krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Dam water : धरणातील पाण्याचे गणित

1 min read
Dam water : मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू झाला की, ठिकठिकाणाहून मुसळधार पावसाच्या, बंधारे व धरणे भरल्याच्या आणि धरणांतून पाणी (Dam water) सोडण्याच्या बातम्या येत असतात. कुठे किती आणि कसा पाऊस (Rain) झाला, त्याच्याही बातम्या येत राहतात. अनेकदा हा पाऊस मिलीमीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये अथवा इंचात मोजला गेल्याचे पहायला मिळते. पाऊस अशा विचित्र युनिटमध्ये कसा काय मोजतात, याचेही कुतूहल वाचकांना असते. शिवाय, धरणातून सोडलेल्या पाण्याबाबतही आज एक हजार क्युसेक (CUSEC) पाणी सोडण्यात आले, असे संदर्भ वाचायला मिळतात. काय आहेत या संज्ञांमागील गणिते? पाऊस का मोजतात मिलीमीटरमध्ये आणि काय अर्थ आहे क्युसेकचा?

✴️ एक टीएमसी पाणी म्हणजे काय?
✳️ 1 फूट x 1 फूट x 1 फूट म्हणजे 1 घनफूट पाणी.
✳️ 1 घनफूट म्हणजे 28.31 लिटर पाणी.
✳️ 28.31 लिटर पाणी म्हणजे अंदाजे दोन बादल्या पाणी.
✳️ 1 दशलक्ष घनफूट (1 एमसीएफटी) म्हणजे 10,00,000 घनफूट पाणी.
✳️ 1,000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी. (एक अब्ज घनफूट पाणी)
✳️ धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (Thousand Million Cubic feet) मोजला जातो. महाराष्ट्रातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी (105 अब्ज घनफूट पाणी) इतकी मोठी आहे.

✴️ क्युसेक म्हणजे काय?
धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्युसेकमध्ये (CUSEC) मोजले जाते. एक घनफूट (cubic feet) प्रती सेकंद (per second) म्हणजेच एक क्युब पर सेकंद याचा अर्थ क्युसेक (Cubic per second) असा होतो. एक घनफूट पाणी म्हणजे 28.31 लिटर पाणी. ज्यावेळी धरणातून 1,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी 1,000 x 28.31 असे 28,310 लिटर पाणी प्रती सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते. कोणत्याही धरणातून जर 24 तासात सतत 11,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग (Water discharge) करण्यात आला, तर त्या धरणाची पातळी 24 तासानंतर 1 टीएमसीने कमी झालेली असते.

✴️ क्युमेक म्हणजे काय?
क्युसेकमध्ये पाणी घनफूटामध्ये मोजले जाते. तर क्युमेकमध्ये (CUMEC) पाणी घनमीटरमध्ये मोजले जाते. क्युमेक म्हणजे क्युबिक मीटर पर सेकंद (Cubic meter per second). एक क्युमेक पाणी म्हणजे प्रती सेकंद 1,000 लिटर पाणी. म्हणजेच 1,000 क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल, तर 1,000 x 1,000 असे 10 लाख लिटर पाणी प्रती सेकंद या वेगाने नदीपात्रात येत असते.

✴️ पूररेषा कशा आखतात ?
✳️ पांढरी रेषा

एखाद्या धरणातून 30,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, तो रेषा ‘व्हाईट लाईन’ अथवा ‘पांढरी रेषा’ (White line) म्हणून ओळखली जाते. हा सर्वसामान्य पूर (flood) मानला जातो.

✳️ निळी रेषा
20-25 वर्षांतून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडते. ज्यावेळी धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा ‘ब्लू लाईन’ अथवा ‘निळी रेषा’ (Blue line) म्हणून ओळखली जाते.

✳️ लाल रेषा
40-50 वर्षांत अत्याधिक जाेरदार पावसामुळे (Heavy rain) नदीचे पात्र निळी रेषाही ओलांडते. ज्यावेळी धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा ‘रेड लाईन’ अथवा ‘लाल रेषा’ (Red line) म्हणून ओळखली जाते.

कृषिसाधना....

2 thoughts on “Dam water : धरणातील पाण्याचे गणित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!