krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Urea, DAP Prices : युरियाचे दर प्रति टन 400 तर डीएपीचे दर 640 डाॅलरपर्यंत घसरले

1 min read
Urea, DAP Prices : देशात रासायनिक खतांमध्ये युरियाचा सर्वाधिक खप आहे. जागतिक बाजारात वर्षभरापूर्वी युरियाचे (Urea) दर (Prices) प्रति टन 950 डॉलरपर्यंत पाेहाेचले हाेते. ते दर आता प्रति टन 400 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. डायअमाेनियम फॉस्फेट (DAP) ची विक्री दुसऱ्या क्रमांकावर असून, आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीचे दर प्रति टन 640 डाॅलरपर्यंत खाली आले आहेत. मागील वर्षी डीएपीचे दर प्रति टन 1,000 डाॅलरपेक्षा अधिक हाेते. खतांच्या पूर्वी दरात झालेल्या या घसरणीचा फायदा केंद्र सरकारला रासायनिक खतांवरील (Fertilizer) अनुदानात (subsidy) हाेणार आहे. कारण, रासायनिक खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने खतांवर माेठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असून, खतांचे दर कमी झाल्याने अनुदानाच्या रकमेत बचत हाेणार आहे.

🌎 केंद्र सरकारला दिलासा
देशात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्यांना माेठे अनुदान देते. जागतिक बाजारात खतांच्या किमती सातत्याने कमी हाेत असल्याने अनुदानाच्या रकमेत बचत हाेणार असून, त्यातून केंद्र सरकारला दिलासा मिळणार आहे.
❇️ वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाची किंमत प्रति टन 950 डाॅलर एवढी हाेती. हे दर यावर्षी 550 डाॅलरने उतरले असून, सध्या युरियाचे दर प्रति टन 400 डॉलरपर्यंत खाली आले आहेत.
❇️ मागील वर्षी डीएपीचे दर प्रति टन 1,000 डाॅलरपेक्षा अधिक हाेते. ते आता प्रति टन 360 डाॅलरने कमी झाले असून, 640 डाॅलर प्रति टनावर स्थिर झाले आहेत. जागतिक पातळीवर या खतांचे दर कमी झाल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारला अनुदान बचतीच्या रुपाने हाेणार असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.

🌎 युरिया व डीएपीची आयात
❇️ देशात दरवर्षी सुमारे 90 लाख टन युरिया आणि 55 लाख टन डीएपीची आयात केली जाते. युरियाच्या आयातीसाठी केंद्र सरकारने देशात तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती केली आहे. किमती घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठ्यातील सुधारणा हाेय, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले. येत्या काही दिवसात केंद्र सरकार युरियाच्या आयातीबाबत निविदा जारी करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
❇️ केंद्र सरकार युरियाचे दर प्रति टन 400 डाॅलरपेक्षा आणखी कमी हाेण्याची प्रतिक्षा करीत असल्याचे जाणकार सांगतात.
❇️ दीड वर्षापूर्वी डीएपीच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली हाेती. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर डीएपीचे दर वाढायला सुरुवात झाली. सोबतच डीएपी आणि युरियाचा प्रमुख निर्यातदार असलेल्या चीनने या निर्यातीवर बंदी घातली होती.
❇️ विशेष म्हणजे, भारत चीनकडून मोठ्या प्रमाणात डीएपीची आयात करत आहे. दरम्यान, चीनने काही महिन्यांपूर्वी डीएपीची निर्यात पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे भारताला चीनमधून डीएपीची आयात करण्यास पुन्हा संंधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जॉर्डनसोबत डीएपी आयातीबाबत काही करार झाले आहेत.
❇️ चालू वर्षात डीएपीची आयात 60 लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यताही उद्याेग क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

🌎 रासायनिक खतांच्या उत्पादनात वाढ
❇️ चालू वर्षात (सन 2022-23) एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत युरिया, डीएपी DAP, एनपीके NPK आणि एसएसपी SSP या रासायनिक खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
❇️ एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या काळात युरियाचे 237.14 लाख टन उत्पादन झाले हाेते. मागील वर्षी म्हणने एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीच्या तुलनेत हे उत्पादन 12.8 टक्क्यांनी अधिक आहे.
❇️ या कालावधीत डीएपीचे उत्पादन 35.71 लाख टन झाले हाेते. जे मागील वर्षीच्या तुलनेत 4 टक्के अधिक आहे. या कालावधीत एनपीके खतांचे उत्पादन 8.6 टक्क्यांनी वाढून 79.89 लाख टन झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत एसएसपीचे उत्पादन 6.4 टक्क्यांनी वाढून 47.58 लाख टन झाले आहे.

