Lumpy skin disease : लम्पी त्वचा रोगाचे नियंत्रण कसे कराल?
1 min read🔴 रोगाची कारणे
लम्पी त्वचा रोग हा विषाणूजन्य चर्मरोग असून, या रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स (Capripox) प्रवर्गात मोडतात. या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येते. मात्र, हा रोग शेळ्या-मेढ्यांना अजिबात होत नाही.
🔴 रोग प्रादुर्भाव
हा साथीचा आजार प्रामुख्याने गोवर्गीय प्राण्यात होता. क्वचित म्हैसवर्गीय प्राण्यात आढळून येतो. रोग प्रादुर्भाव प्रमाण गोवर्गात सर्वसाधारणतः 30 टक्के तर म्हशीत 1.6 टक्के दिसून आले आहे. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात तीव्रता अधिक असते. मात्र, सध्याच्या साथीत देशी गोवंशात रोगबाधेचे प्रमाण व तीव्रता अधिक आढळून येत आहे. हा रोग सर्व वयोगटात होत असला तरी लहान वासरे, प्रौढ जनावरांच्या तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडतात. हा रोग प्रामुख्याने उष्ण दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ जास्त प्रमाणत होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सध्याच्या पावसाळी वातावरणात म्हणून रोग फैलाव वेगाने होत आहे.
या आजाराचा रोग दर 2.45 टक्के (सर्वसामान्यपणे 10-20 टक्के) तर मृत्युदर 1-5 टक्क्यांपर्यंत आढळून येतो. आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण (Mortality rate) कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त (weak) होत जातात. त्यांचे दुग्धउत्पादन (Dairy production) मोठ्या प्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गर्भपात (Abortion) होतो व प्रजनन क्षमता (Fertility) घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खुप विकृत दिसते. त्यामुळे हा रोग मनुष्यास होईल याची भीती अनेक पशुपालकात निर्माण झाली आहे .परतू 100 वर्षाच्या इतिहासात हा रोग मनुष्यात झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे पशुपालकाने आपणास हा रोग होईल म्हणून घाबरण्याचे कारण नाही.
🔴 रोगप्रसार
✳️ या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (एडीस), क्युलीकॉईडीस यांच्या मार्फत होतो.
✳️ या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
✳️ विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते 1-2 आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात व तदनंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
✳️ त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (35 दिवस) जिवंत राहू शकतात.
विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.
✳️ गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
✳️ दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व स्तनावरील व्रणातून रोग प्रसार होतो.
🔴 लक्षणे
✳️ बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्त काळ साधारणपणे 2-4 आठवडे एवढा असतो.
✳️ या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते.
✳️ लसिका ग्रंथीना सूज येते.
✳️ साधारणपणे एक आठवडाभर भरपूर ताप येतो.
दुग्धउत्पादन कमी होते.
✳️ त्वचेवर हळूहळू 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात .काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात.
✳️ तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.
✳️ डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते.
✳️ काही जनावरात पायावर सूज येवून जनावरे लंगडतात.
✳️ या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जनावरांत फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते.
✳️ रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.
🔴 रोगनिदान
या आजाराच्या रोगनिदानासाठी त्वचेच्या व्रणाच्या खपल्या, नाकातील स्त्राव, रक्त व रक्तजल नमुने यांचा वापर करून विषाणूचे निदान केले जाते.
🔴 उपचार
✳️ हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. तरीही इतर गुंतागुंती होऊ नयेत म्हणून आवश्यक तो उपचार सुरुवातीपासून नियमीतपणे 5-7 दिवस केल्यास बहुतांशी जनावरे पूर्णपणे बरी होतात.
✳️ यामध्ये प्रतिजैविके (Antibiotics), ज्वरनाशक (Antipyretic), अँटीहिस्टेमिनिक (Antihistaminic) औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक (Immunity booster) जीवनसत्व अ व ई, शक्तीवर्धक ब जीवनसत्व (vitamin) तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक (Antiseptic)/फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करण्यात यावा.
✳️ तोडांत व्रण झाल्यास तोंड पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानी धुवून बोरोग्लीसरीन लावावे.
🔴 रोगनियंत्रण
✳️ बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून तात्काळ वेगळे करावे.
✳️ बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत.
✳️ जनावरांची रोग बाधित भागातून ने-आण बंद करावी.
✳️ साथीच्या काळात गावातून/परिसरातून कोणत्याही व्यक्तीची गोठ्यास भेट देण्यावर बंदी आणावी.
✳️ रोग बाधीत क्षेत्रात गाई म्हशींच्या बाजारावर बंदी आणावी.
✳️ बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकानी योग्य पोशाख परिधान करावा तसेच हात डेटाॅल किंवा अल्कोहोलमिश्रित सॅनीटायझरने धुवून घ्यावेत व तपासणी झाल्यानंतर कपडे व फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत.
✳️ रोगी जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे की वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करून घेण्यात यावे.
✳️ रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे.
✳️ यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी.
✳️ रासायनिक अथवा वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठ्यात फवारा मारावा.
✳️ नुकतेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत इज्जतनगर येथील भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था व हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र यानी लम्पी रोगावर तयार केलेली लम्पी प्रोव्हेक इंड ही लस प्रायाेगिक तत्वावर वापरात आणली आहे. परंतू, सध्या सार्वतिरीक स्वरुपात उपलब्ध नाही. नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्याय म्हणून शेळ्यातील देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो.
✳️ सदरिल लस चार महिन्यापेक्षा मोठ्या जनावरांना द्यावी.
✳️ लस थंड वातावरणात (2-4 डिग्री सेंटीग्रेट) साठवावी व बर्फावर वाहतूक करावी.
✳️ लस फक्त निरोगी जनावरांना द्यावी.
✳️ लसीची मात्रा सर्व वयोगटासाठी व वजनासाठी एकच असते.