krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agricultural production : आता तरी पोटापुरते पिकवा ना भाऊ!

1 min read
Agricultural production : कांदा एक रुपया किलो! कुणाला दोन रुपयांचा चेक! कुणाला उणे एक रुपयांची उलटी पट्टी! कोणी वांगी बाजारात फेकून देत आहेत तर कोणी फुलकाेबीच्या शेतात बकऱ्या सोडतय. कोणी कांद्याला पाळी घालतय तर कोणी वांगी उपटून टाकतेय... कोण काय!! कोण काय!!! मनाचं नाही सांगत. टीव्हीवर दखवलं हो हे सगळं !!

🟢 पाचवीला पुजलेली भीती व अपमान
एक पीक तयार करायला सहा महिने राबावं लागतं शेतात. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, कामाला सुट्टी नाही. राबायचच. बाकी सगळ्यांना दिवसा लाईट. शेतकऱ्यांनी मात्र रात्रीची लाईट. शेतात, काट्याकुट्यात, साप, विंचू , लांडगे, बिबट्याच्या दहशतीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शेतात पिकाला पाणी द्यायचं. विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून मरायचा धोका पत्करून पीक जगवायचं. जवळचं भांडवल कधीच उडालेलं म्हणून कर्ज काढून पीक काढायचं. वीज बिल थकलं म्हणून आकडे टाकून पाणी उपसायचं. वायरमन, बँकेच्या साहेबांनी केलेला अपमान मुकाट गिळून गप्प बसायचं. सगळं सहनच करायचं. कशासाठी? हे पीक पदरात पडलं की सगळी देणी मिटवायची. शिल्लक राहिलेल्या पैशात पुढच्या पिकाची तयारी करायची. पुन्हा रानात राबायला. मरायला तयार व्हायचं.

🟢 कसा जगायचं शेतकरी?
पीक तयार झालं की बाजार कोसळलेला. बाकी खर्च सोडाच, शेतातून मार्केटपर्यंत माल घेऊन जाण्याचा खर्च सुद्धा निघायची मारामार. सगळे हिशेब कोलमडतात, सगळी स्वप्ने धुळीला मिळतात. आम्ही शेतकरी स्वप्नच का पहातो कळत नाही. ही परिस्थिती फक्त भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, उसाच्या शेतकऱ्याने हजारो रुपये खर्च करून पिकवलेला ऊस तोडून नेण्यासाठी पुन्हा एकरी 10-15 हजार रुपये खर्च करायचे. पण काय भाव मिळल माहीत नाही. द्राक्षाला किमान 35 रुपये किलोला भाव मिळाला तर परवडतं, ते द्राक्ष आज 20 रुपये किलो विकावे लागत आहेत. कसा जगायचं शेतकरी? ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना लुटून राज्य करण्याचे कारस्थान या देशात सुरू आहे. शेतीमालाला भाव मिळू द्यायचाच नाही, असं धोरण सत्तेत आलेल्या सर्व पक्षांनी राबवले आहे. शेतकरी संघटनेने 1984 साली परभणी येथे घेतलेल्या अधिवेशनात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना ‘पोटापुरते पिकविण्याचा’ सल्ला दिला होता. पण शेतकऱ्यांनी तो मानला नाही, त्याचे हे परिणाम आहेत.

🟢 शेतकरी पोटापुरते पिकविण्याचा निर्णय का घेत नाही?
❇️ पोटापुरते पीकवायचे म्हटले तर, इतर खर्च कसे भागवायचे, हा पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. पण असे ही तोट्यात गेल्यावर हे खर्च कसे भागवतात? एकदा नाही दर वर्षी, सगळ्याच पिकात असाच अनुभव येऊ लगला आहे. मिळत काहीच नाही उलट जवळचे आहे ते जातंय, कर्ज होतंय. पिकवायचे थांबवले तर किमान खर्च तरी कमी होईल.
❇️ दुसरा विचार येतो तो हा की, आपण नाही पिकवलं अन बाकीच्यांनी पिकवलं तर त्यांना जास्त भाव मिळेल, आपल्याला नाही मिळणार. पण आता असे ही होणे नाही कारण मालाचा तुटवडा आला तर सरकार निर्यातबंदी करून भाव पाडेल. साठ्यांवर निर्बंध लावेल, आयती करील, लेव्ही लावून तुमच्या घरातला माल उचलून नेईल, पण भाव मिळू देणार नाही.
❇️ तिसरे असे की, शेती नाही केली तर काय करावा? हा प्रश्न पडतो. फक्त दोन वर्षे शेतकऱ्यांनी आराम करावा, जमिनीलाही आराम द्यावा. शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वेळ द्यावा, सभा मेळाव्यांना हजर राहून आपली एकजुटीची ताकद दाखवावी. सरकारला वठणीवर आणायचा निर्धार दाखवावा.