🌎 आयात वाढली
❇️ एप्रिल 2002 ते जानेवारी 2023 या काळात डीएपीच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत 58.80 लाख टन डीएपीची आयात करण्यात आले. ही आयात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 38.2 टक्के अधिक आहे.
❇️ या कालावधीत युरियाच्या आयातीत केवळ 1.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या काळात 73.10 लाख टन युरियाची आयात करण्यात आली. ही आयात मागील वर्षीच्या याच कालावधीत 72.08 लाख टन होती.
❇️ चालू वर्षात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत म्युरिएट ऑफ पोटॅश (MOP) च्या आयातीत 16.6 टक्क्यांनी घट झाली आहे. चालू वर्षात जानेवारीपर्यंतच्या याच कालावधीत 17.36 लाख टन एमओपीची आयात करण्यात आली होती. जी गेल्या वर्षी 20.81 लाख टन इतकी होती. एनपीके खतांची आयात 99.4 टक्क्यांनी वाढून 22.49 लाख टनांवर पोहोचली आहे.

🌎 खतांच्या विक्रीत वाढ
❇️ चालू वर्षात एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत युरियाची देशांतर्गत विक्री 6.9 टक्क्यांनी वाढून 319.02 लाख टन झाली आहे.
❇️ याच काळात डीएपीची विक्री 15.7 टक्क्यांनी वाढून 97.41 लाख टनांवर पोहोचली आहे.
❇️ एमओपी MOP विक्री 37.2 टक्क्यांनी घसरून 14.02 लाख टन आणि एनपीके (NPK) खतांची 89.33 लाख टनांपर्यंत घसरण झाली. जी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत 13.7 टक्क्यांनी घसरली आहे.
❇️ सन 2021-22 मध्ये याच कालावधीत 50.96 लाख टनांच्या तुलनेत एसएसपी विक्री 9.8 टक्क्यांनी घसरून 45.96 लाख टन झाली.
❇️ मिश्र खतांची किंमत डीएपीपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांनी जास्त डीएपी खरेदी केली आहे. मिश्र खतांचा वापर कमी झाल्याने या खतांच्या वापरातील असमतोल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🌎 खतांचे उत्पादन व वापर
❇️ सन 2021-22 मध्ये देशात युरियाची एकूण विक्री 341.80 लाख टन होती तर, उत्पादन 250.75 लाख टन होते. ही तूट 91.36 लाख टन युरिया आयात करून भरून काढण्यात आली.
❇️ डीएपीचा एकूण वापर 92.72 लाख टन होता. यात डीएपीचे 42.21 लाख टन उत्पादन देशांतर्गत असून, 54.62 लाख टन डीएपी आयात करण्यात आली.
❇️ या कालावधीत एमओपीची विक्री 24.56 लाख टन एवढी हाेती. या कालावधीत 24.60 लाख टन एमओपी आयात करण्यात आली.
❇️ गेल्या वर्षी एनपीके (NPK) या मिश्र खतांची विक्री 114.78 लाख टन होती. या कालावधीत देशात 83.06 लाख टन मिर खतांचे उत्पादन करण्यात आले आणि 11.70 लाख टन मिर खते आयात करण्यात आले.
❇️ सन 2021-22 मध्ये एसएसपी SSP ची विक्री 56.81 लाख टन होती. जी पूर्णपणे देशांतर्गत उत्पादनातून पूर्ण झाली. या काळात देशात 53.51 लाख टन एसएसपीचे उत्पादन झाले.

🌎 खतांच्या किमतीसाेबत अनुदानात वाढ
मागील दाेन वर्षात रासायनिक खतांच्या दरात माेठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंताेष निर्माण झाला हाेता. त्यामुळे केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या अनुदानात वाढ केली. या अनुदानाचा थेट फायदा हा खत उत्पादक कंपन्यांना हाेताे. मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांच्या दरात मोठी घसरण हाेत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने भारतीय कंपन्यांना खत निर्यात करणाऱ्या अनेक देशांशी दीर्घकालीन आयात करार करण्यास मदत करून तशी मुभाही दिली आहे. चालू रब्बी हंगामात रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपीच्या 50 किलोच्या बॅगच्या दरात 150 ते 1,350 रुपयांची वाढ केली आहे. असे असतानाही डीएपीची किंमत मिश्र खतांच्या तुलनेत कमी असल्याने डीएपीच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे नाेंदविण्यात आले. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजात केंद्र सरकारने रासायनिक खत अनुदान म्हणून 2.25 लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रासायनिक खत अनुदानासाठी 1,75,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!