krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Constructive farmer movement : शेतमालाच्या भावासाठी हवे रचनात्मक आंदोलन

1 min read
Constructive farmer movement : योग्य भावाअभावी कापूस (Cotton) शेतकऱ्यांच्या घरांत पडून आहे. कावरा झालाय, अंग खाजवतेय, पण भाव नाही. सोयाबीनचे (Soybean) भाव प्रति क्विंटल 5,000 ते 5,500 रुपयांच्या पुढे सरकलेच नाहीत. बाजारात हरभऱ्याचे (Gram) दर पडलेलेच. कांदा (Onion) मातीमोल दराने विकावा लागतो तर, टोमॅटो तोडून बाजारात विकायला आणायला परवडत नाही. कुठे पत्ताकोबीवर रोटाव्हेटर फिरवले गेलेय तर, कुठे फ्लॉवरमध्ये गुरे सोडली गेलीत. हे सर्व सुरू आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 'अमृत काळात'! त्यामुळे सध्या शेतमालाच्या भावासाठी (Agricultural prices) रचनात्मक आंदोलन (Constructive farmer movement) करणे आवश्यक आहे.

🌐 उत्पन्न दुप्पट आणि शेतकरी चौपट
काय तर म्हणे, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू! ईथे शेतकरीच चौपट होण्याची वेळ येऊन ठेपलीय. जे सरकार येईल ते तसेच. अधिकाधिक लोकसंख्येला शेतीत गुंतवून त्यांच्याकडून कमीत कमी भावांत शेतमाल खरेदी करण्याच्या उद्देशाने शेतीचे तुकडे पाडले गेलेत. आज हेच अल्पभूधारक शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने व विकायला शिल्लक जमीन नसल्याने आत्महत्या करताहेत. 56 इंचीचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणले होते. त्याच वेळी शेतमालाचे भाव पाडण्याचे झाडून सारे हातखंडे मोदींचेच मंत्री वापरत होते. एकमेकांना समांतर असणाऱ्या या दोन कृती एकाच वेळी देशाला अनुभवायला मिळाल्या. जणू एका हातात ‘शेतकरी स्वातंत्र्याच्या वेष्टनातील लॉलीपॉप’ व दुसऱ्या हाती शेतकऱ्यांच्या गळ्यावर फिरणारी धारदार सरकारी सूरी! त्यामुळे शेतकऱ्यांचे ‘उत्पन्न दुप्पट आणि शेतकरी चौपट’ म्हणण्याची वेळ आली आहे.

🌐 खिंडीत अडकल्या शेतकऱ्यांच्या संघटना
सरकारच्या त्रुटीतल्या स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्यांची गोची सरकारने हातोहात करून टाकली. तर विरोधात उभ्या ठाकलेल्यांची स्थिती रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी होती. भारतीय शेतकरी निरपेक्ष नजरेने हे सारे टिपत होता. जीवन मरणाच्या संघर्षासोबत त्याची आपली एक विचार प्रक्रिया, मूल्यमापन निरंतर सुरू असते. नाही म्हणायला आपल्याच दिखाऊ धोरणांना छेद देणाऱ्या सरकारच्या भावपाड्या कृतिविरोधात जनसमर्थन कसे मिळवावे, अशा खिंडीत शेतकऱ्यांच्या संघटना बेमालूमपणे अडकल्या आहेत. आज एकाही शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल असे भाव नसताना त्यावेळी दिल्लीच्या सीमांभोवती आंदोलन करणारा ‘संयुक्त किसान मोर्चा’ आज कुठेही दिसत नाही.

