krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Empowerment of women : महिलांचे सक्षमीकरण म्हणजे नक्की काय?

1 min read
Empowerment of women : 8 मार्चला जागतिक महिला दिन (International Women's Day) असतो. त्या आठवड्यात सगळीकडे महिला सक्षमीकरण, स्त्री-मुक्ती, स्त्रीशिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या खुणा उमटवणाऱ्या महिलांच्या बातम्या, छायाचित्रं, मुलाखती, लेख...वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओवरून भरभरून लिहिलं, दाखवलं, सांगितलं जातं. उपेक्षित, शोषित, पिडीत स्त्रियांसाठी, मुलींसाठी काम करणाऱ्या, आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुलींसाठी काम करणाऱ्या संस्थांबद्दल‌ही वर्तमानपत्र‌ आणि टिव्ही चॅनल अहमहमिकेने गौरव गान करत असतात. स्वातंत्र्यानंतर शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत आणि कार्यक्षेत्रात उत्तरोत्तर वाढ होत आहे. समाज कार्य करणाऱ्या स्त्रिया मुलाखतींमधून आणि लेखांतून,भाषणांतून एक गोष्ट आवर्जून सांगतात की 'आम्हाला अजून खूप काम करायचं आहे. आमच्या पुढे महिला सक्षमीकरणाचं (Empowerment of women) आव्हान अजूनही आहे.'

🟢 पैसा, वेळ, कष्ट यांचं नियोजन व बचत
मग असा विचार येतो की… शहरातल्या बकाल वस्त्या, झोपडपट्ट्या, मैदानांवर, रेल्वे रुळांच्या बाजूला मोकळ्या जागेत जमेल तिथे, प्लास्टिकचे कागद आणि कापडांच्या राहुट्या उभारून राहणाऱ्या लोकांचे लोंढे शहरात येण्याचे जोपर्यंत थांबत नाही, ताेपर्यंत महिला सक्षमीकरण सुरूच राहणार. अशा महिलांचं सक्षमीकरण म्हणजे काय? तर ‘त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभं करणं!’ या महिला अशा वस्त्यांमधे येतात कुठून? तर ग्रामीण भागातून, खेड्यातून! शहरात येण्याआधी या ग्रामीण महिला स्वत:च्या पायावर उभ्या नव्हत्या का? निश्चितच होत्या! खेड्यात राहणाऱ्या शेतात काम करणाऱ्या महिलेइतकं सक्षम खरंच कुणी नसतं. शेती आणि घर सांभाळणारी महिला, पैसा, वेळ आणि कष्ट यांचं नियोजन आणि बचत कशी करते, हा अभ्यासाचा विषय आहे. घरासाठी सरपण आणि पाणी आणणं ही बहुधा तिचीच जबाबदारी असते. गॅस सिलेंडर अवसे-पुनवेला. रोज मैत्री चुलीशीच! चुलीत सरपण कोणतं आणि किती लावायचं, याचं तिचं अचूक गणित असतं. स्वयंपाक करताना काय चुलीवर ठेवायचं, काय वैलावर ठेवायचं, काय निखाऱ्यावर, काय आरावर ठेवायचं हेही ठरलेलं असतं. आमटी, कढीला हलक्या बुडाचं; भाज्या डाळी शिजवायला जाड बुडाचं भांडं, इथपासून तिचं सरपण‌ वाचवण्याचं गणित असतं. कारण रोज शेतातून येताना सरपणाचं एक तरी ओझं तिला डोक्यावर आणावं लागतं.

