Temple of Humanity : मानवतेच्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार कधी करणार?
1 min readमित्रहो कुठल्याही धार्मिक ग्रंथाच्या आधारे देश चालत नाही. तो देश त्या देशाच्या संविधानाच्या आधारेच चालतो हे सांगण्याची गरज नाही. मात्र, या देशात तसे होताना दिसत नाही. मूलभूत व शाश्वत प्रश्न लाथाळून धार्मिक बुवाबाजी, मोठमोठे आश्रम, मंदिर, आरत्या, कुंभमेळे यामध्येच सरकार आपला ‘अर्थ’पूर्ण वेळ घालत आहे. महाराष्ट्ाचे मुख्यमंत्री नव्हे, पूर्ण सरकार धार्मिक सभा, मंदिर या सर्व गोष्टींसाठी मुबलक निधी देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना दिसत आहे. शेतीसाठी काही करता येईल का? सुशिक्षित बेरोजगारांसाठी काही करता येईल का? शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा कर्जाचा, कृषिपंपाच्या विजेच्या बिलाचा प्रश्न यावर विचार करायला यांच्याकडे वेळ नाही. शेतकऱ्यांच्या सर्वच शेतमालाचे भाव पडलेले आहेत, याचा कोणी विचार करत नाही.
धार्मिक उत्सवांमध्ये कोट्यवधींचा खर्च करून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, काहीच कळत नाही. संत गाडगे महाराज म्हणतात, ‘देव दगडात नाही, तो माणसात आहे’. मात्र, या लोकांना माणसाचा, माणुसकीचा अर्थ समजलेला दिसत नाही. धर्म नावाची गोष्ट त्यांना उमगलेली दिसत नाही. मोठमोठे मंदिरे बांधून निव्वळ पुजाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. मात्र, गरीब, दुबळ्या, कष्टकरी जनतेचा विचार यांच्या मनाला शिवत नाही. दररोज मुख्यमंत्री साहेबांचा दौरा निव्वळ धार्मिक कार्यक्रमासाठीच असतो. मी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मानवतेच भग्न मंदिर जीर्णोद्धाराची वाट पाहत आहे. त्या मानवतेच्या मंदिराला तुम्ही कधी भेट देणार आहात? या महान अशा राष्ट्राची वाताहात होत आहे एका धर्माने दुसऱ्या धर्माला नाव ठेवून दुसऱ्या धर्माची कुचेष्टा करून आपल्या धर्माची प्रतिष्ठा वाढत नाही.
देव माणसाच्या हृदयामध्ये बसलेला आहे. तो मंदिरात बसलेला असता तर, कोरोना काळामध्ये मंदिर बंद करण्याची वेळ आली नसती. कोरोना काळाने सर्वांनाच एक चांगली अशी शिकवण दिलेली आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मानवतेपेक्षा कुठलाच जगात मोठा धर्म नाही. म्हणून पूज्यनीय साने गुरुजी म्हणतात, ‘जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ अर्थात या गरीब दुबळ्या जनतेच्या समस्यांचे निवारण करून ते प्रश्न सोडवावे. भारत हा धार्मिक देश आहे, हे मान्य आहे. मात्र, माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे हे विसरता कामा नये.