🌐 मतपेटीच्या राजकारणाचा राजकीय उद्योग
तंत्रज्ञानाने उत्पादन कदाचित वाढेल, उत्पादन खर्च ही कमी होईल, पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा शेतमालाच्या भावांभोवतीच फिरतो, हे विसरून चालणार नाही. जगात उपलब्ध हवे ते तंत्रज्ञान वापरण्याचे, तपासून पाहण्याचे स्वातंत्र्य मात्र शेतकऱ्यांना हवे. सरकारला जर अर्ध्या अधिक जनसंख्येला फुकट किंवा अत्यल्प दरांत खाऊ घालायचे आहे तर त्यांच्या लेखी शेतमालाच्या भावाचा अन मालाच्या गुणवत्तेचा प्रश्न तसाच निकाली निघालेला आहे. किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे, कर्जमाफी, पीकविमा, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ आदीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आपल्यामागे फिरायला, हेलपाटे मारायला लावावे, एवढेच काय ते शेतकऱ्यांच्या नशिबी सरकारने लिहून ठेवले आहे.
शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आपल्या मतपेटीचे राजकारण शाबूत ठेवावे, हाच काय तो राजकीय उद्योग!

🌐 सेवाक्षेत्रातील श्रीमंतीचा ताण हतबल शेतकऱ्यांवर
आज राजकीय व्यवस्थेने शेतकऱ्यांना सर्वच बाजूनी हतबल व आपल्यामागे फिरायला मजबूर केले आहे. एकीकडे शेतीत उत्पादन खर्च भरून निघत नाही तर दुसरीकडे सेवाक्षेत्रातील श्रीमंतीचा ताण शेतकऱ्यांवर पडतो आहे. शेतमालाच्या बाजारात अगतिक झालेल्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना एक तर लग्नाला मुलगी द्यायला कुणी तयार होत नाही किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काहीच करू शकणार नाही, या भीतीने त्यांची लग्न करण्याची मनापासून हिंमत होत नाहीय, हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे.

🌐 दारिद्र्याच्या प्रश्नाचे उत्तर रास्त भावात
शेतमालाला ‘भाव’ मिळू द्यावे, ही उच्चारायला अगदी साधी गोष्ट व्यवस्थेने शेतकऱ्यांना पिढ्यानपिढ्या नाकारली. इतकी नाकारली की, शेती क्षेत्रातील काही मंडळींना आता त्यानेही काही होणार नाही ती बाब आता ‘कालबाह्य’ झाली आहे, असे वाटू लागावे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात अशक्य वाटणारे ऐतिहासिक कर्तृत्व शेतकरी संघटनेची उभारणी ही शेतमालाला ‘रास्त भाव’ या एक कलमी कार्यक्रमावर केली होती. लाखो शेतकऱ्यांमध्ये आत्मभान जागवणारी ही शेतकरी संघटनेची ही प्रचंड ईमारत शेतमालाला ‘रास्त भाव’ या एका खांबावर दिमाखात उभी होती. ‘शेतमालाला रास्त भाव’ या एकाच विचाराच्या धाग्यात शेतकऱ्यांच्या सुखाने, सन्मानाने जगण्याच्या मार्गाचे महावस्त्र शेतकरी संघटनेच्या विचार आणि कार्यपद्धतीने विणले होते. या एकाच विचाराच्या धाग्याच्या महावस्त्रात मानवी आयुष्याच्या सर्वच अंगांची गुणवत्ता वाढवण्याची क्षमता बघायला मिळायची. मानवी आयुष्यात निवडीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावून आयुष्याची व एकंदर समाजाची, राष्ट्राची गुणवत्ता वाढावी, हे मोठे तत्वज्ञान व एकंदर दारिद्र्याच्या प्रश्नाचे उत्तर शेतमालाचे ‘भाव’ या संकल्पनेत दडलेले आहे, हे नव्या पिढीला समजावणे आज गरजेचे आहे. शेतमालाचे भाव या एका संकल्पनेत अर्थवाद आहे, मानवतावाद आहे, स्त्रियांच्या, बालकांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, निरंतर विकासाचा विचार आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उद्योग, रोजगार, कायदा, सुव्यवस्था, न्याय, संरक्षण या साऱ्या साऱ्या मानवी प्रेरणाची उत्तरे आहेत. ते स्वतः समजावून घेणे, लक्षात ठेवणे व नव्या पिढीपर्यंत पोहचवणे ही जबाबदारी पेलणारी डोकी मात्र वाढवायला हवीत.

