Maharashtrian Citizen : महाराष्ट्रीयन जनतेच्या डोळ्यात बिब्याचे तेल गेले की काय?
1 min read
राज्यामध्ये एकही असा विश्वासू न्यायप्रिय रचनात्मक काम करून समाजहित साधणारा राजकीय नेता नाही, कुणी कितीही मोठा असला तरी फक्त आपल्या राजकीय पार्टीसाठीच काम करून आमदार निवडून आणून सरकार कसे स्थापन करता येईल. त्यासाठी काही पक्षांचे आमदार विकत घेऊन काहींना आमिष दाखवून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाही राजकीय पार्टीकडे विश्वासार्हता शिल्लक राहिलेली नाही. दगाबाजपणा वाढलेला आहे. विश्वास ठेवण्यासारखं कोणीच शिल्लक राहिले नाही. राज्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, वाढती बेरोजगारी, राज्य ओल्या दुष्काळाच्या छायेत, आत्महत्या करणारा शेतकरी, कायदा सुव्यवस्था धोक्यात, महिलांवरील अत्याचार, दंगे, चोऱ्या, भ्रष्टाचार अशा कितीतरी गोष्टी वाढत आहे. लबाड ढोंगी पोपटपंची करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे राज्यातील काही महत्त्वाचे उद्योग राज्याबाहेर जात आहेत. मुंबई ही देशाचा आर्थिक कणा असलेल शहर, त्या शहरावरही इतर राज्यातील लोकांचा डोळा आणि त्यात त्या लोकांना राज्यातील लोकांची साथ हे सगळं सहन न होण्याच्या पलीकडचं असताना या राज्यातील जनता का शांत बसत आहे, हेच कळत नाही.
खरं म्हणजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. लढाऊ मावळ्यांचा महाराष्ट्र. आज हे सगळं सहन करून जगतोय कसा? महाराष्ट्रातील शूरवीर तरुणांना हे सगळं दिसत नाही का? डोळ्यात बिब्याचे तेल गेल्यासारखी का वागतात ही पोर? हे सगळं न समजण्याच्या पलीकडे झाल आहे.इथे पत्रकार, टीकाकार, विश्लेषक, साहित्यिक, भाष्यकार का मुंग गीळून बसले आहेत? या राजकीय लोकांनी कार्यकर्त्याच्या अडून गुंडांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. हळूहळू हा देश हे राष्ट्र हुकुमशाहीच्या मार्गाला जात आहे. देशाचा घसरत चाललेला जीडीपी, देशावर झालेलं कर्ज, रुपयाच सतत होत असलेल अवमूल्यन, शेजारील देशांचा आपल्यावर असणारा कटाक्ष तसेच व्यापाराच्या बाबतीत परकीय देशांची असलेले संबंध इत्यादी गोष्टींना कोणी महत्त्व का देत नाही? हा देश, हे राष्ट्र मोडकळीला आले आहे, तरी या महाराष्ट्रातील जनता सगळं अलबेल असल्यासारखं वागते आहे? हेच आपल्या विनाशाचं खरं कारण ठरणार आहे, यात शंका नाही.