बकरी आजारी आहे; ही काळजी घ्या!
1 min read
मित्रांनो! मी बरेच ग्रुप बघतो, वाचतो, बकरी पालक बोलतात…
🟢 माझी बकरी चारा खात नही.
🟢 बकरीच्या डोळ्यातून पाणी येते.
🟢 बकरीला ताप आला,
🟢 बकरी लंगडत आहे. यावर उपाय सांगा.
असेच अनेक प्रकारचे मॅसेज आपल्या फेसबुक, व्हाट्सअप ग्रुपवर, पर्सनल फोन करून किंवा मॅसेंजरवर मॅसेज करून विचारतात. मित्रांनो, आपण कुठेतरी चुकत आहोत, असं नाही का वाटत?
🐏 बकरी/बोकड चारा खात नाही!
बकरी चारा खात नाही म्हणजे नेमके काय झालं असेल तिला?
🟢 ती चारा का खात नाही?
🟢 किती दिवस झाले ती चारा खात नाही?
याची पूर्ण हिस्ट्री (History) आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपण ज्याही कुणाला फोन करू किंवा मॅसेज पाठवू, ती व्यक्ती आपल्याला योग्य औषधोपचार सांगेल.
🟢 बकरी फुगलेली आहे का?
🟢 बकरीला ताप आहे का?
तिला कुठे काही जखम झाली का? हे बघावे लागेल, म्हंणजे समोरील व्यक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल.
🐏 बकरी/बोकडाला ताप आला!
आपली बकरी चारा खात नसेल एकटी एकटी राहत असेल तर आपण काय करतो? सर्वात आधी तिचे कान तपासतो. (माझ्या गावाकडे कान तपासतात. गरम असेल तर ताप नाही. थंड असेल तर ताप आहे.) मग आपण काय करतो मेसेज पाठवतो की माझ्या बकरीला ताप आला मी काय उपचार करू? पण त्या बकरीचा आपण आधी थर्मामीटरने (Thermometer) ताप मोजून बघतो का? तर अजिबात नाही. टेम्प्रेचर चेक केले का? किंवा तिला तापामध्ये आणखी काय काय होते? हे समजून घेतले का? तर नाही अजिबातच नाही. कुणाला मॅसेज किंवा फोन करण्यापूर्वी तुमच्या शेडवर तापमापी असणे गरजेचे आहे. आपण काय करायला पाहिजे की, दोन ते तीन दिवसाची हिस्ट्री ज्याला कुणाला फोन किंवा मॅसेज करून त्याला सांगायला पाहिजे. माझ्या बकरीसोबत दोन दिवसापासून असेअसे घडत आहे. आज मी तिला पूर्ण चेक केले. तिचा ताप मोजला एवढा एवढा ताप आहे. काही खात नाही, तर मी काय करू. आपण असल्या गोष्टी सांगत नाही, सांगतो काय तर माझ्या बकरीला ताप आलाय मी काय उपचार करू. उपचार सांगणाऱ्याला कसं कळेल की, तुमच्या बकरीची अवस्था कशी आहे ती! ती व्यक्ती काय ट्रीटमेंट (Treatment) सांगेल? बकरीला आराम पडला नाही की उपचार करणाऱ्या व्यक्तीला प्रसंगी बदनामीला सामोरे जावे लागते.
🐏 ताप एक प्रकारचा नसतो!
🟢 बकरीचा पाय जर मोडला व त्यामध्ये तिला ताप आला तर वेगळी ट्रीटमेंट करावी लागते.
🟢 सर्दी, पडसे होऊन आलेल्या तापावर वेगळी ट्रीटमेंट करावी लागते.
🟢 पायखुरी, गोट पॉक्स, निमोनिया या सर्वांमध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट केली जाते.
त्यामुळे आपण लक्षणे मुद्देसूद सांगितले तर अचूक निदान त्या व्यक्तीला सोपे जाते. म्हणजे अनुभवी बकरी पालक व्यवस्थित ट्रीटमेंट सांगेल.
🐏 बकरी/बोकड/पिल्लाच्या डोळ्यातून पाणी येते!
भावांनो, बकरी/बोकड/पिल्लाच्या डोळ्यातून पाणी का येते, हे आधी माहिती करून घ्या. मगच समोरच्याला सांगा म्हणजे तो तुम्हाला अचूक उपचार सांगेल.
🟢 बकरीच्या डोळ्याला कशाचाही फटका लागला म्हणजे डोळ्यात पाणी येते.
🟢 बकरी आजारी असली म्हणजे डोळ्यात पाणी येते.
🟢 बकरीला ज्यास्त प्रमाणात जंत झाले म्हणजे डोळ्यात पाणी येते.
बकरीच्या डोळ्यात पाणी का येते हे तुम्हीच अचूक सांगायला पाहिजे. जसे की,
🟢 मी एवढे महिने झाले बकरीचे जंतनाशक (Deworming) केले नाही.
🟢 आज मी खूप झाडाझुडुपात बकरी चारायला घेऊन गेलो होतो. त्यामुळे बकरीला फटका बसला म्हणून डोळ्यात पाणी येत आहे.
हे असे आपणच सांगायला पाहिजे, म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला अचुक ट्रीटमेंट सांगेल.
🐏 बकरीचे पोट फुगले!
ही समस्या सांगणारी मंडळी सुद्धा मोठी आहे. त्यांना जेव्हा आपण बोलते करतो, तेव्हा ते सांगतात की बकरीने तांदूळ खाल्ले गहू खाल्ले. पण त्यांना एक सांगायचे आहे बकरीचे पोट जेव्हा फुगते, तेव्हा माझ्या मते पोटाचा दोन प्रकारे आवाज येतो.
🟢 पोट वाजवल्यावर ढब ढब आवाज येतो.
🟢 पोटातील पाण्याचा आवाज येतो.
या प्रकारे जर तुम्ही तपासून समजून सवरून पोस्ट केली किंवा कुणाला मॅसेज अथवा फोन करून माहिती सांगितली, तर तुम्हाला अचुक ट्रीटमेंट सांगितल्या जाईल. या पोटफुगीवर वेगवेगळे उपचार केले जातात. दोन्ही प्रकारच्या पोटफुगीवरील उपचार वेगवेगळे आहेत.
बकरी जर आपल्याला पूर्ण आजारातून बाहेर काढायची असेल तर आधी बकरी समजून घ्यावी लागेल. तिचे लक्षणे (Symptoms) समजून घ्यावे लागतील. ती आपल्याला उपाशी ठेवणार नाही. कुणाला फोन, मॅसेज किंवा ग्रुपवर पोस्ट करण्याआधी बकरीला नेमकं काय काय झालं, हे समजून घ्यावे लागेल, म्हणजे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. काही लोकं बोलतील की, आम्ही नवीन शेळीपालक आहेत. या गोष्टी आम्हाला नाही समजत. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, किमान तुम्ही बकरीचा ताप तर मोजू शकता ना. दोन दिवसापासूनची तिची हिस्ट्री तर माहिती असते ना. तीच माहिती व्यवस्थित सांगत चला. पोस्टवर फोन नंबर नमूद करणे सोयीस्कर ठरते. शेडवर औषधांची छोटी किट (Medicine Kit) असणे आवश्यक आहे.