krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Otur Dam : मी ओतूर धरण बोलतोय….

1 min read
Otur Dam : घ्या हसुन.. एकदाचं मनमोकळं हसून घ्या तुम्ही. ओतूर नाव ऐकलं तरी तुम्हाला हसू येणं साहजिकच आहे. कारण मी म्हणजे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) विरोधकांनी ढोल वाजवावा तसा वाजवण्याचा आणि सत्ता काबीज करण्याचा विषयच बनलोय. खरं सांगायचं तर मला पण माझ्या स्वतःवर हसू येतंय. कुणी नाव दिलं असेल मला ओतूर धरण काय माहित? आता इथुन पुढे माझं नाव ओतूर ऐवजी पुरेपुर धरण देता आलं तर द्या. कारण सगळ्याच राजकारण्यांनी (Politicians) सगळ्याच बाबतीत माझा पुरेपुर वापर करून घेतलाय आणि वापर झाल्यावर टिश्यू पेपर फेकावा तसं मला बाजूला फेकलंय. त्यामुळे मला आता सहन होतं नाही. म्हणून आज मला वाटलं, तुमच्याशी बोलावं, म्हणून बोलतोय. तसा यामुळे तुम्हाला आणि राजकारण्यांना किती फरक पडेल ते तुम्हाला आणि त्यांनाच ठाऊक..

आज बरोब्बर 45 वर्षांपूर्वी 1977 साली ओतूर धरण म्हणून माझी निर्मिती झाली. चनकापूर धरणानंतर (Chankapur Dam) या तालुक्यात माझाच नंबर. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा जल्लोष केला. तसं त्याकाळी पाणीपाऊस (Rain) चांगला असल्यामुळे दोन चार वर्षे माझ्या पाणीगळतीचं (water Leakage) मलाही काही वाटलं नाही. लोकं तर अगदी थाटात म्हणायचे, नवीन नवीन धरण बांधल की, पाणीगळती ठेवावी लागते, तरच त्या धरणातलं पाणी शुद्ध होतं. असो…

माझ्या जन्मामुळे माझ्या ओतूर गावासह नरूळ, कुंडाणे, शिरसमनी, भुसणी, दह्याने, कळवण खुर्द, मानूर, जीरवाडे आदी गावांना फायदा होणार आणि या परिसरातील 1,500 हेक्टर शेती ओलिताखाली (Irrigation) येणार म्हणून मी खूप आनंदी होतो. माझ्या आनंदात केव्हा तीन चार वर्षे गेली समजले पण नाही. यादरम्यान शेतकऱ्यांनी (Farmer) माझ्यावर विश्वास ठेवून आपापल्या शेतांमध्ये पाटासाठी जागा दिली. आवश्यक तेथे पोटचारी ठेवल्या. यामुळे मी मनस्वी आनंदी होतो. मात्र आनंदाला नजर लागावी, ना तशी माझ्या अस्तित्वालाच नजर लागली. परिसरात पाऊस पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि मलाही मोठ्या प्रमाणात गळती लागली. गळती अशी लागली की, दिवाळी संपली की माझ्यावर स्वतःची तहान भागवायची पण संक्रांत येते. त्यातच 1985 च्या काळात सत्तांतर झाले. नवख्या वकील आमदाराने पाणीपूजन केलं आणि पाच वर्षे फिरूनही पाहीलं नाही. तेव्हा 1990 च्या दशकात ओतूर धरणाची कायमची गळती थांबविण्यासाठी पुन्हा सत्तांतर झाले आणि पुन्हा एकदा ए. टी. पवार साहेबांच्या हातात माझे सूत्र गेले. मात्र आत्ताचे सरकार नवीन धरण बांधायला निधी देतं व जुन्या धरणांना दुरुस्तीसाठी निधी देत नाही, अशा शब्दांत तत्कालीन अधिकारी वर्गाने पाच वर्षे काढली. पुन्हा निवडणूक. आता यावेळी कृती समितीचा जन्म झाला आणि जणू कृती समिती स्वतःच्या खिशातून माझी गळती थांबवेल की काय इतकं महत्त्व कृती समितीला आले. यानंतर समितीसोबत अधिकाऱ्यांची चर्चा लवकरच धरणाची गळती थांबणार, आमदारांची अधिकाऱ्यांसोबत धरणाची पाहणी, धरणाला भेट या बातम्यांनी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना अक्षरशः वेड्यात काढलं.

