Paddy procurement : केंद्र सरकारकडून 492.2 लाख टन धानाची खरेदी
1 min read🌐 खरेदीत 38 टक्क्यांनी वाढ
देशातील सर्वच प्रमुख धान उत्पादक राज्यांमध्ये खरीप हंगामाची खरेदी पूर्ण झाली आहे. तथापि, पश्चिम बंगालमध्ये मे 2023 अखेरपर्यंत आणि आसाममध्ये 30 जून 2023 पर्यंत खरेदी सुरू राहील. यावर्षी पश्चिम बंगालमध्ये कापणी लवकर सुरू झाली आहे आणि आतापर्यंत राज्यातून खरेदी 38 टक्क्यांनी वाढून 20.66 लाख टनांवर पोहोचली आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममधील खरेदीतून सरकार धान खरेदीचे निर्धारित लक्ष्य सहज साध्य करण्याच्या स्थितीत आहे. चालू हंगामात ऑक्टोबर 2022 मध्ये 114.34 लाख टन, नोव्हेंबर 2022 मध्ये 104.39 लाख टन, डिसेंबर 2022 मध्ये 137.2 लाख टन, जानेवारी 2023 मध्ये 81.4 लाख टन, फेब्रुवारी 2023 मध्ये 41 लाख टन आणि मार्च 2023 मध्ये 13.9 लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे.
🌐 मिरचीच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ
सन 2017-18 ते 2021-22 दरम्यानच्या पाच वर्षांच्या कालावधीत देशातून मिरचीच्या निर्यातीत (Chilli export) 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली असून, ही निर्यात 5.57 लाख टनांवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सन 2017-18 ते 2021-22 दरम्यानच्या कालावधीत देशात लाल मिरचीचे उत्पादन 7.33 टक्क्यांनी वाढून 18.36 लाख टनांवर पोहोचले. सन 2017-18 मध्ये भारतात 17.10 लाख टन लाल मिरचीचे उत्पादन (Production of red pepper) झाले होते, तर 2021-22 मध्ये देशाचे मिरची उत्पादन 18.36 लाख टन झाले आहे. तेलंगणातील खम्मम जिल्हा हा तेजा वाणाच्या लाल मिरचीच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. या वाणाची निर्यात भारतातून बांगलादेश व देशांमध्ये केली जात आहे.
🌐 मिरचीच्या दरात तेजी
चीन आणि बांगलादेशातून मागणी वाढल्याने भारतीय मिरचीचे दर पुन्हा वाढताना बघायला मिळताहेत. कोविड-19 महामारीच्या काळात मागणी घटल्याने मिरचीचे भाव कमी झाले होते. मात्र आता दोन्ही शेजारी देशांकडून पुन्हा मागणी वाढल्याने दरही वाढताना दिसताहेत. मिरचीच्या ‘तेजा’ वाणाला सध्या 18,000 ते 23,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. ‘वंडर हॉट’ आणि ‘यूएस-341’ वाणाच्या किमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. ‘वंडर हॉट’ वाणाला प्रति क्विंटल 38,000 रुपये, तर ‘यूएस- 341’ वाणाला 26,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. मागील वर्षी याच कालावधीत या दोन्ही वाणांचा भाव अनुक्रमे 29,000 रुपये आणि 21,500 रुपये प्रति क्विंटल होता. चीनमधील खराब हवामानामुळे तेथील स्थानिक पुरवठा कमी झाला आहे. सहाजिकच चीनमधून भारतीय मिरचीची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतीय मिरची निर्यातदारांना चिनी खरेदीदारांकडून मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे.