krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Green manure : हिरवळीचे खत – ढेंचा

1 min read
Green manure : जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची (Organic fertilizer) फार गरज आहे. त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते (Green manure) शेतीला व शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. ही पिके जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात.

🟢 हिरवळीच्या खताचे प्रकार
🔆 हिरवळीच्या खताचे पीक शेतात वाढवून फुलोऱ्यापूर्वी ते जमिनीत गाडणे.(उदा. बोरू, ढेंचा, चवळी इत्यादी)
🔆 हिरवळीच्या खताचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे आथवा गाडणे. (उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी.)

🟢 ढेंचा लागवड पद्धती
वखराच्या (कुळवाच्या) आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेत तयार करून घ्यावे. त्यानंतर दीड ते दोन फूट अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस ढेंचा (Sesbania bispinosa) बियाणे पेरावे. एकरी 20 ते 25 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 पाणी द्यावे. नांगर किंवा ट्रॅक्टरने नांगरून जमिनीत गाडावे. 10-12 दिवसानंतर वखराच्या (कुळवाच्या) आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व अवशेष जमिनीत मिसळून पुढील पिकासाठी शेत तयार करावे.

🟢 ढेंचा खताची वैशिष्ट्ये
🔆 ढेंचा हलक्या, मध्यम, भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही भरपूर वाढतो.
🔆 ढेंचाचे वाढीवर कमी ओल किंवा अधिक पाणी ह्याचा फारसा वाईट परिणाम होत नाही.
🔆 ढेंचाची वाढ झपाट्याने होत असल्याने केवळ 45-50 दिवसांनतर जमिनीत गाडल्यामुळे पूर्णपणे कुजून त्याचे खत पुढील पिकास उपलब्ध होते.
🔆 ढेंचापासून प्रती एकर 80 क्विंटल हिरवळीचे खत मिळते जे एकरी 224 क्विंटल शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास देते. (1 क्विंटल हिरवळीचे खत = 2.8 क्विंटल शेणखताचे सत्त्व)
🔆 ढेंचा कुजत असताना सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते.
🔆 ढेंचामुळे भरपूर कॅल्शियम उपलब्ध होऊन जमीन चिबड करणारे पाण्यात न विरघळणारे सोडीयमचे क्षार द्राव्य अवस्थेत येऊन पावसाचे वा ओलिताचे पाण्याद्वारे त्यांचा निचरा होऊन अशा जमिनीची सुपीकता वाढते.
🔆 ढेंचा द्विदलवर्गीय पीक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत करते.
🔆 ढेंचामुळे पुढील पिकास प्रती एकर 35 किलो नत्र, 7.3 किलो स्फुरद, 17.8 किलो पालाश, 1.9 किलो गंधक, 1.4 किलो कॅल्शियम, 1.6 किलो मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये आणि जस्त – 25 पी.पी.एम., लोह – 105 पी.पी.एम.,तांबे – 7 पी.पी.एम. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!