Import of edible oil; Oilseed prices : खाद्यतेलाची विक्रमी आयात; तेलबियांचे दर घसरले
1 min read🌍 पेरणीक्षेत्र व उत्पादन
अंतीम पेरणी आकडेवारीनुसार, चालू रब्बी हंगामात (2022-23) 98.02 लाख हेक्टरमध्ये मोहरीची पेरणी करण्यात आली हाेती. सन 2021-22 मध्ये माेहरीचे पेरणीक्षेत्र 91.25 लाख हेक्टर हाेते. ते मागील वर्षीच्या तुलनेत 6.77 लाख हेक्टरने वाढले आहे. सन 2021-22 मध्ये माेहरीचे 117.46 लाख टन उत्पादन झाले हाेते. केंद्र सरकारच्या दुसऱ्या अंदाजानुसार, यावर्षी मोहरी आणि रेपसीडचे उत्पादन 120.80 लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतर तेलबियां एकूण उत्पादन 400 लाख टन हाेणार असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.
🌍 खाद्यतेलाची विक्रमी आयात
भारत आपल्या एकूण गरजेच्या 68 टक्के खाद्यतेलाची आयात करतो. जानेवारी 2023 मध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 33 टक्क्यांनी वाढ झाली असून, 16.61 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले आहे. ही आजवरची विक्रमी आयात असल्याची माहिती बाजार तज्ज्ञांनी दिली. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये खाद्यतेलाची विक्रमी आयात करण्यात आली हाेती. जानेवारी 2022 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये खाद्यतेलाची आयात 31 टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात सर्वाधिक सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरील सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या दरातील घसरण आणि शुल्क वाढण्याच्या भीतीमुळे भारत सरकारने खाद्यतेलाची विक्रमी आयात केली आहे. यावर्षी देशात मोहरीच्चे विक्रमी उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना खाद्यतेलाची विक्रमी आयात करण्यात आली. यावर्षी माेहरी व इतर रब्बी तेलबियांच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाल्याने या तेलबियांचे अधिक उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
🌍 वनस्पती तेलाची आयातीत 30 टक्क्यांनी वाढ
❇️ सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA)च्या मते, जानेवारी 2022 च्या आधी, वनस्पती तेलाची (खाद्य व अखाद्य तेल) सर्वाधिक आयात 12,70,728 टन होती. जानेवारी 2023 मध्ये खाद्यतेलाची आयात 3,91,022 टनांनी वाढली असून, ती 16,61,750 टनांवर पाेहाेचली आहे.
❇️ तेल वर्ष (1 नोव्हेंबर-31 ऑक्टोबर) 2022-23 मधील पहिल्या तीन महिन्यात (1 नोव्हेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023) वनस्पती तेलाची आयात 30 टक्क्यांनी वाढून 47,73,419 टनांवर पोहोचली आहे. यामध्ये खाद्यतेलाचा वाटा 47,46,290 टन तर अखाद्य तेलाची आयात 27,129 टन आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत एकूण आयात 36,71,161 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली हाेती. त्यानंतर 36,07,612 टन खाद्यतेल आणि 63,549 टन अखाद्य तेल आयात करण्यात आले.
❇️ आंतरराष्ट्रीय बाजारात नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये सोया आणि सूर्यफूल तेलाचे दर प्रति टन 1,400 डाॅलरपर्यंत तर पामतेलाचे दर प्रति टन 950 ते 1,000 डाॅलरपर्यंत खाली आले हाेते. त्यामुळे भारतीय खाद्यतेल आयातदारांनी अधिक सौदे करून आयात वाढवली.
❇️ 1 जानेवारी 2023 पासून खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, त्यामुळे आयातीतही वाढ करण्यात आली.
❇️ रशिया आणि युक्रेनमधून मालवाहू जहाजांसाठी काळा समुद्र कॉरिडॉर पुन्हा बंद होण्याच्या भीतीने जानेवारीत सूर्यफूल तेलाची आयात वाढली. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली होती. त्यामुळे दोन्ही देशांकडे सूर्यफुलाचा भरपूर साठा होता. त्यांनी त्याचा बराचसा साठा काढून टाकल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत.
