तेलबियांचे घटते उत्पादन अन् खाद्यतेलाचे चढते दर चिंताजनक!
1 min read
चुकीच्या सरकारी उपाययाेजना निष्प्रभ
भारतात 1 नाेव्हेंबर ते 31 ऑक्टाेबर हे खाद्यतेल वर्ष मानले जाते. आधीच्या व चालू खाद्यतेल वर्षात सर्वच खाद्यतेलाचे दर वधारत असल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या काळात खाद्यतेवरील आयात शुल्क (Import Duty) 30.25 ते 41.25 टक्क्यांवरून शून्यावर आणला आहे. तेलबियांवर ऑक्टाेबर 2021 मध्ये स्टाॅक लिमिट लावले. या स्टाॅक लिमिटची मुदत 31 मार्च 2022 ला संपणार असली तरी त्याला 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ (Extension) दिली आहे. ऑक्टाेबर 2021 मध्ये वायदे बाजारातील माेहरीच्या तर डिसेंबर 2021 मध्ये साेयाबीनच्या साैद्यांवर बंदी घातली. साेयाबीनसह इतर तेलबियांचे उत्पादन (Production) घटल्याने तसेच वापर (Use) व मागणी (Demand) वाढल्याने खाद्यतेलाचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारच्या या उपाययाेजना (Measures) निष्प्रभ ठरत आहेत. खरं तर खाद्यतेलाची कमतरता दूर करण्यासाठी दर नियंत्रित (Controlled) करणे ही उपाय नाही. केंद्र सरकारने देशातील खाद्यतेलाचा वाढता वापर व मागणी तसेच प्रत्येक तेलबियांचे घटती प्रति हेक्टरी उत्पादकता (Productivity) व उत्पादन (Production) वाढविण्यासाठीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारने तेलबियांचा उत्पादन खर्च (Cost of Production) कमी करून उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकडे विशेष व काळजीपूर्वक लक्ष दिल्यास खाद्यतेलाचे उत्पादन वाढेल व ग्राहकांना (Customer) रास्त दरात (Reasonable Rates) खाद्यतेल उपलब्ध हाेऊ शकेल. साेबतच तेलबियांना बाजारात उत्पादन खर्च भरून निघेल व उत्पादकांना दाेन पैसे अधिक मिळतील, अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. बाजारात हस्तक्षेप करून विविध उपाययाेजनांद्वारे तेलबियांचे दर पाडण्याचा उपद्व्याप केंद्र सरकारने करायला नको.
साेयाबीन तेलाची आयात
जगात पामतेलाच्या तुलनेत साेयाबीन तेल स्वस्त आहे. भारतातील खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या परवानगीने 1 लाख टन साेयाबीन तेल (Soybean Oil) आयात (Import) करण्याचे अमेरिकन कंपन्यांसाेबत जानेवारी 2022 मध्ये करार (Agreement) केले आहेत. या दाेन्ही खाद्यतेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेल (Sunflower Oil) स्वस्त आहे. युक्रेन हा सूर्यफूल उत्पादनात जगात क्रमांक-1 चा देश आहे. युक्रेन (Ukraine) युराेपीयन राष्ट्रांमध्ये माेठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची निर्यात (Export) करताे. सध्या सुरू असलेल्या रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia and Ukraine War) सूर्यफूल अथवा सूर्यफूल तेल आयात करणे कठीण झाले आहे. ही आयात काळ्या समुद्रातून केली जात असून, युद्धामुळे काळ्या समुद्रात (Black Sea) जहाज टाकण्याचे धाडस सध्यातरी केले जात नाही.
रिफाइंड ऑईलमध्ये 40 टक्के पामतेल
खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2006 मध्ये तेल उद्याेगांना काेणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये (Refined Oil) 10 ते 12 टक्के पामतेल (Palm Oil) मिसळण्याची परवानगी दिली हाेती. सन 2014 मध्ये 32 टक्के तर सन 2019 मध्ये 37 टक्के पामतेल मिसळण्याची परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्येक रिफाइंड ऑईलमध्ये अधिकृतरीत्या 40 टक्के पामतेल मिसळले जाते. तेलबियांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक रिफाइंड खाद्यतेलात माेठ्या प्रमाणात पामतेल मिसळले जात असल्याने या भेसळयुक्त खाद्यतेलाचा मानवी आराेग्यावर (Human Health) हाेणाऱ्या दुष्परिणामांचा (Side Effects) सरकारने विचार करायला हवा. खाद्यतेलात पामतेल मिसळल्याने रिफाइंड तेलाच्या किमती कमी असायला हव्या हाेत्या. मात्र, तसे हाेत नसल्याने तेलबिया उत्पादकांसाेबत खाद्यतेल ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे.
भारतातील साेयाबीनचा पेरा
🌻 सन 2020-21 – 111.91 लाख हेक्टर.
🌻 सन 2021-22 – 121.09 लाख हेक्टर.
🌻 वाढ – 9.18 लाख हेक्टर.
महाराष्ट्रातील साेयाबीनचा पेरा
🌻 सन 2020-21 -43,23,707 हेक्टर.
🌻 सन 2021-22 – 45,87,401 हेक्टर.
🌻 वाढ – 2,63,694 हेक्टर.
अमेरिकेतील साेयाबीनचे दर
🌻 जानेवारी-2022 – 1,440 सेंट प्रति बुशेल (3,961 रुपये प्रति क्विंटल)
🌻 फेब्रुवारी-2022 – 1,540 सेंट प्रति बुशेल (4,236 रुपये प्रति क्विंटल)
🌻 मार्च-2022 – 1,632 सेंट प्रति बुशेल (5,670 रुपये प्रति क्विंटल)
भारतातील साेयाबीनचे दर
🌻 जानेवारी-2022- 5,500 ते 6,300 रुपये प्रति क्विंटल.