🌐 मार्शल प्लानची आवश्यकता
आज शेतकरी आंदोलनांचे फ़ार्स आजूबाजूला दिसत असले तरी ते शेतकऱ्यांमध्ये आश्वासकता आणि विश्वास मात्र निर्माण करू शकत नसल्याचे चित्र दिसते. याचे कारण म्हणजे आंदोलनामागे ठोस विचार, तत्वज्ञान व प्रश्नाचे उत्तर शोधण्याची भूक असण्यापेक्षा प्रसिद्धीची हाव व हवाच दिसत असल्याचे दुर्दैवाने बऱ्याच पहायला मिळते. शेतमालाला रास्त भाव, हवे ते तंत्रज्ञान निवडण्याचे स्वातंत्र्य, व्यवस्थेने पिढ्यानपिढ्या गारद केलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘मार्शल प्लान’ ज्यामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती, रस्ते, शेतरस्ते, गोदामे, वाळवण गृहे, शीतगृहे, प्रक्रिया उद्योगाचे जाळे, आज कांदा, नाशवंत भाजीपाला, फळे आदी साठी निर्जलीकरण, पेस्ट बनवणे, गर बनवणे यासारखे दीर्घकाळ साठवणुकीचे व रास्त भाव मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ते मार्ग चोखाळायला शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा भांडवली पत पुरवठा, भाव पडलेले असतांना चांगल्या दर्जाचे शेतमाल तारण व साठवणूक व्यवस्था, वायदे बाजारातील भावांवर दहा टक्के सबसिडी शेतकऱ्यांना हवी आहे. होय, शेतकऱ्यांना सावरण्यासाठी नियंत्रणमुक्त बाजारासोबतच तंत्रज्ञान, संरचना, साठवणूक,भांडवली पतपुरवठा, तारण व्यवस्था व वायदे बाजारातील भावांवर दहा अधिक सबसिडी हवी आहे. तरच शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होऊ लागेल.
देशात व जगात विविध ठिकाणी विकेंद्रित झालेल्या अतिरिक्त उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला आहे. शेतमाल नियंत्रित ठेवण्याच्या धोरणांनी आम्ही जागतिक बाजारात आमचा हिस्सा 40 टक्क्यावरून 8 टक्क्यावर आणून ठेवला आहे. कांद्यामध्ये साठवणूक, प्रक्रिया व सरकार निर्मित समस्येचे निराकरण सरकारनेच रास्त भावाचे सूत्र जुळवण्यासाठी विकत घेतलेला कांदा नष्ट करण्याशिवाय तूर्तास तरी पर्याय नाही.
🌐 शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन
शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनामध्ये वरकरणी रेल रोको, रास्ता रोको, गावबंदी सारखी शस्त्रे दिसत असली तरी ते स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे अहिंसात्मक व देशातील सर्जक शक्तीच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाने जगण्याचा मार्ग प्रशस्त करणारे रचनात्मक आंदोलन होते. शेतकरी आंदोलनात सृजनाच्या रचनात्मक तेची हीच अपेक्षा पुढच्या काळात असेल. सर्जकांच्या स्वातंत्र्याचे शिवार फुलण्यासाठी काही बियांना यापुढे ही स्वतःला मातीत गाडून घ्यावे लागेल. त्या बियांमध्ये चळवळीमधला ‘मी’ ही असावा. बी हवेत डोलू लागले तर कणीस मात्र फुलणार नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे रंग येवोत याच रंगपंचमीच्या शुभकामना!

1 thought on “Constructive farmer movement : शेतमालाच्या भावासाठी हवे रचनात्मक आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!