🟢 वेळेचंही नियोजन काटेकोर
पावसाळ्यासाठी पेटवण आणि सरपणाची बेगमी करताना, पेरणीच्या दिवसात घाईने स्वयंपाक उरकायचा म्हणून ती शेवया, कुरडया, सांड्या, बोटव्या करून वाळवून ठेवते. गव्हाचा मातेरा धुवून ‍त्याची सोजी, आडडाळी धुवून भरडा, ज्वारीच्या, तांदुळाच्या कण्या तयार ठेवते. पेरण्यांच्या दिवसात घरातल्या सगळ्यांनाच कष्ट खूप. पेरणीची‌ वेळही साधायची. म्हणून हे सोयीस्कर ‘फास्ट फूड.’ उन्हाळ्यातच जुने कपडे धुवून व वाळवून ठेवायचे. पावसाच्या झडी सुरू झाल्या की, वावरातली कामं ठप्प होतात. त्या दिवसात ती जुन्या कपड्यांच्या वाकळ, गोधड्या शिवते. शेतीच्या व्यवसायात 2-4 वर्षांनी थोडाफार फायदा होतो. एरवी तोटाच! पण गायी, म्हशींची निगा राखून दूध विकून, कोंबड्या, बकऱ्या पाळून, पोसून, विकून, नाण्याला नाणं जोडून तिची लसूण जिऱ्याच्या डब्यातली बचतबॅंक सुरू असते. पुस्तकी शिक्षण फारसं नसलं तरी हिशोब कधी चुकत नाही. पैसा, वेळ आणि कष्ट यांच इतकं जबरदस्त नियोजन करणारी शेतकरीण सक्षमच असते.

🟢 बलुतेदारी संपुष्टात
सरकारी धोरणांमुळे शेती व्यवसाय तोट्याचाच राहिला आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या वरकड उत्पन्नामुळे आप‌आपला व्यवसाय करून व्यवस्थित जगणारे, लोहार, सुतार, चांभार, कुंभार असे बलुतेदारही खेडी सोडून शहराकडे स्थलांतरित झाले. खेड्याखेड्यात विड्याची पाने विकणाऱ्या बाऱ्यांचाही धंदा संपला. आता शहरातून खेड्याकडे गुटखा, खर्रा, सुपारी विकायला येते.

🟢 कापूस उत्पादक उद्ध्वस्त
ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर इंग्रजी अमदानीतच सुरू झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते जास्त वेगाने होऊ लागले. मुंब‌ईत 600 एकरात सुती कापडाच्या गिरण्यांचे गिरणगाव वसले. 40 वर्षांपूर्वी विदर्भात 16 कापड गिरण्या होत्या. कापूस एकाधिकारापासून विदर्भात आर्थिक दुष्काळ सुरू झाला. सन 1984 नंतर राजीव गांधींच्या कारकीर्दीत कृत्रिम रसायनांपासून तयार होणाऱ्या धाग्यांची आणि रसायनांची करमुक्त आयात सुरू झाली. शिकल्या सवरलेल्या सुशिक्षित सुजाण नागरी समाजाने सुती कापडावर अघोषित बहिष्कार टाकून टेरिकॉट, पॉलिएस्टर अशा कृत्रिम धाग्यांच्या कापडाचे असे काही स्वागत केले की, कापूस उत्पादक उद्ध्वस्त झाला. आज सुती कापडापेक्षा कृत्रिम धाग्यांच्या कापडाने‌ बाजारपेठा ओसंडून वाहात आहेत. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पेटवलेल्या विदेशी वस्त्रांच्या होळ्यांचे प्रकरण पाठ्यपुस्तकातून आता काढून टाकावे. इतके विदेशी कपड्यांचे प्रचलन वाढले आहे.