❇️ साधारणत: जागतिक बाजारात सूर्यफूल तेलाचे दर सोयाबीन तेलापेक्षा सुमारे 50 डाॅलर प्रति टन अधिक असतात. सध्या सोयाबीन तेलाचे भाव सूर्यफूल तेलापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जानेवारीत सूर्यफूल तेलाची आयात वाढून 4.61 लाख टन झाली आहे. हे दर महिन्याला सरासरी आयात होणाऱ्या आयातीपेक्षा जवळपास तिप्पट आहे.
❇️ तेल वर्ष 2021-22 मध्ये देशात सरासरी 1.61 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली. SEA च्या मते, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीत वाढ झाल्याने पाम तेलाची आयात कमी होऊ शकते. त्यामुळे पामतेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात.
🌍 माेहरीचे दर काेसळले
देशात मोहरी आणि इतर तेलबिया पिकांचे उत्पादन वाढल्याने तसेच याच काळात खाद्यतेलाच्या आयातीत वाढ झाल्याने या आयातीचा परिणाम देशांतर्गत बाजारातील तेलबियांचे दर घसरण्यावर झाला आहे. देशांतर्गत बाजारात नवीन मोहरीची आवक सुरू झाली आहे. मोहरीचे पेरणीक्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. खाद्यतेलाच्या आयातीमुळे माेहरीचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली आले आहेत. केंद्र सरकारने सन 2022-23 च्या हंगामासाठी माेहरीची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 5,450 रुपये जाहीर केली असून, माेहरीला सध्या बाजारात सरासरी 4,500 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. आगामी पंधरवड्यात बाजारात माेहरीची आवक वाढणार असल्याने दर आणखी कमी हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🌍 भारत खाद्यतेलाचे डम्पिंग ग्राउंड
भारताला खाद्यतेलाचे डम्पिंग ग्राउंड बनवले जात आहे. हे थांबविण्यासाठी खाद्यतेल व तेलबियांच्या आयातीवर माेठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारणे अत्यावश्यक आहे. मात्र, केंद्र सरकार याच्या उलट निर्णय घेत असल्याने एकीकडे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यंाचे प्रचंड आर्थिक नुकसान हाेत असून, दुसरीकडे अमूल्य परकीय चलन खर्च हाेत आहे. माेहरीचे दर किमान आधारभूत किमतीच्या खाली आल्याने खाद्यतेल आणि तेलबियांच्या आयातीवर आयात शुल्क लावण्यासाठी केंद्र सरकारवर दबा निर्माण करणे आवश्यक आहे.
🌍 केंद्र सरकारला महागाईची चिंता
केंद्र सरकारला तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांऐवजी शहरी ग्राहक आणि महागाई नियंत्रणाची सतत चिंता असते. खाद्यतेल व तेलबियांच्या आयातीवर आयात शुल्क आकारल्यास खाद्यतेलाच्या किमती वाढतील आणि आधीच संपन्न असलेले शहरी ग्राहक महागाई वाढल्याच्या नावावर बाेंबा ठाेकतील, अशी भीतीही केंद्र सरकारला वाढत असून, केवळ मतांच्या राजकारणासाठी केंद्र सरकार तेलबिया उत्पादकांचा बळी देत आहे. तेल वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत RBD (रिफाइंड) पामोलिनच्या आयातीमध्ये माेठी वाढ झाल्याने SEA ने चिंता व्यक्त केली आहे. या कालावधीत पामोलिनची आयात 20 टक्क्यांनी वाढून 6.3 लाख टनांवर पोहोचली आहे. त्यामुळे देशांतर्गत रिफायनरीज प्रभावित होत असल्याची चिंता तेलबियांवर वायदेबंदी घालण्याची मागणी करणाऱ्या साेपा (SOPA – The Soybean Processors Association of India)सह एसईए (Solvent Extractors Association of India) या संघटनांनी व्यक्त केली आहे.