krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain will subside : पावसाचा जोर काहीसा ओसरणार

1 min read
Rain will subside : 16 जुलै 2023 च्या भाकितात सांगितलेला 10 ते 12 दिवस जोरदार पावसाचा (Rain) कालावधी शुक्रवारी (दि. 28) संपत आहे. मान्सूनने (Monsoon) गेल्या 3-4 दिवसात सह्याद्रीचा घाट उतरून महाराष्ट्राच्या मैदानी भागात समाधानकारक हजेरी लावत केवळ जालना, सातारा, सांगली हे तीन जिल्हे वगळता आजपावेतो जुलै महिन्याची पावसाची तुट भरून काढली. आतापर्यंत झालेल्या पावसाची टोटल ही सरासरीच्या पुढे झेपावत आहे. असे असले तरी पावसाचे वितरण मात्र सम प्रमाणात न झाल्यामुळे खरीप हंगामाची स्थिती राज्यात विशेष समाधानकारक वाटत नाही.

🔆 शनिवार (दि. 29 जुलै)पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार ( दि. 5 ऑगस्ट)पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी (Rain will subside) होण्याची शक्यता जाणवते. या भागात केवळ मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते. तेथे शेत मशागत व पेरणीसाठी कदाचित अधून-मधून उघडीपही मिळू शकते. मात्र, मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता अजूनही कायम आहे.

🔆 महाराष्ट्रातील मैदानी भागात भलेही मान्सूनने कमी तीव्रतेने हजेरी लावली असली तरी घाटमाथ्यावरील धरण क्षेत्रात त्याची कामगिरी उत्तम झाली. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 25 टक्क्यांपर्यंत असलेला धरण जलसाठा जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरीस किंवा 1 ऑगस्टपर्यंत कदाचित भाकीत केल्याप्रमाणे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही अजून मान्सूनचे दाेन महिने शिल्लक आहेत.

🔆 या पावसाने खरिपातील शेवटच्या टप्प्यातील उर्वरित पेरण्यास तसेच कमी ओलीवरील झालेल्या पेर पिकांना जीवदान व बारगळलेल्या पेरण्यांच्या दुबार पेरणीस मदत होवू शकते. उशिरा पेरणीमुळे भलेही कदाचित धान्यरास झड कमी येऊ शकते, पण तरीही खरीप हंगाम साजरा होवू शकतो. हेही महत्त्वाचे समजावे. अंदाजाप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस झाला असून, ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती 3-4 दिवसात कळवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!