🟢 महिला अक्षमीकरणाची सुरुवात‌
सगळ्याच शेतमालाच्या निर्यातीला संधी असेल तेव्हा बंदी आणि गरज नसताना मुक्त आयात असे कृषी धोरण ठरवल्यामुळे शेतकरी शेतीतल्या तोट्याचाच मालक ठरला. शेती घरातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांकडे सोपवून ग्रामीण तरुण रोजगारासाठी दाखल झाले. त्यांचे लग्न गावांकडच्या खेड्यातल्या मुलींशी होऊन त्या मुली सुद्धा आता शहरात आल्या. शेतातली सगळी कामं कुशलतेने करणाऱ्या त्यांच्या हाताला शहरात काम नव्हते. नाईलाजाने त्यांना धुणी भांडी, स्वयंपाक अशी कामे स्वीकारावी लागली. या कामातून रोख पैसा नियमीत मिळत असल्यामुळे ही कामे नाईलाजाने त्यांनी सुरू ठेवली. अनेकजणी आपल्या नवऱ्याबरोबर बांधकामावर सिमेंट वाळू, विटांची टोपली देण्यासारख्या कामावर जाऊ लागल्या. फळे, भाजी, फुले विक्रीच्या धंद्यात नवऱ्याला मदत करू लागल्या. खानावळींमधे स्वयंपाक करू लागल्या. भांड्यांच्या, कपड्यांच्या किराणा सामानाच्या दुकानांमधे काम करू लागल्या. शहरातल्या रोजगारात पैसा रोख मिळत असला तरी खर्चही तेव्हढाच होता. त्यातून शहरात गल्लोगल्ली दारूची दुकाने. त्यामुळे हातात येणारा पैसा मुठीतून निसटून जाऊ लागला. गावाकडे वडीलधाऱ्यांचा, शहाण्या सुरत्यांचा थोडाफार धाक असायचा. इथे तोही नाही. व्यसनांमुळे घरात भांडणं, मारणं, मार खाणं, नशिबाला दोष देत रडत बसणं सुरू झालं. सरकारी दारूची विपणन व्यवस्था न पिणाऱ्यांना पिण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि पिणाऱ्यांना सहजच स्वस्त मिळेल अशी जबरदस्त असते. दारूमुळे महिलांचा आत्मसन्मान तुडवला जातो. स्वत:च्या जन्माबद्दलच ‌त्यांना पश्चात्ताप, घृणा वाटू लागते. इथूनच महिलेच्या अक्षमीकरणाला सुरुवात‌ होते.

🟢 कंगाल खेड्यापेक्षा बकाल वस्ती बरी
पुढच्या पिढीत तर शेतीतली अस्मानी, सुलतानी झेलण्यापेक्षा शहरात येऊन नोकरी करण्याची एकमेव इच्छा ग्रामीण मुला-मुलींमधे जागी झाली. नोकरी म्हणजे पगाराची हमी आणि नोकरशाहीच्या हातातली सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि भरपूर पैसा. नोकरीसाठी पुस्तकी‌ शिक्षण गरजेचे. त्या शिक्षणाची बाजारपेठ शहरातच. त्यामुळे खेड्यातला उरला‌ सुरला पैसा आणि तरुण मुले-मुली पुन्हा शहराकडे. ग्रामीण भागात शिक्षणाचा स्तर खालावलेलाच. त्यामुळे शहरी मुला-मुलींसोबत शिक्षण घेताना न्यून‌गंडाच ओझंही असतंच. नोकरीपुरते तरी‌ शिक्षण मिळवायचेच, या निश्चयाने झपाटलेल्या‌ ग्रामीण मुलींना शहरात राहताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. राहण्याच्या खोलीचे भाडे अव्वाच्या सव्वा. चहा, पाणी, जेवण यासाठी रोख पैसा मोजावा लागतो. राहण्याच्या जागेपासून शाळा, कॉलेज लांब असेल तर पायी चालूनच थकायला होतं. एकट्या राहणाऱ्या मुलींचा सुरक्षेचाही प्रश्न असतो. पण खेड्यातल्या सगळ्या अभावांचा आणि शेतीतल्या फुकट कष्टांचा इतका तिटकारा वाटू लागलेला असतो की, इतक्या सगळ्या अडचणी सोसूनही मुली शिक्षण सोडत नाहीत. कुठेतरी, कधीतरी, कोणती तरी नोकरी मिळेल या आशेवर त्या असतात. नोकरी मिळवताना, मिळवलेली टिकवताना अनेक प्रकारच्या अपमानांना गिळून चूप बसावं लागतं. खेड्यात इतर आयाबायांसोबत शेतातली कामं करताना वाटणारी सुरक्षा, कौटुंबिक जिव्हाळा आठवत असलं तरी एकदा शहरात आल्यावर कंगाल खेड्यात राहण्यापेक्षा शहरातली बकाल वस्ती बरी वाटू लागते.

