Sugar production : साखरेचे उत्पादन 14.6 लाख टनांची घटले
1 min readदेशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात लागवड क्षेत्रात घट झाल्याने साखरेचे एकूण उत्पादन 14.6 लाख टनांनी घटले आहे. साखर विपणन वर्ष (ऑक्टोबर-सप्टेंबर) 2022-23 मध्ये, 31 मार्चपर्यंत एकूण साखर उत्पादन 299.9 लाख टनांवर आले आहे. विपणन वर्ष 2021-22 च्या याच कालावधीत 309.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA)ने दिली आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेशने 31 मार्च 2023 पर्यंत उत्पादनात 1.5 लाख टनांची वाढ केली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील उत्पादन 10.42 दशलक्ष टनांवर आले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 11.88 दशलक्ष टन होते. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत 87.5 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते यंदा 89 लाख टन झाले आहे.
साखर उत्पादनात तिसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या कर्नाटकातही साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. मागील वर्षीच्या 5.72 दशलक्ष टनांच्या तुलनेत येथे उत्पादन 5.52 दशलक्ष टनांवर आले आहे. देशातील उर्वरित राज्यांचे एकूण उत्पादन 46.4 लाख टनांवरून 51.2 लाख टन झाले आहे. या वर्षी जानेवारीमध्ये इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने 2022-23 साठी साखर उत्पादनाचा अंदाज 36.5 दशलक्ष टनांवरून 34 दशलक्ष टनांपर्यंत कमी केला होता. विपणन वर्ष 2021-22 मध्ये उत्पादन 358 लाख टन होते. 31 मार्च 2023 पर्यंत देशभरात 194 साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते तर 338 कारखान्यांमध्ये गाळप थांबले होते. गतवर्षी याच कालावधीपर्यंत 366 साखर कारखाने सुरू होते. गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रात 167 साखर कारखान्यांनी गाळप केले होते. यंदा ते 18 वर आले आहे. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी 88 तर यावर्षीच्या 97 साखर कारखाने सुरू होते.