krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

सोयाबीनवरील खोडमाशी व व्यवस्थापन

1 min read
महाराष्ट्रात सोयाबीन पिकाखालील वाढते क्षेत्र पाहता या पिकाचे उत्पादन त्यामानाने कमी असल्याचे आढळून येत आहे. या पिकाचे उत्पादन किंवा उत्पादकता कमी असण्यास कारणीभुत असणाऱ्या घटकांचा अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते की, या पिकावर येणाऱ्या किडी व त्यांचे नुकसान उत्पादनात घट येण्याचे प्रमुख कारण आहे. नुकसानकारक किडीमध्ये एक महत्त्वाची कीड म्हणजे 'खोड माशी' ज्यामुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट येते. या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची पुनः पेरणी किंवा उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता असते.

ओळख
प्रौढ माशी ही लहान आणि चमकदार काळ्या रंगाची असून, लांबी 2 मि. मि. असते. अंड्यातून निघालेली पांढऱ्या रंगाची व पाय नसलेली 2-4 मि.मि. लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरते. अळी पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरुन खाते. त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत. अशा झाडांची वाढ खुंटते च झाड वाळू लागते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही. परंतु अशा झाडावर खोडमाशीचे अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असते. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पदनात 16 ते 30 टक्के घट होते.

जीवनक्रम
मादी माशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते. अंडी अवस्था 2 ते 7 दिवसाची असते. अळी अवस्था 10 ते 15 दिवसाची असून, अळ्या लहान झाडाच्या जमिनीजवळील भागात तर मोठ्या झाडाचा फांद्यात आणि देठात कोषावस्थेत जातात. कोषावस्था 7 ते 10 दिवसाची असते.

खोडमाशीचा कोष
पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे.
नत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा.
पीक सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
आंतरमशागत, निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
प्रौढ खोडमाशीने पिकावर अंडी घालु नये, याकरीता सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
खोडमाशीने आर्थिक नुकसानीची पातळी, सरासरी 2-3 किडग्रस्त झाडे प्रती मिटर ओळीत ओलंडल्या नंतर खालील प्रमाणे रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी.
सोयाबीन पीक काढल्यानंतर उन्हाळी नांगरट करावी.
मित्र किडींचे रक्षण करणे जसे कातरणी, ढालकिडा, प्रार्थनाकिटक, ड्रैगनफ्लाई, क्राइसोपरला इत्यादी.
एच.एन.पी.व्ही @ 250 एल.ई. प्रति हेक्टर फवारणी करावी किंवा एन.एस.के. ई. @ 5 टक्के येणाऱ्या अळी व रसशोषण करणाऱ्या किडींकरिता फवारावे.
आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, त्यामध्ये तुर, ज्वारी, मक्का 4 : 2 या प्रमाणात लावावी.
प्रादुर्भाव झालेली झाडे/रोपे हाताने उखडुन नष्ट करावीत.
अंडी व अळी ला गोळा करून रॉकेलयुक्त मिश्रणामध्ये नष्ट करावे.
प्रकाश सापळे आणि कामगंध सापळयांचा वापर करावा.
स्पोडोप्टेरा व इतर पतंगांची निगरानी करण्यासाठी
फेरोमोन ट्रैप (कामगंध सापळा ) 5 ते 6 प्रति हेक्टरी लावावे.
सुरुवतीच्या अवस्थेत अळी आणि रसशोषक कीड नियंत्रणकरिता एन.एस.के. ई. 5 टक्के हे फवारणी करावी.
स्पोडोप्टेरा अळीकरिता सापळा पीक म्हणुन एरंडी व गर्डल बीटल करिता ढैचाची लागवड करावी.
पक्षी थांबे 10 ते 12 प्रति हेक्टरी लावावे.

रासायनिक व्यवस्थापन
ट्रायझोफॉस 40 टक्के 25 मिली किंवा ऍसिफेट 75 टक्के 15 ग्रॅम किंवा इथोफेनप्रॉक्स 10 टक्के 20 मिली किंवा फेनवलरेट 20 ई. सी. 10 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ई.सी. 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
क्लोरॅनट्रानिलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. @ 150 मि. ली. प्रति हेक्टर किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के ई.सी. @ 350 मि.ली. प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी. @ 1,000 मि.ली. प्रति हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!