🟢 पहिला व्यवसाय आणि शेवटची संस्था
शहरात हातावर पोट असणाऱ्यांच्या वेगळ्या वस्त्या असतात. तिथे पाण्याची समस्या त्यामुळे स्वच्छता कमी. सांडपाणी वाहून न जाता साचण्याची समस्या. त्यामुळे दुर्गंधी आणि आजार जास्त. विजेच्या समस्येमुळे अंधाराचं साम्राज्य. मुबलक दारूमुळे घराघरांत भांडणं आणि अशांतता. पुढाऱ्यांचा दरारा आणि राजकारण्यांच्या दहशतीमुळे असुरक्षिततेची भावना. धार्मिक उत्सव आणि निवडणुका त्यामुळे दारूचे महापूर आणि मारामाऱ्या. अशा वातावरणात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेली ग्रामीण स्त्री अक्षम होत जाते. खेड्यात मर्यादेत राहून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतांचा पूर्ण वापर करणाऱ्ऱ्या या सक्षम महिला मातीशी नातं तुटल्यावर अक्षम होतात. शेतीत कष्ट होते, गरिबी होती. पण आत्मविश्वास होता. आत्मसन्मान होता. कुटुंबाचा समाजाचा सुरक्षित परीघ होता. काही वावगं घडलं तर पाठीशी उभं राहणारे अन्याजी, तात्याजी होते. आधार देणाऱ्या जिज्जी, काकी होत्या. मानवी इतिहासातला पहिला व्यवसाय शेती आणि मानवी उत्क्रांतीतील शेवटची सुव्यवस्था म्हणजे कुटुंब संस्था. ग्रामीण स्त्री या अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही गोष्टी सहज सांभाळते.

🟢 ग्रामीण महिलांच्या अक्षमीकरणाची कारणे
शेतीमातीशी नातं असणाऱ्यांना हळूहळू अक्षम करणं सुरू झालं. शेतमालाचे भाव पाडून, शेतमालाची गरज नसताना मुक्त आयात, संधी असूनही निर्यातबंदी सुरू झाली. घटनेत नसलेले परिशिष्ट-9 घटनेत कोंबून घटना दुरुस्तीच्या नावावर केलेला शेतकऱ्यांचा विश्वासघात आणि शेतीक्षेत्रात तंत्रज्ञानाला बंदी! ग्रामीण महिलांच्या अक्षमीकरणाची ही कारणे आणि कारस्थाने आहेत. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी काम करण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या करणारच‌ नाहीत, अशी कामे या संस्था कां करत नाहीत? शेतमालाच्या किंमती पाडून, शेतकऱ्यांची क्रयशक्ती आणि मजूरदारांना स्वस्त आणि फुकट धान्य देऊन त्यांची श्रमशक्ती संपवल्या गेली. ग्रामीण महिला शेतकरीण असो की, शेतमजूर. ती शेतीमातीशी प्रामाणिक राहून कष्ट करते. मजुरीचे पैसे मळवून आणते. पुरुष मंडळी कायम राजकारणाच्या चकाट्या पिटत असतात.

🟢 सक्षम महिलांना अक्षम बनवून पुन्हा सक्षम‌ करण्याचा उपद्‌व्याप
अजूनही वेळ गेलेली नाही. नोकरशाही आणि राजकारण्यांनी शेताच्या बांधावर अडवून, अडकवून ठेवलेले तंत्रज्ञान शेतात येऊ दिले तर आजही ग्रामीण स्त्री आनंदाने उत्साहाने सक्षमपणे शेतात काम करताना दिसेल. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण शेतीवर आजही अनेक बंधने आहेत. बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंतचे स्वातंत्र्य हा शेतकऱ्यांचा श्रमसिद्ध अधिकार आहे. पण आजही पिकातील गवत निंदून काढण्यात तिचं आयुष्य संपून जात आहे. तिची हातबोटे अजूनही विळ्याने जखडलेली आहेत. सुधारित बियाण्यांवरची औषधांवरची बंदी दूर केली तर शेतकरी महिलांचे कष्ट वाचतील. वेळ आणि पैसाही वाचेल. त्यांना सुद्धा छोटे उद्योग सुरू करून पैसे कमावता येतील. आपले छंद जोपासता येतील. आनंदाने जगता य‌ईल. सक्षम महिलांना अक्षम बनवून पुन्हा सक्षम‌ करण्याचा उपद्‌व्याप करण्यात तथाकथित समाजकार्य करणाऱ्यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. पण जिवंत कृषिसंस्कृतीला संपवण्यात नागरी समाजाला फार मोठा धोका आहे, हे बुद्धिवंतांच्या लक्षात येऊ‌ नये, याचे वैषम्य वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!