Farmer suicide, Employee strike : कर्जापाई आमचा बाप झाडावर लटकून मेला, मात्र त्यानं कधीच संप नाही केला!
1 min read
नेमकं या लोकांना काय झालं आहे, हे कळत नाही. पैसा, सुख, सुविधा हेच जीवन नाही, हे अजूनही यांना कसं कळत नसेल. आमाप पैसा कमावून भ्रष्टाचार लाचलुचपत खाऊन आपला राजेशाही संसार करणाऱ्या अविचारी लोकांनो, जरा दिन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांचा विचार करा. आज रोजी शेतकऱ्यांची परिस्थिती काय होत आहे या देशात रोज 43 शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) करत आहेत. कर्जामुळे नापिकेमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे आणि त्यांचा परिवार रस्त्यावर येऊन कसं तरी आपलं जीवन जगत आहे. अरे या शेतकरी बापाने पिकलं नाही म्हणून विकून पदरात काही पडलं नाही म्हणून कधीच संप (strike) केला नाही. कारण काय असेल तर हा शेतकरी जगाचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी जन्माला आलेला आहे. मी स्वतःला मातीत पेरून घेईल, कष्ट करून मरून जाईल, मात्र माझ्या देशातील एकही बांधव अन्नाविना भुकेला राहायला नको, म्हणून हा शेतकरी बाप शेती तोट्यात गेली तरी शेती करतो आहे.
शेतीसाठी लागलेला खर्चही निघत नाही. पोरांचं शिक्षण, आरोग्य, घर संसार चालवणं फारच अवघड झालेलं असताना या शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं नाही. कुठल्याच प्रकारच्या सुखसोयी, सुविधा शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या नाहीत. ही व्यवस्था शेतकऱ्याला सावत्र मुलासारखी वागणूक देत आहे आणि नोकर वर्गाला आवडत्या एकुलत्या एक मुलासारखी जपणूक करते आहे. कोरोना काळामध्ये सर्वांनी घरी बसून पगार घेतला. मात्र माझ्या शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून देशात अन्नधान्य कमी पडू दिले नाही. देशाच्या सकल उत्पादनात भर पाडण्यासाठी मोलाची मदत केली. कष्टकरी शेतकरी तुमच्या सगळ्यांच्या ताटामध्ये अन्न वाढतो, तो तुमचे घास मोजत नाही.
जर शेतमालाचे थोडेसे जरी भाव वाढले तरी, लगेच तुमचं महिन्याचं बजेट कोलमडलतं. मात्र, तुमचा वेतन आयोग शेतकऱ्यांच्या डोळ्यात कधीच खूपत नाही. या देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी हा कष्टकरी वर्ग सतत प्रयत्न करत आलेला आहे. मात्र, हे कपाळ करंटे राजकीय नेते स्वतः प्रचंड भ्रष्टाचार करतात व नोकर वर्गाला, व्यापाऱ्याला झुकते माप देतात व शेतकऱ्याच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतात. भरपूर पगार असूनही जर मन शांत नसेल आणि देशाच्या आणीबाणीच्या वेळी देश आर्थिक संकटात सापडला असताना जर तुम्ही संपाचे हत्यार उगारून काम बंद करत असाल तर, तुम्ही नक्कीच देश हिताच्या विरोधी आहात, हे लक्षात असू द्या. खरा देश प्रेमी तर माझा शेतकरी बाप आहे, तो स्वतः झाडावर लटकून मरून जाईल, मात्र संप कधीच करणार नाही. कारण, तो तुमचा आमचा सगळ्यांचा बाप आहे, हे विसरून चालणार नाही!