिलिंगचा कायदा आणून उसाचे पेरकांडे करावेत तसे जमिनीचे तुकडे केले. आता त्याचा पुन्हा सबंध ऊस करण्याचं आवाहन करतात.

भारतीय शेती हा तोट्याचा व्यवसाय हे युगात्मा शरद जोशींनी स्वत: शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून सिद्ध केलं. हा सिद्ध सिद्धांत सगळ्यांना पटला, पण अनेकांना तो पचला, मानवला नाही. लाखालाखांच्या शेतकऱ्यांच्या सभा होत होत्या. आंदोलनं होत होती. तेव्हाच शेतकरी संघटना खिळखिळी करण्याच्या क्ल्रृप्त्या सुरू झाल्या. राजापेक्षा राजनिष्ठ अनेक स्वनामधन्य संघटना सोडून गेले. आहे त्या शेतकऱ्यांनी संघटनेचं काम सुरू ठेवलं आहे. केवळ रस्त्यावरच्या आंदोलनांने काहीही साध्य होत नाही. म्हणून सविनय कायदेभंगापासून न्यायालयात न्याय मागण्यापर्यंत, महिलांच्या बचतगटांपासून एचटीबीटी बियाण्यांच्या आग्रहापर्यंत, नोकरशाहीशी चर्चा करण्यापासून आमदार, खासदारांना निवेदने देण्यापर्यंत, पदयात्रा काढून उपोषणांपर्यंत अनेक आघाड्यांवर लढाई सुरू आहे.

आता सुखवस्तू अपार्टमेंटला अलिप्त राहता येणार नाही. येणाऱ्या गर्दीला थोपवण्यासाठी थांबवण्यासाठी पुन्हा शेतीकडे समाधानाने परत पाठवण्यासाठी शहरी बुद्धीजीवींनी पुढाकार घ्यायला हवा. एक रुपयात विमा, शेतकऱ्यांना दरवर्षी काही रक्कम ग्रामीण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, अंगणवाडीत फुकट खिचडी, गर्भवती महिलांना सन्मान म्हणून पैसे वाटप, शेतकऱ्यांना ओल्या कोरड्या दुष्काळात मदत, घरकुल योजना, गाई म्हशी कोंबड्या बकऱ्यांच्या व्यवसायासाठी कर्ज…. या सगळ्यांचा‌ सरकारी तिजोरीवर भयंकर ताण पडत असूनही हे‌ सगळे सरकार नामक व्यवस्था कशी काय देऊ शकते? कारण या खर्चाच्या तिप्पट वसुली शेतीक्षेत्रा कडून होते. आयात, निर्यात आणि व्यापार स्वत:च्या अखत्यारीत ठेवून सरकारी यंत्रणा ही वसूली करते. 4 – 6 जणांच्या फुल-फळ शेतीची यशोगाथा नव्या नवलाई सारखी न‌ऊ दिवस असते. दिवसेंदिवस भारत आणि इंडियातील दरी खोल आणि रुंद होत आहे.

भांडवल तयार करणाऱ्यांपेक्षा भांडवलाचा हिशोब ठेवणाऱ्यांवर अधिक पैसा खर्च होत आहे. भांडवलाचा स्त्रोत कायम ठेऊन त्या भांडवलाच्या आधाराने उद्योग उभारले गेले तर उद्योगाइतकेच भांडवलाच्या स्त्रोताच्या अस्तित्वाचे महत्व लक्षात येईल. भांडवलाचा कायम पुरवठा होत राहील. पण…. भांडवल तयार करणाऱ्या व्यवसायापेक्षा भांडवलाची शिताफीने लूट करण्याच्या व्यवस्थेला प्रतिष्ठा मिळत आहे. म्हणून त्या व्यवस्थेत शिरकाव करून घेण्यासाठी नोकरीच् करण्याचं ग्रामीण तरूणाईचं ध्येय आहे. आज ज्यांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत त्यांच्या मुलाबाळांना वंशपरंपरेने नोकऱ्या मिळणार नाहीत. राजकारण आणि नोकरशाहीच्या धोरणांमुळे शेतीव्यवसाय डबघाईला आला आहे.

युगात्मा शरद जोशींनी शेतीला उर्जितावस्था आणण्यासाठी आयुष्यभर अनेक लढाया लढल्या. पण निर्णायक विजय मिळाला नाही. शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर कोसळलेल्या जर्मन फ्रांस सारख्या देशांना सावरून घेण्यासाठी अमेरिकेच्या जॉर्ज मार्शल यांनी लागू‌ केलेल्या यशस्वी मार्शल प्लॅन सारखा एखादा मार्शल प्लॅन शेतीसाठी आखला पाहिजे, अशी त्यांनी तर्कशुद्ध मागणी केली होती. हरलेल्या शेतकऱ्यांना आज आर्थिक मदतीपेक्षा गरज आहे. ती शेतीवर घातलेली बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंतची बंधने तोडण्याची.शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची. मग शेतकरी त्याच्या शेतीत सुखाने कष्ट करील. आपल्या नोकरदार भावांचा हेवा करणार नाही. शहरी नोकरदारांना आपल्या शेतकरी भावांचा तिरस्कार, लाज वाटणार नाही. ग्रामीण तरुणाई शहरात स्थलांतर करणार नाही. शहरात विजेचा, पाण्याचा, सांडपाण्याचा, कायदा-सुव्यवस्थेचा बट्टयाबोळ होणार नाही. राजकारणी आणि नोकरशहांना ही समस्या सोडवण्यात स्वारस्य नाही. जयस्तंभ चौकातला जयस्तंभ आणि सुखवस्तू अपार्टमेंटचा सुखवस्तुपणा कायम राहण्यासाठी आता बुद्धीजीवींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी काय करायला हवे, हे बुद्धीवंतांना‌ सांगण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!