या बातम्या आणि या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात करत करत नेत्यांची कमीजास्त दोन दशके गेली. मग हळूच सोशल मीडिया आणि सुशिक्षितांची संख्या वाढली. लोक आपापसात कुजबुजण्यापेक्षा मोकळं बोलायला लागली. तिकडे पश्चिम पट्ट्यात कानामागुन आलेलं पुनद धरण तिखट झालं. त्यामुळे इकडे विरोध जास्त वाढला. हा विरोध शासनदरबारी पोहचला म्हणून 2013 साली मार्च अखेरीस ओतूर धरण दुरुस्ती बांधकामासाठी 7 कोटी 12 लाख रुपयांची मान्यता मिळाली. माझा जीव भांड्यात पडला. मला वाटले एकदाची गळती थांबणार आणि माझा पुनर्जन्म होणार. तेव्हा तर मला असं वाटतं होतं ना की माझं पण नाव अर्जुनसागर टू ठेवा. पण एकदाच मला दुरुस्त करा. तेव्हा 3 सप्टेंबर 2013 रोजी मालेगाव पाटबंधारे कार्यालयाने 4 कोटी 82 लाख रुपयांची ऑनलाईन निविदा प्रक्रिया काढली. तत्कालीन नामदार ए. टी. पवारांनी 1 डिसेंबर 2013 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून या कामाचे भूमिपूजन केले. मात्र 4 महिने उलटूनही दुरस्तीचे काम काही सुरू होईना. परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आणि काम लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. तेव्हा वाटले माझ्या भागातील नागरिक माझ्यासाठी एकवटले. काम तेवढ्यापुरता दिखावा म्हणून सुरू झाले आणि महिनाभरात थांबले सुद्धा. यानंतर सहा महिने गेले. मात्र तेवढ्यात पुन्हा 2014 ची विधानसभा निवडणूक आली. माझ्या खोऱ्यातल्या माणसांनी पुन्हा एकदा राग व्यक्त करत सत्तापरिवर्तन केले. बाहेरच्या तालुक्यातील माणसाला सत्ता दिली. ज्या माणसाला विकासाची माहितीच नव्हती त्या माणसाने शक्कल लढवली आणि तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडून काहीतरी मंजुरी मिळवली. संबंधित ठेकेदाराने लागलीच मशनरी आणली. धरणाच्या समोर 40 फुट खोल सीसीटी मातीकाम केले. तेव्हा मला वाटलं आता माझं नशीब उजळलं. पण कोण जाणे आमच्या नशीबातली कर्मदरिद्री स्वप्न रंगवता रंगवता आणि नेते आणि ठेकेदारांच्या कमीशनचा हिशोब लावता लावता, कृती समितीचे कार्यक्रम बघता बघता पाच वर्षे संपली.

2017 च्या लोकसभा निवडणुकीत माझा मुद्दा गाजला. येथेही तालुक्यातील व्यक्ती खासदार झाल्या. पण याअगोदर जसा परक्या खासदारांचा उपयोग नव्हता तसाच मला घरच्या खासदारांचाही फायदा झाला नाही. (निदान केंद्रीय मंत्री म्हणून तरी काही विशेष फायदा माझ्या रुपात व्हावा अशी अपेक्षा). पुन्हा एकदा 2019 ची निवडणूक आली. कधी नव्हे माझ्या भागातल्या माणसाने ठरवलं की, आता आपल्या तालुक्याचा हक्काचा आणि आपला माणूस निवडायचा. पुन्हा एकदा जोशात सत्तापरिवर्तन झाले आणि जिल्हा परिषदेचे अनुभवी सदस्य नितीन पवार आमदार झाले. त्यात सत्ता आणि जलसंपदा खाते पण त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणून माझा आनंद गगनात मावेना. म्हटलं आता 42 वर्षाची तपश्चर्या फळाला येणार आणि माझी क्षमता शंभर टक्के होणार. मात्र कोविडने दोन वर्षे मला त्रास दिला. त्यानंतर आमदार पवारांच्या कृपेने तत्कालीन मंत्री महोदय जयंत पाटील यांचा नोव्हेंबर 2020 रोजी कळवण दौरा झाला आणि मार्च 2021 मध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने ओतूर धरण दुरुस्तीच्या कामासाठी 39 कोटी 28 लाख रूपयांची प्रशासकीय मंजुरी दिली. यात माझा जुना दगडी सांडवा तोडून नव्याने काँक्रिट सांडवा बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या भूगर्भशास्त्रीय अभ्यासासाठी धरणस्थळी विंधनविवरे घेण्यासाठी 11 एप्रिल 2021 रोजी काम सुरू झाले. सदरच्या अभ्यासाअंती सांडव्याचे व ओतूर धरणाचे नव्याने संकल्पन होईल. यासाठी जलसंपदा विभागाने पाटबंधारे विभागाला सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुधारित प्रस्तावास मान्यता पण मिळाली असल्याचे समजले. मात्र नंतर घोडं अडलं कुठे हेच समजत नाही. त्यातच राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे पुढील अडीच वर्षे निधीची वाणवा होईल अशी शंका आहे. त्यामुळे चाळीस कोटींचा आकडा वाढवण्यासाठी आणि माझे काम होण्यासाठी मला पुन्हा एकदा 2024 च्या विधानसभा निवडणूकीची वाट पहावी लागेल आणि पुन्हा एकदा नागरिकांना परिवर्तन करावे लागेल की काय? याचाच विचार करतोय.

हल्ली तर मला असं वाटायला लागलंय ना की मी धरणापेक्षा एखादा नेता पाहिजे होतो. 50५ खोके गळती ओके.. करून घेतलं असतं आणि वेळ आलीच तर नेता म्हणून धरणाचं ओतूर नाव बदलून स्वत:चं पुरेपूर धरण नाव तरी दिलं असतं. पण मला जागेवरून हलता येतं नाही. म्हणून वेळीच राजकीय नेत्यांनी पक्ष आणि सत्तेचा विचार न करता सामंजस्याने माझ्या कामाची फाईल हलवा नाहीतर मी आगामी प्रत्येक निवडणुकीत सत्ता हलवल्याशिवाय राहणारं नाही. एवढं मात्र नक्की..

(ओतूर परिसराशी लेखकाचा संबंध नसला तरी हा प्रश्न तालुक्याचा आहे. उगीच लेखकाबद्दल गैरसमज करण्यापेक्षा धरणाची गळती थांबविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश यावे एवढी ईच्छा. कारण ओतूर धरणानंतर लेखकाला इतरही प्रश्न भेटायला येतील. ते प्रश्न लेखकाच्या भाषेत नागरिकांशी संवाद साधतील.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!