🟢 कोंडीत सापडलो आहोत का?
शरद जोशी यांनी एका इंग्रजी पुस्तकात असे म्हटले आहे की, शेतकरी शेती बंद करण्याचा निर्णय सहजासहजी घेणार नाही. जेव्हा त्याला समजेल की, ‘जास्त उत्पादन काढले तरी आपला तोटाच होतो आहे व आपण कोंडीत सापडलो आहे, तेव्हाच शेतकरी उत्पादन कमी करण्याच्या मार्गाचा अवलंब करेल.’ मला वाटतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पिकांचा उत्पादनखर्च खूप वाढला आहे व पिकांचे उत्पादन मुबलक होत आहे. हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकरी नोंदणी केंद्रावर चेंगराचेंगरी करत आहेत. मोहरीला भाव नाही म्हणून उत्तर भारतातले शेतकरी रस्त्यावर आले आहेत. मागच्या वर्षीचा धान (भात) विकला नाही मग नवीन धान कुठे ठेवावा हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कापूस, सोयाबीन, कांदा वगैरे कितीही दिवस साठवून ठेवले तरी भाव मिळाला नाही. मग पैसे येणार कुठून? पिकवायचे तरी कशाला?

🟢 शेती काही काळ बंद ठेवता येईल का?
पिकवले नाही तर दिवस कसे काढायचे? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. आम्ही शेती करणे बंद करायचा निर्णय घेताना घरात चर्चा झाली. सन 1995-96 ची घटना आहे. तेव्हा मी घरच्यांना विचारले, ‘आपल्याला पिकासाठी जमीन तयार करायला किती खर्च येईल?’ अंदाजे 50 हजार रुपये असा हिशोब निघाला. त्याकाळी साधारण आमच्या कुटुंबाला महिन्याला 2 हजार रुपयांचा किराणा लागत असे. म्हणजे फक्त जमीन तयार करण्याच्या खर्चात दोन वर्षांचा किराणा भागत होता. नंतरचे बियाणे, खते, औषधे, मजुरी, बारदाना वगैरे वगैरे हे सगळे खर्च अजून बाकीच होते. तेव्हा आम्ही स्वतः शेती न करण्याचा निर्णय घेतला व सुखी झालो.

🟢 बाहेरचा पैसे शेतीत का घालावा?
अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत वेगळे आहेत. कोणी चांगल्या पगाराच्या नोकरीला आहेत, व्यापार आहे, ठेकेदारी आहे, उद्योग आहेत. ही मंडळीही तिकडे कमावलेले पैसे शेतीत घालवत असतात. शेतीत घातलेले पैसे परत येत नाहीत, हे समजत असूनही शेती करतच रहातात. कारण, जमीन पडीक ठेवली तर लोक काय म्हणतील? याची त्यांना चिंता असते. ज्यांना शेतीशिवाय काही उत्पन्नाचे साधन असेल, त्यांनी तर शेती फायद्याची होईपर्यंत शेतीत पैसे वाया घालवणे बंदच करायला हवे.

🟢 पोटापुरते पिकवायचे आंदोलन करण्याची ही योग्य वेळ
पोटापुरते पिकवण्याचे आंदोलन करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. एरव्ही इतर देशांमध्ये भरपूर अन्नधान्य पिकत असते व भारत आयात करत असतो. पण आता जगभर तुटवडा निर्माण हाेण्याची शक्यता जास्त आहे. आयात करायची म्हटले तरी भारताला परवडणार नाही. अन् सर्वच पिकांचे उत्पादन घटवले तर, काय काय आयात करणार?

🟢 अल निनोचा धाेका व दुष्काळाची शक्यता
पुढच्या हंगामात अल निनोचा धोका असल्याचे भाकीत केले जात आहे. म्हणजे दुष्काळ पडण्याची शक्यता दाट. तुम्ही पेरणी केली तरी ती वाया जाण्याचीच शक्यता आहे. त्यापेक्षा पोटापुरते पिकवायच्या आंदोलनात सहभागी होऊन सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या नाराजीचा संदेश जाऊ द्या.

🟢 लूट थांबवण्यासाठी आंदोलन
हा विचार सर्वांना पचणे अवघड आहे. पण राज्यकर्ते आपली सत्ता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना लुटून ग्राहकाचे लांगुलचालन करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. इकडे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून कंगाल झाला आहे. कर्जपायी बँका आपल्या जमिनी गिळायला टपून आहेत. तरी पिकवतच रहायचे का? लुटून घेतच रहायचे का? नाही सहन झाले तर फाशी घ्यायची का? अनेक पिढ्यांपासून आपली होणारी लूट थांबवायची असेल, आपल्या पुढच्या पिढ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगताना पाहायचे असेल तर, दोन वर्षे तरी पोटापुरते पिकवण्याचे आंदोलन करावे लागेल. नाही तर शेतकऱ्यांना लाचारीचे आणि दारिद्र्याचे जिणे जगत रहाण्याशिवाय पर्याय नाही.

1 thought on “Agricultural production : आता तरी पोटापुरते पिकवा ना भाऊ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!