krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

1 फेब्रुवारीपासून शेतकरी संघटनेचे महावितरण कंपनी विरोधात राज्यव्यापी आंदोलन

1 min read
Farmers Protest : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडील कृषिपंपाचे थकीत वीज बिल सक्तीने वसूल करण्यासाठी ट्रान्सफार्मर व वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम शेतकऱ्यांना वेठीस धरणारी असून, त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील रबी पिके व फळबागांचे सिंचनाअभावी मोठे नुकसान होत आहे. सध्या पिके व बागांना पाण्याची नितांत आवश्यकता असून, पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने देशाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महावितरण कंपनीने देशाच्या अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने 1 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

वीज कायद्यानुसार योग्य दाबाने वीजपुरवठा न केल्याने व 15 दिवस आगोदर नोटीस न दिल्यामुळे महावितरण कंपनीने वीज कायद्याचा भंग केला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमानही केला आहे. सन 2012 पासून कृषिपंपांना वाढीव वीज बिले देऊन महावितरण कंपनीने शेतकर्‍यांची व सरकारची फसवणूक केली आहे. मात्र, पोलीस वीज कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास तयार नाही. उलट, न्याय्य हक्कासाठी शांततेत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर भादंड वि 353 नुसार खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

सरकारने शेतमालाचे भाव जर पाडले नसते तर शेतकर्‍यांनी वीज बिल वेळीच भरले असते. पण निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदेबाजार बंदी, राज्यबंदी करून सरकारने शेतमालाचे पाडले आहेत. त्यामुळे शेतकरी सरकारचे देणे लागत नाही. उलट,  शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीकडून घेणे आहे. 1 फेब्रुवारीपासून राज्यभरातील तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महावितरण कंपनीने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरीत बंद थांबवावी. शेतकऱ्यांना विजेची बिले दुरुस्त करून द्यावी. इगतपुरी येथील आंदोलनात शेतकर्‍यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची मुक्तता करावी. ही बेकायदेशीर कारवाई करणार्‍या महावितरण कंपनीच्या  अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्याही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी संयुक्तरित्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!