krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Black Fly : शेतकऱ्यांनाे काळजी घ्या! संत्रा-माेसंबी बागांवर वाढतोय काळ्या माशीचा प्रादुर्भाव!!

1 min read
Black Fly : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा (Orange) व मोसंबी (Mosambi) बागेची पाहणी केली असता, सध्यस्थितीत त्या बागांवर काळ्या माशीचा (Black Fly) प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहे. विदर्भातील हवामान (Weather) या किडीच्या वाढीसाठी अनुकूल असून, मुख्यत्वे तीन पिढ्या पूर्ण होतात. त्यामुळे संत्रा व माेसंबी बागांचा ऱ्हास होतो. शिवाय, फळांच्या (Fruit) गुणवत्तेवर (Quality) व उत्पादनावर (Production) विपरीत परिणाम होतो.

🟢 विदर्भातील बागांवर प्रादुर्भाव
मागील आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मोसंबी पिकावर काटोल तालुक्यातील पारडसिंगा, सोनोली, मेंडकी, खुटांबा, गोंडीदिग्रस, भरतवाडा, झिलपा, कोलुभोरगड, मासोद, धुरखेडा, खैरी, शिरमी, नरखेड तालुक्यातील सावरगाव, नरखेड, जलालखेडा, भिष्णूर, मोवाड, मेंढला, कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव, सुसूंद्री, मांडवी, खुमारी, पारडी, कळमेश्वर, पिलकापार, सावली (बुद्रुक), गुमथळा तसेच सावनेर तालुक्यातील काही गावात मोसंबी व संत्रावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. काही शेतात पेरूच्या झाडांवर काळ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या माशीच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडून ते पानावर व फळांवर स्त्राव सोडल्यात असल्याने तसेच आर्द्रतेमुळे त्या स्त्रावावर बुरशी (Fungal) वाढते. त्यामुळे झाडांच्या पानातील व फळातील अन्नद्रव्य (Photosynthesis) तयार करण्याची प्रक्रिया बाधित होऊन फळातील रस (Juice) बेचव (Testless) हाेताे. शिवाय, त्या फळांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्या कारणाने शेतकरी (Farmer) चिंतित आहेत. त्यावर उपाययोजना कशी करावी, या किडीचे व्यवस्थापन कसे करावे, शेतकरी बांधवांनी त्यांच्या फळबागांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. संत्रा पिकावरील काळी माशी ही महत्त्वाची कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव संत्रा/मोसंबी पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्वर तालुक्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), आर्वी व अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी या भागामध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी या किडीची ओळख करून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.

🟢 संत्रा/मोसंबीवरील काळया माशीची ओळख
संत्रा/मोसंबी पिकावरील काळी माशी आकाराने लहान साधारणत: एक ते दीड मिलिमीटर लांब असून, पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातल्या हवामानात या किडीच्या तीन पिढ्या (4-8-12 म्हणजेच एप्रिल-ऑगस्ट-डिसेंबर) पूर्ण होतात. या कीडीच्या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. कोवळ्या पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून, सुरुवातीला पिवळसर रंगाची असतात. चार ते पाच दिवसानंतर या अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात 15 ते 20 दिवसात तर हिवाळ्यात 25 ते 30 दिवसात अंड्यातून माशीची पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले सूक्ष्म आकाराची चापट व फिक्कट पिवळसर रंगाची असतात. त्यामुळे ती लक्षात येत नाहीत. ही पिल्ले पानावर फिरून फिरून योग्य जागेचा शोध घेतात. नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील रस, अन्न शोषण करतात. काही दिवसानंतर ही पिल्ले काळी पडतात, तेव्हा प्रादुर्भाव लक्षात येतो. पिल्लाच्या 3 अवस्था पूर्ण होण्यास किमान 4 ते 6 आठवडे लागतात. पिल्ले नंतर कोषावस्थेत जातात. कोश पूर्ण काळे व टणक असतात. कोषावस्था 6 ते 10 आठवड्याची असते. किडीच्या अंगातून साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव बाहेर पडतो. या चिकट स्त्रावावर उष्ण व दमट हवामानात काळी बुरशी वाढू लागते. या काळसर बुरशीला ‘कोळशी’ (Kolshi) म्हणून संबोधण्यात येते. संत्र्याच्या झाडाला वर्षातून तीन वेळा नवती येते. मृग बहाराकरिता जून-जुलै या महिन्यात तर हस्त बहाराकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि आंबिया बहाराकरिता जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात संत्र्याला नवती येते. याच दरम्यान प्रौढ माशा कोषातून बाहेर पडतात व नवतीच्या कोवळ्या पानाच्या मागील बाजूवर अंडी घालतात. प्रौढ माशा 2 ते 10 दिवस जगतात. अंड्यातून निघालेली पिल्ले अत्यंत नाजूक असल्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी हीच प्रथम पिल्ल अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी खालील निर्देशित वेळी करणे गरजेचे आहे.

🟢 संत्रा/मोसंबीवरील काळया माशीचे व्यवस्थापन
✳️ काळया माशीचे पिल्लाचे व्यवस्थापनासाठी मॅलाडा बोनिनेन्सीस या परभक्षक मित्र किडीचे 4-6 अंडी/फांदी हस्त बहाराचे वेळी दोन वेळा सोडावेत.
✳️ मृग बहरासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तर हस्त बहारासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व पुन्हा 15 दिवसानंतर व आंबिया बहारासाठी मार्चच्या शेवटचा आठवडा व पुन्हा 15 दिवसानंतर निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. निंबोळी तेल पाण्यात मिश्रण करण्यासाठी 100 मिली निंबोळी तेलात 10 ग्राम डिटर्जंट पावडर किंवा दहा मिली टिपॉल या प्रमाणात मिसळावे. मृग बहारावरील फवारणीत कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्राम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✳️ संत्रा पिकावर वेळोवेळी विशेषत: नवतीच्या कालावधीत 5 टक्के निंबोळी अर्काच्या 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
✳️ वर निर्देशित काळ्या माशीचे जीवनचक्र लक्षात घेऊन प्रौढ काळी माशीच्या कोषातून बाहेर निघण्याच्या अवस्थेत संत्रा बगीच्यात अधून-मधून पिवळ्या रंगाचे पत्र्याचे पृष्ठभागावर एरंडीचे तेल अथवा ग्रीस लावलेले पिवळे चिकट सापळे बगीच्यात उभारावे.
✳️ किडीच्या व्यवस्थापनाकरता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी केलेल्या शिफारशीनुसार मोनोक्रोटोफॉस 11 मिली किंवा डायमेथोयेट 10.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 मिली यापैकी एका कीटकनाशकाची सोबत 10 ग्रॅम कार्बेंडेझिम किंवा 30 ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराईड बुरशीनाशकासोबत प्रति 10 लिटर द्रावणात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार करावी.
✳️ अंडी उबवण्याच्या कालावधीत काही परभक्षी किडी आढळून आल्यास उदा. क्रायसोपा, लेडीबर्डबिटल इत्यादी मित्र किडी आढळून आल्यास फवारणीमध्ये फेरबदल करावा. अशावेळी कीटकनाशकाची मात्रा अर्धी करून निंबोळी तेल 100 मिली किंवा 5 टक्के निंबोळी द्रावणात फवारणी करून किडींमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!