krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon : जागेवरच खिळलेला मान्सून कमकुवत

1 min read
Monsoon : अति तीव्र 'बिपोरजॉय' (Biporjoy) चक्रीवादळ (Cyclone) गुरुवारी (दि. 15 जून) संध्याकाळी गुजरातमधील जखाऊ बंदराजवळील मांडवी शहरादरम्यान ताशी 125 किमी त्याच्या परिघ-चक्रकार तर झटक्याखालील ताशी 150 किमी पर्यंतच्या अशा वारा वेगाने आदळण्याची शक्यता कायम आहे. चक्रीवादळाच्या सध्याच्या होत असलेल्या मार्गक्रमणामुळे बुधवार (दि. 14) पासून पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 16 जून)पर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा व संपूर्ण खानदेशभागात ढगाळ वातावरणासहित ताशी 35 ते 40 किमीपर्यंतच्या झटक्याखालील वेगवान वाऱ्यासहित किरकोळ ते मध्यम पावसाची (Monsoon Rain) शक्यता जाणवते.

✴️ नैऋत्य मान्सूनच्या (Southwest Monsoon) मार्गक्रमणासाठी वातावरण अनुकूल आहे, असे जरी आपण ऐकत असलो तरी नैऋत्य मान्सून पुढे मार्गस्थ होण्यासाठी त्याचा कमकुवतपणा झाकून राहिलेला नाही. कारण महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच गेल्या चार दिवसांपासून त्यात प्रगती नसून, सध्या आहे त्याच ठिकाणी तो खिळलेला आहे. कदाचित रविवार (दि. 18 जून) ते बुधवार (दि. 21 जून) दरम्यान मान्सून पुढे सरसावण्याची हालचाल होईल.

✴️ ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाचाही मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. विदर्भात मात्र गुरुवारी (दि. 15 जून)पासून पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार (दि. 19 जून)पर्यंत उष्णतेची लाटसदृश स्थिती जाणवेल.

✴️ ‘एल-निनो’च्या पूर्वी भाकितानुसार मान्सून काळात 15 जुलैनंतर विकसनाची शक्यता होती. परंतु, तो सध्या आताच विकसित झाल्याचा खुलासा ‘नोआ’ या परदेशी संस्थेकडून होत आहे. म्हणजेच 15 जुलैपर्यंतच्या 25 ते 30 दिवसात अपेक्षित कोसळू शकणाऱ्या मान्सून पावसाच्या सरींचीही आशा सुद्धा आता मावळते की काय असे वाटू लागले. जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पावसाच्या भाकीत खरे ठरले असून अर्धा महिना संपला. तेव्हा महाराष्ट्रातील पावसाची महिन्याची तुट 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

✴️ सध्या केवळ धन अवस्थेकडे झुकू लागलेली हिंद महासागरीय द्विध्रुवीता (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी – Indian Ocean Dipole) हाच एक वातावरणीय घटक एल-निनो च्या वर्षात पावसासाठी पूरक ठरू पाहत आहे व त्यानेच आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. हेच खरे मान्सूनसंबंधी सध्याचे वास्तव आहे.

✴️ गेल्या फेब्रुवारीपासून सावध करत आहोत, की यावर्षी एल-निनो (El Nino) आहे. परंतु, मागील तीन वर्षाच्या ला निना (La Nina)मुळे झालेल्या भरपूर पावसामुळे सध्या जमिनीत असलेल्या भरपूर पाणीसाठ्याच्या भरवशामुळे शेतकरी ऐकायला तयार नाहीत. कितीही फोडून सांगा, तरी विचारत आहे, की पेरणीयोग्य पाऊस कधी होईल? चुळबुळ करतच आहे.

✴️ 20 जूनच्या आसपास सुरू होणाऱ्या मोसमी पावसातून जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात (23 ते 30 जून) सर्व चित्र स्पष्ट करणाऱ्या पेरणीयोग्य अशा पावसाची अपेक्षा करू या! तरी आठ इंच साधलेल्या पूर्णओली वरची पेरणीच कदाचित यावर्षी हंगाम जिंकून देईल. वाट बघा, लक्ष ठेवा. पण यावर्षी धूळ पेरणी मात्र टाळाच!

✴️ आसामकडील पूर्वोत्तरच्या सात राज्यात मात्र गुरुवारी (दि. 15 जून) पुढील संपूर्ण आठवड्यात पावसाच्या अतिवृष्टीची शक्यता जाणवते. बद्रीनाथ, केदारनाथच्या हिमालयीन पर्यटकास पुढील संपूर्ण आठवड्यात म्हणजे बुधवार (दि. 21 जून) पर्यंत दुपारनंतरच्या गडगडाटी वातावरणासहित मध्यम पावसास तोंड द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!