krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon : मान्सूनची वाट बघावीच लागणार!

1 min read
Monsoon : मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत शनिवार (दि. 17 जून)पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 22 जून)पर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पूर्वमोसमी (Pre Monsoon) पावसाच्या साधारण वळवाच्या सरींची शक्यता जाणवते. 22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच कदाचित मर्यादित असू शकतो. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांना मान्सूनच्या पावसाची (Monsoon Rain) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

✴️ पूर्वमोसमी वळीव पावसाच्या सध्याच्या या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगणातून संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात साधारण शुक्रवार (दि.23 जून)ला नैऋत्य मान्सून प्रवेशित होवू शकतो.

✴️ मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बंगालच्या उपसागरीय शाखाही उर्जितावस्थेत येण्याची शक्यता जाणवते. दरम्यानच्या या कालावधीतच (23 ते 29 जून) तळ कोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होवून, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. म्हणजेच 23 ते 29 जून या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.

✴️ विदर्भात मात्र सध्य:स्थितीत असलेली दिवसाची उष्णतेची लाटसदृश स्थिती व रात्रीची दमट वातावरणतून होणारी अस्वस्थता, घालमेल सोमवार (दि.19 जून)पर्यंत कदाचित कायम राहू शकते. उर्वरित महाराष्ट्रातील तापमानात मात्र विशेष फरक जाणवणार नाही.

✴️ हिंद महासागरीय द्विध्रुवीता (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी – Indian Ocean Dipole) धन अवस्थेकडे झुकण्याचे अपेक्षित असताना सध्या तो ही फारच बळकट स्थितीत आहे, असे समजू नये.

✴️ 6 जून 2023 ला सुरू होणाऱ्या व 6 जुलै 2023 ला संपणाऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य (Suitable for sowing) असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अशा मोसमी पावसाची शक्यता जाणवते. म्हणजे 7 जुलै 2023 नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण 7 जुलैनंतरच्या आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते.

✴️ ‘बिपोरजॉय’ (Biporjoy) चक्रीवादळ (Cyclone) सध्या त्याच्या संलग्नित हवेचा दाब तीव्रतेच्या उतरत्या पायरीने सध्या हवेच्या तीव्र कमी दाबाच्या म्हणजे ‘डिप्रेशन’ (Depression) अवस्थेत राजस्थानातील बारमेर, जोधपूर शहरांच्या वायव्येकडे असून पुढील दाेन दिवसात अजमेर, जयपूरच्या वायव्येकडून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याच्या दोन दिवसाच्या अस्तित्व कालावधीत व मार्गस्थ पूर्व राजस्थानच्या भागात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

✴️ बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तसेच सिमला कुलू मनाली, देहाराडून व सभोवतालचा परिसरात रविवार (दि. 18 जून 2023) पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 22 जून 2023) पर्यंत ढगांच्या गडगडाटीसह वारा, विजा, गारांसह अवकाळी वातावरण व पावसाची दाट शक्यता जाणवते. या कालावधीत तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी याचीही नोंद घ्यावी व सुरक्षित असेल तरच हिमालयीन चढाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!