🌻 फेब्रुवारी-2022 – 6,400 ते 7,400 रुपये प्रति क्विंटल.
🌻 मार्च-2022 – 6,700 ते 8,200 रुपये प्रति क्विंटल.
(जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात साेयाबीनचे दर सर्वाधिक आहेत.)
मलेशियातील पामतेलाचे दर
🌻 जानेवारी-2022 – 5,444 रिंगीट प्रति टन (97.51 रुपये प्रति टन)
🌻 फेब्रुवारी-2022 – 5,592 रिंगीट प्रति टन (100.16 रुपये प्रति टन)
(दर वाढण्याची शक्यता आहे.)
खाद्यतेलाची आयात
🌻 सन 2019-20 – 131.8 लाख टन.
🌻 सन 2020-21 – 131.3 लाख टन.
🌻 सन 2021 मध्ये 3 लाख 40 हजार टन सोयाबीन तेलाची आयात करण्यात आली. सूर्यफूल, पाम व इतर खाद्यतेलाची आयात वेगळी आहे.
🌻 भारतात दरवर्षी आयात केल्या एकूण खाद्यतेलापैकी 70 टक्के पामतेल आयात केले जाते.
🌻 सन 2020-21 मध्ये 85 टक्के पामतेल आयात केले होते.
🌻 सन 2020-21 मध्ये 45 लाख टन सोयाबीन तेल, 30 लाख टन मोहरी आणि 22 लाख टन सूर्यफूल तेल आयात करण्यात आले होते.
🌻 भारतात या देशातून खाद्यतेल आणलं जातं
भारतात 60 टक्के पामतेल हे इंडोनेशिया तर 40 टक्के मलेशिया आणि इतर देशांतून आयात होते. सोयाबीन तेल अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून, मोहरी तेल कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, बांगलादेश व नेपाळमधून तर सूर्यफूल तेलाची आयात युक्रेन, रशिया आणि अर्जेंटीनातून केली जाते.
मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले दर
🌻 आरबीडी पामाेलीन – 59 टक्के.
🌻 सीआयएफ पामाेलीन – 68 टक्के.
🌻 साेयाबीन तेल – 47 टक्के.
🌻 सूर्यफूल तेल – 30 टक्के.
मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेली मागणी
🌻 पामतेल – 37 टक्के.
🌻 साेयाबीन तेल – 22 टक्के.
🌻 माेहरी तेल – 12 टक्के.
🌻 सूर्यफूल तेल – 12 टक्के
मागील वर्षीच्या तुलनेत घटलेले साेयाबीनचे उत्पादन
🌻 ब्राझील – 35 लाख टन.
🌻 अर्जेंटिना – 18 लाख टन.
🌻 चीन – 29 लाख टन.
🌻 भारत – 10 लाख टन.
खाद्यतेलाची गरज आणि आयात
भारताची खाद्यतेलाची वार्षिक गरज किमान 210 लाख टन एवढी आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी दरवर्षी किमान 151 लाख टन खाद्यतेल आयात करावे लागते. भारतात 72 टक्के नागरिक माेहरी (Musterd) तर 17 टक्के नागरिक साेयाबीन (Soybean) खाद्यतेलाचा वापर करतात.
साेयाबीन, माेहरी उत्पादनाचा अंदाज व वास्तव
भारतात सन 2020-21 या खाद्यतेल वर्षात साेयाबीनचे 120 लाख टन साेयाबीनचे उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. वास्तवात, 95 लाख टन उत्पादन झाले. सन 2021-22 या वर्षात 108 लाख टन साेयाबीनचे उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना 97 लाख टन उत्पादन झाले. यावर्षी माेहरीचे 85 ते 90 लाख टन उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील हंगामात माेहरीचे उत्पादनही घटले आहे. हीच परिस्थिती याही हंगामात आहे.एकंदरीत, देशातील तेलबियांचे घटते उत्पादन आणि खाद्यतेलाच्या वाढत्या वापर व मागणीतून निर्माण झालेले परावलंबित्व ही चिंताजनक बाब आहे.
Km kro tel ke bhao
Comments as above
वरील लेखात खूप चुका आहेत.
१) जगात सर्वात स्वस्त खाद्यतेल सोयाबीन किंवा सूर्यफुलाचे तेल नसून पामतेल आहे.
२) २०२०-२१ मधे आयात केलेल्या तेलांचे आकडे टक्केवारीशी जुळत नाहीत. (आपल्याच आकडेवारीनुसार सोयाबीन, सूर्य फूल व मोहरी तेल यांची आवक ९७ लाख टन होती- एकूण १३१ लाख टनावारी. तर मग पामतेलाचा वाटा लाचा जास्तीत जास्त २५% होईल).
३) तेलबिया व तेल यांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे गेली कित्येक दशके अथक प्रयत्न करत आहेत. दर हेक्टरी पामतेलाचे उत्पादन सर्वात जास्त असल्याने सरकार पामच्या लागवडीवर भर देत आहे. परंतु देशांतर्गत मागणी सतत वाढत असल्याने आयातही वाढतच आहे.
४) जगात खूप देशात पामतेल वापरले जाते. त्यापासून ह्या देशाच्या रहिवाशांच्या स्वास्थ्याला धोका पोचलेला नाही. तरी ह्याबद्दल अपप्रचार करु नये.