Lumpy skin disease : भीती बाळगू नका, गोवंशातील लम्पी त्वचारोग माणसांना होत नाही!
1 min readदेशातील जनावरांना या राेगाची लागण झाल्याने राजस्थान, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये जनावरात मोठ्या प्रमाणावर मरतूक होत आहे. महाराष्ट्रातही या रोगाची साथ असल्याने आतापावेतो राज्यातील 24 जिल्ह्यात ही साथ पसरली आहे. त्यातच काहींनी लम्पी आजारग्रस्त गाईचे दूध प्यायल्याने तसेच शेळी (Goat), मेंढी (Sheep) आणि कोंबड्यांचे (Chicken) मांस (Meat) खाल्ल्याने मनुष्यात लम्पी त्वचारोग होतो, अशा बातम्या व माहिती साेशल मीडियातून प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातम्या व माहितीत कुठलेही तथ्य नाही. त्यांना शास्त्रीय व वैद्यकीय आधार नाही, असेही डाॅ. अनिल भिकाने यांनी सांगितले.
लम्पी त्वचारोग हा गोवंशातील विषाणूजन्य रोग आहे. हा रोग शेळ्या-मेंढ्यात व कोंबड्यांना अजिबात होत नाही. त्यामुळे शेळ्या मेंढ्यांचे मटन अथवा चिकन खाल्ल्याने माणसांना हा रोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेष म्हणजे, लम्पी हा प्राणीजन्य रोग नसल्याने रा रोगाची लागण माणसांना अजिबात होत नाही. लम्पी रोगाला 93 वर्षांचा इतिहास असून, या इतिहासात लम्पी रोगाची लागण कधीतरी माणसांना झाली, अशी कुठेही नोंद नाही. माणसं लम्पी रोगग्रस्त जनावरांच्या सानिध्यात आल्याने किंवा लम्पी रोगग्रस्त गाई, म्हशीचे दूध प्यायल्याने हा आजार होत नाही, असेही डाॅ. अनिल भिकाने यांनी स्पष्ट केले.
लम्पीचे विषाणू हे 70 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला 1 ते 3 मिनिटात असक्रिय (Inactive) होतात. त्यामुळे उकळलेल्या दुधात व पाकिटातील पाश्चुराईज्ड दुधात (Pasteurized milk) या रोगाचे विषाणू (Virus) जिवंत राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बागळता दूध बिनधास्त प्यावे. शास्त्रीयदृष्ट्या कधीही दूध हे उकळूनच (Boil) प्यावे आणि मांस हे शिजवूनच (by cooking) खावे, असे आवाहन राज्य लंपी चर्मरोग टास्क फोर्सचे सदस्य तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे विस्तार शिक्षण संचालक प्रा.डॉ अनिल भिकाने यानी केले आहे.