जागतिक बाजारात दर्जेदार भारतीय कापसाला दुय्यम स्थान
1 min read
वेचणी केल्यानंतर शेतकऱ्यांना कापसाचे वर्गीकरण करणे शक्य नाही. मात्र, ते जिनिंग-प्रेसिंग मालकांना सहज करता येते. व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालकांनी कापूस खरेदी करतेवेळी चांगल्या प्रतीचा कापूस वेगळा ठेवून त्याचे वेगळे जिनिंग व प्रेसिंग केल्यास तसेच रुई ‘कन्टॅमिनेशन मशीन’द्वारे स्वच्छ करून त्याच्या गाठी तयार केल्यास रुईची गुणवत्ता कायम राखली जाते. कापसाला सरसकट भाव दिला जात असल्याने बहुतांश शेतकरी कापूस एकमुस्त (पहिल्या वेच्यापासून शेवटच्या वेच्यापर्यंत) साठवून ठेवतात आणि विकतात. मात्र, कापसाला त्यातील रुईचे प्रमाण आणि धाग्याच्या लांबीनुसार भाव मिळाल्यास शेतकरी देखील एकमुस्त कापूस विकण्याऐवजी पहिल्या दोन वेच्यांच्या कापूस वेगळा साठवून ठेवतील व तो वेगळा विकण्यास प्राधान्य देतील. कापूस वेचणी करतेवेळी तसेच तो घरी अथवा गोदामात साठवून ठेवतेवेळी तसेच वाहतुकीदरम्यान त्यात गवत, कचरा, प्लास्टिकचे तुकडे व इतर बाबी मिसळणार नाही याची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
कापसाचे सरसकट ‘जिनिंग-प्रेसिंग’
धाग्याच्या लांबीनुसार (Staple length) (अतिरिक्त लांब, लांब, मध्यम लांब, मध्यम व आखूड) वर्गीकरण करून रुईच्या गाठी (रुई) तयार केल्यास त्या गाठींना चांगला भाव मिळतो. हा प्रयोग देशातील काही सुज्ञ जिनिंग-प्रेसिंग मालक आजही करत आहेत. मात्र, बहुतांश व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक सरसकट कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करीत असल्याने रुईची व त्यापासून तयार होणाऱ्या कापडाची गुणवत्ता खालावते, अशी माहिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील प्रकाश व्हाइट गोल्ड जिनिंग-प्रेसिंगचे मालक ओम डालिया यांनी दिली. भारतीय रुई चांगल्या दर्जाची असतानाही ती ‘कन्टॅमिनेशन फ्री’ नसल्याने त्याला जागतिक बाजारात कमी दर मिळतो. तुलनेत इतर देशांमधील साधारण दर्जाच्या ‘कन्टॅमिनेशन फ्री’ रुईला चांगला भाव मिळतो. त्यामुळे कापसाच्या जिनिंग-प्रेसिंग सिस्टीममध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, असेही ओम डालिया यांनी सांगितले.
नफ्याचा हव्यास, खालावलेली गुणवत्ता
देशांतर्गत बाजारात प्रत्येक दर्जाच्या रुईला खरेदीदार आहेत. शिवाय; नफा कमावण्याच्या नादात व्यापारी व काही जिनिंग-प्रेसिंग मालक रुईच्या गुणवत्तेला फारसे महत्त्व देत नाही. या बाबीमुळे जागतिक बाजारात भारतीय रुई बदनाम झाली आहे, अशी प्रतिक्रिया इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथील रत्नाकर टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे मालक सुभाष आकोळे यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे बांग्लादेश, व्हीएतनाम व छोट्या देशातच भारतीय रुईला मागणी आहे. भारतात कापूस मजुरांकरवी वेचला जातो. त्यात कचऱ्यााचे प्रमाण कमी असले तरी कापूस व रुईची गुणवत्ता कायम राखण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करतेवेळी त्याचे वेचानिहाय वर्गीकरण केल्यास धाग्याच्या लांबीनुसार रुईच्या गाठी तयार करणे सहज शक्य होते. कापूस जिनिंग करतेवेळी व प्रेसिंग करण्यापूर्वी रुईचे ‘कन्टॅमिनेशन’ केले तर चांगल्या दर्जाचे सूत व त्यापासून उत्तम दर्जाचे कापड तयार करता येऊ शकते, अशी माहिती प्रकाश डालिया यांनी दिली.
‘कन्टॅमिनेशन रिमूव्ह्य सिस्टीम’
जिनिंग-प्रेसिंगला वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत (DIC) अनुदान दिले जाते. ते अनुदान जिनिंग प्रेसिंगमधील मशीन व तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी वापरावयाचे असते. परंतु, या अनुदानाचा वापर मूळ बाबींसाठी केला जात नाही. जिनिंग-प्रेसिंग मालकांनी या अनुदानाचा वापर ‘कन्टॅमिनेशन रिमूव्ह्य सिस्टीम’ लावण्यासाठी केल्यास ही समस्या सुटू शकते.
कापडाचा गुणवत्ता खालावते
रुई ‘कन्टॅमिनेशन फ्री’ नसल्यास त्यात कापसासोबत कचरा, प्लास्टिक, गवत व अन्य बाबींचे तंतू मिसळतात. प्रेसिंग करतेवेळी ते कापसाच्या तंतूसोबत एकजीव होतात. याच तंतूपासून सूत व त्या सुतापासून कापड तयार केले तर, त्या कापडाला रंग देतेवेळी (Dyeing) कापसाचे तंतू ते रंग स्वीकारतात. इतर बाबींचे तंतू मात्र रंग स्वीकारत नसल्याने त्या कापडाची गुणवत्ता खालावते. ते कापड अथवा कपडे Defect cloth म्हणून गणल्या जातात. कापडातील हा Defect डोळ्यांनी सहसा दिसत नाही. तरीही ते कापड अथवा कपडे Reject केले जातात.
वस्त्रोद्योग मंत्रालय, सीसीआय तसेच देशभरातील जिनिंग-प्रेसिंग मालकांनी कापूस खरेदीपासून जिनिंग व प्रेसिंगपर्यंत विशिष्ट प्रकारची काळजी घेतल्यास किंबहुना; त्यांना ही विशेष काळजी घेण्याची केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने संबंधितांना सक्ती केल्यास मुळात दर्जेदार असलेल्या भारतीय रुईला जागतिक बाजारात अव्वल स्थान निर्माण करता येऊ शकते. यातून सूत व कापडाची गुणवत्ता कायम राखता येऊ शकते. शिवाय; भारतीय सूत व कापड उद्योगाला जागतिक बाजारात त्यांचे स्थान अधिक मजबूत करण्यास मदत होईल.