हवामान अंदाजातील ‘डॉप्लर रडार’चे योगदान
1 min read
2022 मध्ये ‘राष्ट्रीय सुपर कंप्यूटर मिशन’ अंतर्गत आता जगातील 10 नंबरचा अद्यावत असलेल्या पुणे येथील सुपर कॉम्प्युटरची क्षमता पाच पटीने वाढवली जाणार आहे. त्यानंतर एक व्यक्ती 2 अब्ज 50 कोटी (2,50,00,00,000) वर्षे जगली तर जेवढे विचार करु शकते, त्यापेक्षा जास्त विचार एका सेकंदात करून परिणाम देणारा संगणक उपलब्ध भारतात उपलब्ध होत आहे,हे विशेष! थोडक्यात भारतातील 139 कोटी लोक दोनवर्ष दिवसरात्र जेवढा विचार करतात, तेवढा विचार एका सेकंदात करत ‘कस्टमाईज वेदर अलर्ट व इन्फॉर्मेशन रिझल्ट’ देणारी सुपर काॅम्पुटरची यंत्रणा देशात शेतकऱ्यांना अहोरात्र मदतीसाठी याचवर्षी कार्यरत होईल, हे निश्चितच. भारतात डॉप्लर रडार यंत्रणांचे जाळे, सॅटेलाईट नेटवर्क व प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी ‘नेशन फर्स्ट’ व ‘ओन्ली सोल्युशन्स’ म्हणत राष्ट्रीय योगदान करणे आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा येथे एक्स बॅंड डॉप्लर रडार बसवावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.
हे रडार औरंगाबादपासून 100 किमीपर्यंत व्यासाच्या परिसरातील वातवरणातील इंतभूत माहिती देणारं आहे. मुंबईत देखील चार एक्स बॅंड डॉप्लर रडार बसवलं जाणार आहे. आयआयटीएम संस्थेकडून मुंबईतील वातावरणातील बदल, पाऊस आणि इतर अभ्यासाकरिता रडार बसवण्यात येणार आहे.
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट आणि पावसाअभावी शेतीचे मराठवाड्यात अतोनात नुकसान होत आहे. रडारच्या माध्यमातून मुसळधार पाऊस कुठे, किती आणि कसा पडत आहे? ढगांची दिशा, त्याचसोबत ढगांमध्ये पाणी आहे की, बाष्प याचा अंदाज अचूक वर्तवण्यात मदत मिळत असते.
डॉप्लर रडार (Doppler Radar) पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. डॉपलर रडार पाऊस, ढगफुटी, गारपिटीची माहिती चार ते सहा तास आधी देते असते. सोबतच साधारण रडारच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार ते आपल्या परिघातील पावसाची तीव्रता कशी असेल आणि किती मिमी पाऊस प्रति तास कोसळू शकेल, याचा अंदाज डॉप्लर रडारच्या माध्यमातून अचूक मिळत असतो.
एक्स बॅंड रडार काय करणार?
ढग तयार होण्यासारखी परिस्थिती आहे का याची माहिती देईल.निर्माण झालेले ढग गडद होणार की विखरुन जाणार याची माहिती देईल.
वाऱ्यांची दिशा आणि वारे किती उंचीवर वाहणार याची माहिती देईल. हवेतील बाष्प, बर्फाचे कण तसेच पाण्याच्या थेंबाचा आकार किती व कसा असणार याची देखील माहिती देईल.
प्रामुख्याने ढगफुटी आणि गारपिटीची माहिती अचूक मिळेल.
खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा
डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी व जगभर वापरली जाणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची एक्स रेप्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहायाने पाऊस, ढगफुटी व गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. 250 किमीपर्यंतच्या परीघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एक तास आधी 100 टक्के खात्रीपूर्वक व अचूक सांगता येते.
डॉप्लर रडार यंत्रणेद्वारे परतीचा पाऊस कधी, कुठे आणि किती होईल याची माहिती प्रशासनाला मिळाल्यास प्रशासनाला आपत्कालीन अलर्ट देणे आणि जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल.
डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्त्वपूर्ण मानण्यात येते. समुद्र किनाऱ्यांवर तसेच पर्वतीय परिसरातील संभाव्य पाऊस, चक्री वादळे, हिमवृष्टी, उष्म्याची लाट, हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलीकणांचे वादळ किंवा इतर वादळे त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो. त्या शहर, गाव, खेड्यातील हवामान खाते आपत्ती व्यवस्थापनास याची पूर्वकल्पना देऊन, संबंधित भागात येणाऱ्या प्रलयकारी पाऊस, वादळ, पुरापासून मनुष्य आणि वित्त हानी टाळू शकते किंवा आधीच उपाययोजना केल्याने नुकसानाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
विद्युत चुंबकीय लहरींचा मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहिती (1 ते 2 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), जवळच्या व दूरच्या ढगांच्या अचूक माहिती (2 ते 4 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), परदेशात अति जवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी (4 ते 8 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), हवेतल्या बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच ढगफुटींची माहिती (8 ते 12 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), ढंग तयार होण्यासारखी परीस्थिती आहे का, बनलेला ढग गडद होईल की विखरून जाईल, वारे किती उंचीवर कसे वाहतात हे 8 ते 12 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर कळते. ढगातील एकूण बर्फ कण, पाणी आणि गारांच्या निर्मितीचा वेग व त्यावरून त्या किती नुकसान करू शकतात, याची अगदी प्रत्येक सेंटिमीटरच्या भागातली 100 टक्के (12 ते 18 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) अचूक माहिती मिळते. हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यास 18 ते 24 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो.