Orange Black Fly Greening संत्रा-माेसंबी बागांवर काेळशीसाेबत ‘ग्रीनिंग’चे संकट
1 min read🌳 राेग-कीड व नुकसानीची तीव्रता
मागील तीन वर्षांपासून संत्रा-माेसंबीची वेगवेगळ्या कारणांमुळे फळगळ हाेत आहे. या वर्षी फळगळीमुळे हाेणाऱ्या नुकसानीची तीव्रता ही 30 ते 35 टक्के आहे. बुरशीजन्य (Fungal) व इतर राेग (Disease), तसेच किडींच्या (Pest) प्रादुर्भावामुळे 15 ते 20 टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता फळबाग व कीटकशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या संत्रा व माेसंबीसाेबतच पेरूच्या बागांवर काळी माशी म्हणजेच काेळशी प्रादुर्भाव आढळून येत आहे. काेळशीमुळे देखील फळगळ हाेत असल्याने या नुकसानीचे प्रमाण सध्या 15 ते 20 टक्के आहे. ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🌳 शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान
यापूर्वी विदर्भातील संत्रा-माेसंबी बागांवर काेळशीचा प्रादुर्भाव सन 1980 च्या दशकात झाला हाेता. त्यावेळी बागा वाळण्याचे प्रमाणही बरेच माेठे हाेते. यावर्षीही काेळशीचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. झाडांवर काळ्या माशीचा फार आधीच प्रादुर्भाव हाेताे. त्या माशा झाडांच्या पानांवर चिकट द्रव साेडतात. त्यावर बुरशी तयार हाेत असल्याने तसेच त्याचे वेळीच याेग्य व्यवस्थापन न केल्याने झाडांच्या पाने व फळांवरील काळपटपणा वाढत गेला. या बुरशीमुळे झाडांची प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) प्रक्रिया मंदावली असून, त्यांची पाने व फळे सुकून गळतात. पुरेशा अन्नद्रव्याअभावी झाडांची फळे देखील पक्व हाेत नाहीत. शिवाय, फळांमधील गाेडी (Sweetness) कमी हाेते. त्यामुळे ही फळं खायला बेचव (Testless) लागतात. ही फळ विकावयाची झाल्यास शेतकऱ्यांना ती पाण्याचे धुवून बाजारात आणावी लागतात. त्याला दरही कमी मिळता. त्यामुळे संत्रा-माेसंबी उत्पादकांना फळगळीमुळे घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील कमी दर असे तिहेरी नुकसान सहन करावे लागते.
🌳 शंकूचा प्रादुर्भाव व फळ भेगाळणे
अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यातील काही भागात संत्रा-माेसंबीच्या बागांवर शंकू (गाेगलगाय) (Snail) या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शंकू झाडांची पाने झपाट्याने खाते. त्यामुळे झाडांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण हाेते. याही कारणामुळे फळगळ हाेऊन नुकसान हाेत आहे. झाडांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची विशेषत: बाेरानची कमतरता निर्माण झाल्याने फळांना भेगा पडतात. याला शेतकरी ‘फडक्या’ असेही संबाेधतात. याचाही परिणाम संत्रा-माेसंबीच्या बाजारभावावर हाेताे.
🌳 ‘ग्रीनिंग’चा धाेका वाढला
झाडांची आंतरिक वाढ व राेग, फायटाेप्थाेरा, ब्राउन राॅट, पाेलाेट्रिकलम, फळमाशी, फ्रुट सकिंग माॅथ, काेळशी व इतर बुरशीजन्य राेग आणि किडींमुळे विदर्भातील संत्रा-माेसंबीमध्ये फळगळीचे प्रमाण वाढले आहे. राेग व किडींचे वेळीच याेग्य व्यवस्थापन केले नाही, तर नुकसानीची तीव्रता आणखी वाढेल. ‘ग्रीनिंग’मुळे आजवर जगातील लिंबूवर्गीय फळांच्या 35 ते 40 टक्के बागा नष्ट झाल्या आहेत. याच राेगाचा प्रादुर्भाव आता विदर्भातील संत्रा-माेसंबीच्या बागांना हाेत आहे. सिट्रससिला आणि मावा या किडींमुळे ‘ग्रीनिंग’चा (मंदरास व जलदरास) धाेका वाढला आहे. सिट्रससिलामुळे मंदरास तर माव्यामुळे जलदरासचा धाेका वाढताे, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.
🌳 सरकार, मंत्री व आमदारांची अनास्था
संत्रा-माेसंबी हे विदर्भातील प्रमुख फळपीक आहे. शासन दरबारी संत्रा-माेसंबी ही फळ, त्यांच्या बागा आणि उत्पादक शेतकरी सन 1960 पासून तर आजवर उपेक्षित राहिले आहेत. या दाेन्ही फळांवर व्यवस्थित संशाेधन न हाेणे, सरकारी हस्तक्षेपामुळे निकृष्ट प्रतीच्या कलमा तयार करून त्या बागा तयार करण्यासाठी वापरणे, या प्रकाराची कृषी विभागाकडून अप्रत्यक्ष पाठराखण करणे, नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणे या बाबी दरवर्षी अनुभवायला येत आहेत. विशेष म्हणजे, संत्रा-माेसंबी बेल्टमधील मंत्री व आमदारही याबाबत कमालीचे उदासीन आहेत. संत्रा-माेसंबीच्या बागा भरभराटीस याव्या, त्यावर आधारित प्रक्रिया उद्याेग उभे राहावे, निर्यातक्षम फळांचे उत्पादन हाेऊन ही फळे निर्यात केली जावी, देशाला अमूल्य परकीय चलन आणि संत्रा-माेसंबी उत्पादकांना चार पैसे अधिक मिळावे, असे या मंत्री, आमदारांना कधीच वाटले नाही आणि आजही वाटत नाही. आज याच बागा संकटात सापडल्या असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विराेधकांना स्वत:चा आर्थिक व राजकीय स्वार्थ बघणे आणि त्यासाठी एकमेकांना फटाके बांधून आराेप-प्रत्यारोप करण्याशिवाय दुसरे काम उरले नाही.